
बुलढाणा : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रविकांत तुपकर यांनी पोलीस स्थानकातच अन्नत्याग आंदोलन सुरु केलंय. जोपर्यंत लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत अन्नाचा एक कणही घेणार नसल्याची भूमिका रविकांत तुपकर यांनी घेतली आहे.
शनिवारी सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यावेळी रविकांत तुपकर यांच्यासोबत आंदोलन करणाऱ्या २०० कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर रविकांत तुपकर यांनी शनिवारपासून जेवण केलेलं नाही. त्यांच्यासोबतच्या २०० कार्यकर्त्यांचाही अन्नत्याग आंदोलनात सहभाग आहे. याप्रकरणी स्वाभिमानी नेते रविकांत तुपकर यांच्यासह इतर १८ जणांवर बुलढाणा शहर पोलिसांनी दंगल करणे, शासकीय कामात अडथळा आणणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी त्यांना अज्ञातस्थळी पोलीस कोठडीत ठेवलं आहे.