Tuesday, April 22, 2025
Homeसाप्ताहिककोलाजश्री क्षेत्र हरिहरेश्वर-दक्षिण काशी

श्री क्षेत्र हरिहरेश्वर-दक्षिण काशी

रायगड जिल्ह्यातील सावित्री नदी जिथे अरबी समुद्राला मिळते तेथे तिच्या मुखावर हरिहरेश्वर नावाचे गाव आहे. नदीच्या दुसऱ्या (उत्तर) तीरावर श्रीवर्धन हे गाव आहे. ही दोन्ही गावे रायगड जिल्ह्यात येतात. हरिहरेश्वरला मुंबई-गोवा रस्त्यावरील दासगावपासून फाटा फुटतो, तर श्रीवर्धनचा रस्ता माणगाव येथे सुरू होतो. श्रीवर्धनवरूनही होडीने हरिहरेश्वरला जाता येते. श्रीवर्धन तालुक्यातील भगवान शंकराचे हे मंदिर दक्षिण काशी क्षेत्र म्हणूनही ओळखले जाते.

कोकणपट्टीतील एक निसर्गरम्य असे पवित्र तीर्थस्थान. एका बाजूला हिरव्यागार गर्द वनश्रीने नटलेला डोंगर, तर दुसऱ्या बाजूला नयनरम्य स्वच्छ व निळा समुद्र व रूपेरी वाळूने आकर्षित करणारा अमर्याद समुद्रकिनारा. तसेच नारळी-पोफळीच्या बागांच्या साक्षीने आणि डोंगरदऱ्यांच्या कुशीत विसावलेले हे तीर्थस्थान आहे. कर्नाटकातील गोकर्ण  ते  ठाणे जिल्ह्यातील निर्मळ हे पाचशे मैलांचे दक्षिणोत्तर अंतर व ४८ मैल रुंद एवढा प्रचंड परिसर हा श्री क्षेत्र हरिहरेश्वराचा परिसर मानण्यात येतो. सावित्रीला दिलेल्या वराप्रमाणे ब्रह्मदेवाने सावित्रीसह यज्ञ केला. या हरिहरेश्वर क्षेत्राच्या दक्षिण दिशेला व उत्तर दिशेला बारा ज्योतिर्लिंग स्थाने आहेत. देशात ऐकूण १०८ तीर्थस्थाने असली तरी प्रमुख तीर्थ हरिहरेश्वरमध्ये आहे, असे मानले जाते. हरिहरेश्वरचा महापवित्र क्षेत्र असा उल्लेख श्री हरिहरेश्वर माहात्म्य पोथीमध्ये आहे. हरिहर नावाच्या पश्चिमाभिमुख असलेल्या या देवात हरिस्वरूप व हरस्वरूप या दोन्हींचा संगम झाला आहे.

रायगड जिल्ह्यातील श्री क्षेत्र हरिहरेश्वर हे स्थान दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे. हरिहरेश्वरला भारतातील एक महत्त्वाचे तीर्थस्थान मानले जाते. हरिहरेश्वर हे गाव ब्रह्मगिरी, विष्णूगिरी, शिवगिरी, पार्वती या चार टेकड्यांच्या कुशीत आहे. गावाच्या उत्तरेकडे हरिहरेश्वराचे देऊळ आहे. या क्षेत्रास भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळाला असल्याचे मानले जाते. त्यामुळेच याचा संदर्भ देवघर किंवा देवाचे निवासस्थान असाही दिला जातो. श्री हरिहरेश्वर हे शिवस्थान पेशव्यांचे कुलदैवत आहे. येथे असलेली काळभैरव आणि श्री योगेश्वरी यांची देवळे देखील महत्त्वाची स्थाने आहेत. हरिहरेश्वराचे देऊळ बरेच जुने आहे. ते शिवकालीन असावे, असा अंदाज आहे; परंतु बांधकामाचा निश्चित कालखंड सांगता येत नाही. पहिल्या बाजीरावाने या मंदिराचा जीर्णोद्धार १७२३ मध्ये केल्याचे पुरावे आहेत. येथील सर्व देवळांना खास कोकणी पद्धतीची उतरती छपरे आहेत. हरिहरेश्वर क्षेत्रातील सर्वांत महत्त्वाचे देऊळ काळभैरवाचे आहे. याची एक आख्यायिका अशी आहे, की बळी राजाकडून तीन पावले भूमी घेताना वामनाने ठेवलेले दुसरे पाऊल हरिहरेश्वरापासून सुरू झाले.

