महाविजयाचा महासंकल्प…

Share

भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक दोन दिवस नाशिक येथे शनिवारी संपन्न झाली आणि त्यात पुढील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ‘महाविजयाचा महासंकल्प’ करण्यात आला. इतर राजकीय पक्ष नुसतेच चाचपडत असताना भाजपने संकल्प केलाही आणि त्यासाठी मिशन पद्धतीने कामही सुरू केले, यावरून भाजप इतर समकालीन पक्षांच्या किती पुढे आहे, हे स्पष्टच झाले. याच नाशिकच्या भूमीवरून भाजपने काही वर्षांपूर्वी ‘शतप्रतिशत भाजप’ची हाक दिली होती आणि त्याचीच ही पुढची आवृत्ती आहे. तेव्हा शिवसेनेच्या युतीच्या बेड्या भाजपच्या पायात होत्या. आता भाजप पूर्णपणे मोकळा आहे आणि जरी भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देऊन सरकार स्थापन केले असले तरीही त्यांची प्रत्यक्ष युती न करताही एकजूट अभंग आहे.

खरे तर भाजपने ‘मिशन ४५’ आणि ‘मिशन २००’ अशी जी रणनिती निवडणुकीसाठी ठरवली आहे, त्यात शिंदे गटाच्या भवितव्याचे काय?, असा प्रश्न काही वृत्तपत्रे मुद्दाम उपस्थित करत आहेत. पण भाजपने कुठेही आपल्या मिशनमध्ये शिंदे गटाचा अधिक्षेप केलेला नाही आणि तसे होण्याचीही शक्यता नाही. पण आता भाजपने जी योजना आखली आहे, ते आव्हान म्हटले तर सोपे आहे आणि म्हटले तर अवघड आहे. सोपे यासाठी आहे की, भाजपला आता राज्यात तरी म्हणावा असा राजकीय प्रतिस्पर्धी उरलेला नाही. शिवसेना दोन गटांत विभागली जाऊन स्वतःची ओळख मिळवण्याच्या संघर्षात गुंतली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस एका परिवारातील अंतर्गत झगड्यात अडकली आहे. काँग्रेसचे घर पूर्णपणे मोडले असून तो पक्ष स्वतःचेच घर व्यवस्थित करण्यात मग्न आहे. महाविकास आघाडीतील सारेच पक्ष स्वतःच्याच संघर्षात गुंतले आहेत. त्यामुळे विरोधकांचा जो राजकीय अवकाश आहे, तो हे तिन्ही पक्ष मिळूनही भरून काढू शकलेले नाहीत. शिवाय भाजपला आता हिंदुत्ववादी मतांसाठी कोणताही प्रतिस्पर्धी उरलेला नाही.

शिवसेना म्हणजे ठाकरे गट हा तोंडाने कितीही ‘आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही’, असे म्हणत असला तरीही त्यातील वायफळपणा लोकांना समजून चुकला आहे. त्यामुळे हिंदुत्वाच्या मतांची जी बँक बाळासाहेबांनी बांधली होती, तिचा वारसा आता ठाकरे गटाला सांगता येणार नाही. हेच तर त्यांचे खरे दुखणे आहे आणि हा वारसा एकनाथ शिंदे सांगू शकतात. भाजपला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची भूमिका पूरकच असल्याने त्यांचा लाभही भाजपला होणारच आहे. वंचित बहुजन आघाडीने शिवसेनेशी युती केली आहे. पण त्याचे काहीही दृष्य परिणाम दिसण्याची शक्यता नाही आणि हे आव्हान अवघड यासाठी आहे की, भाजपला जरी मोठ्या प्रमाणात जागा मिळवायच्या असल्या तरीही लोकांचे प्रश्न सोडवण्यात या सरकारला कितपत यश येईल?, त्यावर त्यांच्या मिशनचे यशापयश अवलंबून असेल.

