ठाणे (प्रतिनिधी) : हिरानंदानी समूहाच्यावतीने ९ वी हिरानंदानी ठाणे हाफ मॅरेथॉन पार पडली. अभिनेता मिलिंद सोमन, सुपर मॉडेल, चित्रपट निर्माता आणि फिटनेस क्षेत्रातील लोकांसह ठाणे शहर आणि इतर भागातून मोठ्या संख्येने धावपटूंनी या मॅरेथॉनमध्ये भाग घेत आरोग्य आणि पर्यावरणाविषयी जागरुकता निर्माण केली.
ही ठाणे हाफ मॅरेथॉन २१.०९७ किमी, ग्रीन रन १० किमी आणि कौटुंबीक रन ४ किमी या तीन श्रेणीचा समावेश असलेल्या या रनमध्ये जवळपास १५ हजार धावपटू सहभागी झाले होते. हिरानंदानी ठाणे हाफ मॅरेथॉनमध्ये भाग घेणे हा माझ्यासाठी एक आनंददायी अनुभव होता, असे अभिनेता मिलिंद सोमण यांनी म्हटले आहे. धावपटू हे समाज आणि देशासाठी एक उत्तम उदाहरण म्हणून काम करतात आणि ‘रन फॉर अर्थ’मोहीम निसर्ग आणि तेथील रहिवाशांच्या कल्याणाला प्राधान्य देत, निसर्गाचा समतोल राखून सर्वोत्तम जगण्याचा अनुभव देण्यासाठी हिरानंदानी समूहाचे कौतुक केले पाहिजे, असेही अभिनेत सोमन म्हणाले.
हिरानंदानी समूहाच्या २०१३ मध्ये ठाणे हाफ मॅरेथॉनमध्ये ८ हजार धावपटूंची नोंदणी झाली होती. तर यावर्षी १५ हजार हून अधिक धावपटू त्यात सहभागी झाले होते. शाश्वत पर्यावरण हे कंपनीच्या मूलभूत मूल्यांपैकी एक असून हिरानंदानी पर्यावरण रक्षण व समतोल साधण्यासाठी नेहमीच वचनबद्ध असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.