दुसरी आख्यायिका अशी आहे की, अगस्ती मुनी शांततेच्या शोधात भ्रमण करत होते तेव्हा हरिहरेश्वरातील चार स्वयंभू लिंगांच्या दर्शनाने त्यांचे मन शांत झाले. सर्वसाधारणपणे प्रथम काळभैरवाचे दर्शन, नंतर हरिहरेश्वराचे दर्शन करून परत काळभैरवाचे दर्शन घ्यावे, अशी प्रथा येथे आहे. या क्षेत्रात ज्या चार टेकड्या आहेत. त्यांच्यासारखी रचना हरिहरेश्वराच्या लिंगावर दिसून येते. या दोन्ही देवळात दर्शन घेतल्यावर कराव्या लागणाऱ्या प्रदक्षिणेचा मार्ग डोंगर आणि समुद्राजवळच्या खडकांवरून जातो. या मार्गावरील शे-दीडशे पायऱ्या खाली उतरून त्या डोंगराची प्रदक्षिणा केली जाते. या संपूर्ण प्रदक्षिणेचे अंतर एक कोस असल्याने तिला कोसाची प्रदक्षिणा असे म्हणतात. या मार्गातून दिसणारा समुद्र आणि तिथले सृष्टीसौंदर्य डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. या क्षेत्राला नयनरम्य समुद्रकिनारा लाभला आहे. येथे फेसाळणाऱ्या समुद्राच्या लाटा आणि त्या लाटांचा नाद आपल्या कानात घुमू लागतो. त्या लाटांची लय आपल्याला तरंगातून दिसू लागते. या सागराचे संगीत ऐकताना मन शांतावते. आयुष्यातील चिंता, काळज्यांना तात्पुरता का होईना पूर्णविराम मिळतो.

रायगड जिल्ह्यामध्ये आल्यानंतर हरिहरेश्वरचे दर्शन झाले नाही, असा भाविक विरळाच. श्रावण महिन्यामध्ये हरिहरेश्वरचा परिसर भाविकांनी फुलून जात असतो. हरिहरेश्वराचे मंदिर पुरातन आहे; परंतु बांधकामाचा निश्चित कालखंड सांगता येत नाही. पहिल्या बाजीरावाने या मंदिराचा जीर्णोद्धार १७२३ मध्ये केल्याचे पुरावे आहेत. पेशवे यांच्या घराण्याचे कुलदैवत आहे. येथील सर्व मंदिरे खास कोकणी पद्धतीची उतरती छपरांची आहेत. हरिहरेश्वर क्षेत्रातील सर्वांत महत्त्वाचे देऊळ काळभैरवाचे आहे. बळी राजाकडून तीन पावले भूमी घेताना वामनाने ठेवलेले दुसरे पाऊल हरिहरेश्वरापासून सुरू झाले.

अगस्ती मुनी शांततेच्या शोधात भ्रमण करत होते तेव्हा हरिहरेश्वरातील चार स्वयंभू लिंगांच्या दर्शनाने त्यांचे मन शांत झाले, अशा दोन वेगवेगळ्या आख्यायिका या मंदिरात सांगितल्या जातात. अगस्ती ऋषीमुनींनी तिथे तपश्चर्या केली होती. ‘श्री काळभैरव’ आणि ‘श्री योगेश्वरी देवी’ची स्थापना केली. श्री हरिहरेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात ब्रह्मा-विष्णू-महेश आणि पार्वतीचे स्थान आहे. काळभैरव मंदिर, महालक्ष्मी मंदिर आदी हरिहरेश्वरच्या परिसरातील इतर मंदिरे आहेत. हरिहरेश्वर हे ठिकाण दक्षिण काशी म्हणूनही ओळखले जाते. असे म्हटले जाते की, या मंदिराला शंकराचा आशीर्वाद आहे. भारतातील एक महत्त्वाचे तीर्थस्थान म्हणून मानले जाते. हे मंदिर ब्रह्मगिरी, विष्णूगिरी, शिवगिरी, पार्वती या चार टेकड्यांच्या कुशीत आहे. या क्षेत्राच्या दक्षिण आणि उत्तर दिशेला बारा ज्योतिर्लिंग स्थाने आहेत. हरिहर नावाच्या पश्चिमाभिमुख असलेल्या या देवात हरिस्वरूप व हरस्वरूप या दोन्हींचा संगम झाला आहे. मंदिर जरी समुद्र किनाऱ्यावर असले, तरी प्रदक्षिणा मार्ग मात्र डोंगरावरून आणि समुद्रामधून आहे.

-सतीश पाटणकर
(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत.)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -