मनुष्याला समाधान नेमके कशातून गवसते? तो विविध गोष्टींसाठी आयुष्यभर धावत राहतो, तरीही त्याला ते गवसते का? सिंह जंगलाचा राजा जरी असला तरी एकदा त्याने शिकार केली की, तो दुसऱ्या प्राण्यांच्या वाटेला जात नाही, तो समाधानी आणि संतुष्ट असतो. मग हे समाधान माणसात का दिसत नाही?
अगदी लहान बाळांपासून एक वर्षाच्या मुलात आपल्याला समाधान आढळते. कारण राग, द्वेष, मत्सर, असूया, लोभ, तुलना या गोष्टींचा स्पर्श त्यांच्या जीवनाला झालेला नसतो. मग हळूहळू कुटुंबातल्या माणसांचे वर्तन, नातलगांत मिसळणे, शालेय जीवनाची सुरुवात, मित्रांसोबतची स्पर्धा, कधी अभ्यासाचा ताण, कौटुंबिक वातावरणातील चढ-उतार यामुळे षडरिपूंचे प्रमाण खाली-वर होऊ शकते. समाधानी माणसाची वृत्ती अनासक्त असते. स्वत:च्या पडत्या काळातही दुसऱ्याच्या उत्कर्षाने त्याच्या मनात चलबिचल होत नाही. जे आपल्या वाट्याला आलं, त्यात खूश राहणारी व्यक्ती समाधानी होऊ शकते.
काही वर्षांपूर्वी आम्ही तीर्थक्षेत्र गोंदवले येथे गेलो होतो. मी, मिस्टर व मुलगा! तिथे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे देऊळ व धर्मशाळा आहे, अन्नछत्र आहे. पण धर्मशाळा सोडून आम्ही राहण्यासाठी एक हॉटेल बुक केले होते; परंतु हॉटेलातली अस्वच्छता, एकाकीपणा, एकूणच अव्यवस्था पाहून मन साशंक झालं. आम्ही थोडे घाबरलो, आम्ही तेथून तडक बाहेर पडलो. आमचं समाधान हरवलं. त्या दिवशी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास देवळात आलो. तेव्हा तिथे एक बोधपूर्ण सुंदर प्रवचन ऐकायला मिळाले. अर्थात गोंदवलेकर महाराजांच्या शब्दांतून.
चित्तात राखावे समाधान।
चित्तात ज्याचे राहिले समाधान।
तोच भगवंताचा आवडता जाण।
तेथील प्रवचनकार उपस्थित लोकांना सांगत होते, “माणसाचे समाधान बाह्य गोष्टींनी भंग पावता कामा नये. म्हणूनच समाधान ही आत्म्याची खरी संपत्ती आहे. आत्मसंतुष्टतेसाठी आपण परिपूर्णतेचा ध्यास घेतला पाहिजे.”
तेव्हा असे लक्षात आले की, गोंदवलेकर महाराजांनी जणू आमची परीक्षा घेतली व आम्ही त्यात नापास झालो होतो; परंतु तेथून समाधानाची पोतडी मात्र निश्चित घेऊन बाहेर पडलो.
भक्तीचे समाधान परमोच्च स्थानी आढळते, कारण इथे माणूस भगवंताशी एकरूप होतो. संत-महात्म्ये या अवस्थेला पोहोचतात. त्यानंतर भुकेलेल्यांना अन्नदानातून समाधान, आजारी व्यक्तीच्या मदतीला धावून गेल्याचे समाधान, कर्तव्यपूर्तीचे समाधान, कौटुंबिक समाधान, प्रामाणिकपणे वागल्याचे समाधान असे त्याचे विविध प्रकार आहेत.
‘मी कर्ता’ हा अहंभाव प्रामुख्याने जो माणसांत आढळतो, तो निसर्गात नसतो. त्यामुळेच झाडे-फळे-फुले देत राहतात. प्राणी, पक्षी वर्तमानात जगतात. ना भूतकाळाचा विचार, ना भविष्याची चिंता. मन शांत, संतुष्ट व एकाग्र राहण्यासाठी, दया, परोपकार, त्याग या सद्गुणांची जरुरी आहे. खरे सुख हव्यासात नाही, त्यागात आहे. दुसऱ्यांच्या उणिवा शोधणे, अपमान व इजा यातून व्यक्तीच्या समाधानीपणाला तडा जातो. आपल्या स्वभावातील कमतरता दुसरा कुणी पाहू शकला नाही तरी आपल्याला ती दिसते. प्रयत्नपूर्वक त्यावर मात करून आपल्याला समाधानाचा ठेवा प्राप्त होऊ शकतो.
एका घरात आई-वडील, त्यांच्या जुळ्या मुली व त्यांचे आजोबा असे कुटुंबीय राहायचे. मुलींना दोघींमध्ये एकच गोष्ट आणलेली बिलकुल चालायची नाही. बाहुली असो वा सायकल, नाहीतर भातुकलीची खेळणी! आजोबा, आई-बाबा विचार करायचे की, आपण पुस्तके, जुने कपडे आपल्या भावंडांचे तर वापरून मोठे झालो ना? मग ही पिढी समाधानापासून दूर तर जात नाही? आजोबांनी एकदा युक्ती रचून एकच खेळण्यातली गाडी दोघी नातींमध्ये आणली. स्वतः आजोबांनी मुलींना गाडीबरोबर खेळण्यात गुंतवले. हळूहळू मुलींच्या मनात ‘शेअर करणे’ आणि त्या गोष्टीत समाधानाने जगणे, ही संकल्पना रुजू लागली. स्वतः मुलींचे आजोबा, पालक या प्रक्रियेतून गेल्यामुळे घर पुन्हा समाधानाने हसू-खेळू लागले. त्यामुळे घरातील एकतरी माणूस समाधानी असावा की, ज्याच्यामुळे घरात समाधान पसरेल व इतरांनादेखील समाधानाने राहावेसे वाटेल.
समाधान हा सगळ्या गुणांमधला परमोच्च गुण आहे. भौतिक धन-संपत्तीपेक्षा संतोषधन खूप श्रेष्ठ आहे. माणसाच्या न संपणाऱ्या इच्छा व अमर्याद अपेक्षा या गोष्टी त्याला समाधानापासून दूर नेतात. मनाच्या श्लोकातही समर्थ रामदासांनी जनांना हेच सांगितले आहे. मानवी मनाला ते विचारतात, ‘मना सज्जना तूची शोधूनी पाहे?’ आपल्यातील सज्जन मनाला विचारून पाहा, आपल्याला समाधान मिळाले आहे का? समाधानी, संतुष्ट व्यक्ती आपल्या निःस्वार्थ वृत्तीने, दृढनिश्चयी स्वभावाने त्याच्यासह इतरांच्या जीवनातही प्रसन्नता निर्माण करतो.
एका गावात एक शंकराचे सुंदर देऊळ होते. अनेक भक्त नियमितपणे शंकराचे दर्शन घेण्यास यायचे. देवळात वामनपंत व चरणदास हे दोन पुजारी होते. वामनपंतांना अनुभव जास्त! त्यामुळे आपण श्रेष्ठ या गर्वापोटी ते चरणदासांना सारख्या सूचना करायचे; परंतु चरणदासांनी त्यांना कधी दुरुत्तर केले नाही. देवळात येणारे भाविकही कौतुकाने, प्रेमाने चरणदासांशी गप्पा मारायचे. वामनपंत स्वतःही अंतर्मुख होऊन विचार करू लागले.’ चरणदास एवढे राग, द्वेष, मत्सर यातून दूर कसे राहू शकतात? कारण चरणदास मुळातच समाधानी होते व खऱ्या अर्थाने परमेश्वराच्या जवळ होते.
आयुष्यात सर्वात मौल्यवान गोष्ट आहे, ती म्हणजे समाधान. म्हणूनच आपलं समाधान हरवू देऊ नका.
-पल्लवी अष्टेकर