पुणे : पुण्यात गुगलचे ऑफिस उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. कोरेगाव पार्क येथील गुगल कार्यालयाला फोन करुन एकाने ही धमकी दिली. त्यामुळे गुगलचे ऑफिस असणाऱ्या कोरेगाव पार्क परिसरात एकच खळबळ उडाली. फोन येताच बॉम्ब शोधक पथकाने गुगलच्या कार्यालयाची संपूर्ण तपासणी केली. तपासात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही.
पुण्याचे गुगल ऑफिस उडवून देण्याची धमकी देणाऱ्यास हैदराबाद येथून ताब्यात घेतल्याची माहिती आहे. प्राथमिक माहितीनुसार, ४५ वर्षीय व्यक्तीने दारूच्या नशेत हा फोन केला होता. या व्यक्तीचा भाऊ पुण्यात राहतो. दोघांमध्ये काही कारणांमुळे वाद आहेत. याच गोष्टीचा राग मनात धरून भावाला त्रास व्हावा, या उद्देशाने थेट गुगलचे ऑफिस उडवून देण्याची धमकी दिली होती. पोलिस अधिक तपास करत आहेत.