कल्याण(प्रतिनिधी) : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील विविध प्रकल्पांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. येत्या बुधवारी १५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या कार्यक्रमांसाठी केडीएमसी सज्ज असल्याचे कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले़. यावेळी पालिका सचिव संजय जाधव, शहर अभियंते अर्जुन आहिरे, कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगुळ आदी उपस्थित होते.
स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत प्रबोधनकार ठाकरे तलावातील सुशोभीकरणाचे लोकार्पण, अमृत योजने अंतर्गत प्रकल्प दोन एसटीपी प्लान्ट, तसेच केडीएमटीच्या उपक्रमामध्ये तात्पुरत्या स्वरूपात ४८ कंत्राटी वाहक आणि ११ कंत्राटी चालक यांची नियुक्ती पत्रे देण्यात येणार असून, कल्याण व डोंबिवलीतील बीएसयूपी प्रकल्पातील १२६५ लाभार्थींना सदनिका व व्यापारी गाळ्यांच्या चावी वाटपाचा कार्यक्रम कल्याण येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडणार आहे.
राज्यातील मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील विविध प्रकल्पांच्या लोकार्पण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा पहिलाच शासकीय दौरा असल्याने केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.