बेरोजगारी आणि महागाई ही सर्वात मोठी आव्हाने आज सर्वत्र आहेत आणि त्यासाठी राज्याचे सरकारला भरीव असे काहीतरी पुढील एक वर्षात करावे लागेल. कोरोनानंतर सर्वच घटक आज हलाखीत आहेत आणि त्यांच्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारला ठोस पावले उचलावी लागतील. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला असून तुलनेने शिंदे गट पक्ष म्हणूनही अस्तित्वात नसताना त्याने चांगले यश मिळवले आहे. त्यामुळे भाजपच्या मागे जनता आजही मोठ्या प्रमाणावर आहे, हे समोर आले आहे. त्यामुळे भाजपला त्यांचा ‘महाविजय संकल्प’ ऐनवेळी परिस्थितीने अनपेक्षित वळण घेतले नाही, तर अमलात आणणे फार अवघड जाणार नाही. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकारिणी बैठकीत बोलताना आपल्याला खोट्या कारणावरून तुरुंगात टाकण्याचा डाव रचला होता, असा आरोप पुन्हा केला. त्यांचा रोख यावेळी महाविकास आघाडीच्या दोन नेत्यांवर होता. त्यांची नावे त्यांनी घेतली नसली तरीही ते कोण आहेत, हे लोकांना कळते. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रथम मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांच्या पहिल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले होते की, आम्ही सूड घेणार नाही. पण तुम्ही आम्हाला आडवे जाऊ नका. पण नंतर सरकारचे सूडचक्र कसे आणि कुणावर फिरले, ते अडीच वर्षांच्या काळात सर्वांनी पाहिले आहे. कंगना राणावतपासून ते पत्रकार अर्णब गोस्वामी आणि खुद्द सध्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यापर्यंत सर्वांना त्या सूडचक्राची धग लागली.

वास्तविक फडणवीस यांनी कुणाचेही नाव घेतले नसतानाही प्रथम जेव्हा फडणवीस यांनी हा आरोप केला तेव्हा तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी तसे काही राज्य सरकारच्या मनात नव्हते, असा खुलासा केला. पण फडणवीस यांनी तो आदेश वळसे-पाटलांचा नव्हता, तर वरून आदेश आला होता, असे म्हटले. यावरून त्यांची बोटे कुणाकडे होती, ते सहज लक्षात येते. अर्थात आता असा आरोप करण्यामागे फडणवीस यांचा हेतू हा असावा की, महाविकास आघाडी सरकार अडीच वर्षांत गेल्यानंतर सहानुभूती मिळवण्याचे प्रयत्न करणार, त्या प्रयत्नांना सुरूंग लावण्याचा असू शकतो. भाजपने महाविकास आघाडीच्या कारभारावर जोरदार टीका केली आहे. ते अपेक्षितच होते. पण त्याच वेळी त्यांनी राज्यासाठी भावी योजना सांगायला हव्या होत्या. पण भाजपचा हा महाविजयाचा महासंकल्प पूर्णपणे नाही तरीही बराचसा तडीस जाण्याची शक्यता आहे. कारण भाजपला आता राज्यात तुल्यबळ प्रतिस्पर्धी नाही आणि त्यामुळे आता नाही तर कधीच नाही, अशी स्थिती भाजपसाठी आहे. इतके अनुकूल वातावरण राज्यात भाजपला कधीही नव्हते.

Recent Posts

कोकणातील तरुणाची वेगळी वाट…

माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…

18 minutes ago

छोड आये हम वो गलियाँ…

वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…

48 minutes ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, २४ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…

1 hour ago

पहलगाममधील नरसंहार, हिंदू पर्यटकांना टार्गेट

भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…

1 hour ago

SRH vs MI, IPL 2025: हैदराबादला हरवत मुंबईचा विजयी चौकार

हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…

2 hours ago

अटारी बंद, व्हिसा रद्द, सिंधू करार बासनात, पाकिस्तानच्या विरोधात ५ मोठे निर्णय

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…

2 hours ago