ठाणे: ठाणे व भिवंडी तहसील कार्यालयाच्या पथकाने आज अनधिकृत रेती उत्खननावर धडक कारवाई केली. या कारवाईमध्ये अंदाजे ५० लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
मुंब्रा खाडी, कोपर खाडी व भिवंडी लगतच्या खाडीमध्ये गस्तीवर असलेल्या अनधिकृत रेती उत्खननावर ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत धडक कारवाई करण्यात येत आहे. आज झालेल्या कारवाईत त्यांनी २ सक्शन पंप आणि २ बार्ज नष्ट केले. तसेच खाडी लगत असलेल्या रेती साठ्यासह 3 कुंड्या नष्ट करण्याची कारवाई केली.
मागील तीन आठवड्यामध्ये प्रशासनाने आठ कारवाया केल्या आहेत. या कारवायांमध्ये ९ बार्ज, ७ सक्शन पंप, २० ब्रास रेतीसाठा, ९ रेतीच्या कुंड्या नष्ट करण्यात आले. सदर साहित्याची एकूण किंमत १.७२ कोटी रुपये आहे. अनधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहन याच्यावर देखरेख ठेवण्याकरिता अद्ययावत ‘महाखनिज प्रणालीचा’ वापर करण्यात येत असून त्याद्वारे छाननी करून अनधिकृत वाहनांवर कारवाई करण्यात येत असल्याचेही जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.