Thursday, July 25, 2024
Homeमहाराष्ट्रठाणे२०२४च्या निवडणुकीत विजय भाजपाचाच : अनुराग ठाकुर

२०२४च्या निवडणुकीत विजय भाजपाचाच : अनुराग ठाकुर

कल्याण लोकसभा दौऱ्याला कळव्यातून सुरूवात

ठाणे : देशातील ईशान्येकडील राज्यांबरोबरच तमिळनाडूतूनही भाजपाला वाढता प्रतिसाद मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०२४ च्या निवडणुकीत भाजपाचाच विजय होईल, असा विश्वास केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर यांनी आज येथे व्यक्त केला. तर महाराष्ट्रात डबल इंजिनची ताकद आणखी वाढेल, सरकार जाणार असल्याची आशा असलेल्यांना निराशा पत्करावी लागेल, असा टोलाही ठाकुर यांनी लगावला. या वेळी खेलो इंडिया स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचाही सत्कार करण्यात आला.

कल्याण लोकसभा प्रवास योजनेच्या द्वीतीय पर्वात कल्याण लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या संघटनात्मक स्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय माहिती-प्रसारण, युवा व्यवहार-क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर यांचे कळवा येथे आज सकाळी आगमन झाले. त्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून श्री. ठाकुर यांनी दौऱ्याची सुरुवात केली. यावेळी कल्याण लोकसभा प्रभारी व आमदार संजय केळकर, आमदार प्रविण दरेकर आमदार निरंजन डावखरे, प्रदेश सचिव संदीप लेले आदींसह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

भाजपाकडून देशभरात पक्षाचा विस्तार केला जात आहे. त्यानुसार कल्याणमध्ये हा दुसरा दौरा आहे. छत्रपती शिवाजी महाराज व जनतेचा आम्हाला कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी आशीर्वाद मिळेल, असा विश्वास मंत्री अनुराग ठाकुर यांनी व्यक्त केला. या वेळी खेलो इंडिया स्पर्धेत विजेतेपद मिळविलेल्या खेळाडूंचा ठाकुर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्राच्या संघातून ठाण्याच्या संयुक्ता काळेने चार सुवर्णपदके व एक रौप्य, किमया कार्लेने तीन कांस्यपदके पटकावली. या दोघींबरोबरच राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू दिव्यांक्षी म्हात्रे, आर्या कदम, अवनी कदम, फिनिक्स जिम्नॅस्टिक अकादमीच्या कोच मानसी सुर्वे यांचा सत्कार केला. त्याचबरोबर जलतरण, मलखांब, अॅथलेटिक्सच्या विविध स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना गौरविण्यात आले. यावेळी भाजपाच्या चिटणीस सुषमा ठाकुर यांचीही उपस्थिती होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -