Monday, March 17, 2025
Homeताज्या घडामोडीछोटा शकील टोळीतील २० वर्षे फरार असलेला शार्प शूटर तुरुंगातच सापडला

छोटा शकील टोळीतील २० वर्षे फरार असलेला शार्प शूटर तुरुंगातच सापडला

'काखेत कळसा गावाला वळसा'

आरोपी कैदी तुरुंगात असताना त्याचा शोध लावण्यात पोलीस कसे अपयशी ठरले? न्यायालयाचा सवाल

मुंबई : छोटा शकील टोळीतील २० वर्षांपासून फरार असलेला शार्प शूटरचा ठावठिकाणा अखेर मुंबई पोलिसांना लागला आहे. माहिर सिद्दीकी असे या शार्प शुटरचे नाव आहे. बॉम्बे अमन कमिटीचे अध्यक्ष वाहिद अली खान यांच्या हत्या प्रकरणात सन १९९९ पासून तो फरार होता. तेव्हापासूनच पोलीस या शार्पशुटरच्या मागावर होते. त्यासाठी मुंबई पोलिसांनी जंग जंग पछाडले. विविध राज्यांमध्ये पथकेही जाऊन आली. परंतू, हाती काही लागले नाही. आरोपीवर न्यायालयातून अटक वॉरंटही निघाले होते. अखेर या आरोपीचा शोध लागला.

आरोपी माहिर सिद्दीकी याचा जेव्हा ठावठिकाणा लागला तेव्हा पोलिसांनाही धक्का बसला. हा आरोपी दुसऱ्या एका प्रकरणात तुरुंगात अंडर ट्रायल कैदी होता. त्यामुळे तो बाहेर आढळून येत नव्हता. आरोपी सापडल्यानंतर ‘काखेत कळसा आणि गावाला वळसा’, अशीच काहीशी तऱ्हा झाल्याची चर्चा पोलीस दलात सुरु होती.

मुंबईतीलच एका कारागृहात हा कैदी अंडर ट्रायल असतानाही पोलिसांना त्याचा ठावठिकाणा कळू नये, याबातब आश्चर्य व्यक्त करत कोर्टाने पोलिसांवर संतापही व्यक्त केला. पोलिसांकडे अंडर ट्रायल कैद्यांचे रेकॉर्ड असते. तरीही पोलिसांना या आरोपीचा ठावठिकाणा लागू नये याचे रहस्य काय, असे कोर्टाने विचारले.

दरम्यान, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) प्रकरणांचे विशेष न्यायाधीश ए. एम. पाटील यांनी बॉम्बे अमन कमिटीचे अध्यक्ष वाहिद अली खान यांच्या हत्येचा आरोपी माहिर सिद्दीकीची निर्दोष मुक्तता केली.

कोर्टाने फिर्यादीच्या खटल्यातील अनेक विसंगतींचा उल्लेख केला. फिर्यादीनुसार, सिद्दीकी आणि सहआरोपींनी जुलै १९९९ मध्ये मुंबईतील एल. टी. मार्ग भागात खान यांची त्यांच्या घराजवळ गोळ्या झाडून हत्या केली होती. गुन्हा केल्यानंतर दोघांनी घटनास्थळावरून पळ काढला होता. मे २०१९ मध्ये पोलिसांनी सिद्दिकीचा शोध घेऊन त्याला अटक केली. त्यांना त्याच्याविरुद्ध पुरेसे पुरावे मिळाले आणि त्याद्वारे त्याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. तपासादरम्यान पोलिसांना सिद्दीकी आणि छोटा शकीलसह सहा जणांचा सहभाग आढळून आला. छोटा शकीलच्या सांगण्यावरून हा गुन्हा घडल्याचेही त्यांना आढळून आले, असे पोलिसांनी सांगितले होते.

कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, सिद्दीकीविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल करताना, फिर्यादीने दावा केला की घटनेच्या तारखेपासून अटक होईपर्यंत तो फरार होता. पण तो २०१४ ते २०१९ दरम्यान अन्य एका खटल्यात अंडरट्रायल कैदी होता आणि त्याला सीआयडीने अटक केली होती. मग तो तुरुंगात असताना त्याचा शोध लावण्यात पोलीस कसे अपयशी ठरले, असा सवाल न्यायालयाने केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -