Monday, June 30, 2025

रश्मी शुक्ला, सदानंद दाते यांची पोलीस महासंचालकपदी बढती

रश्मी शुक्ला, सदानंद दाते यांची पोलीस महासंचालकपदी बढती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालकपदी बढती मिळाली आहे. कॅबिनेट नियुक्ती समितीकडून ही बढती देण्यात आली आहे. शुक्ला यांच्या समवेत भारतीय पोलीस प्रशासन सेवेतील अतुलचंद्र कुलकर्णी, सदानंद दाते यांच्यासह २० आयपीएस अधिकाऱ्यांनाही बढती देण्यात आली आहे.


दिल्ली येथे पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालकपदी बढती एसीसीकडून मंजूर करण्यात आली आहे. रश्मी शुक्ला या मार्च २०१६ ते जुलै २०१८ या कालावधीत पुणे पोलीस आयुक्त होत्या. त्या सध्या हैदराबाद येथे कार्यरत आहेत. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून त्या तेथे काम करत आहेत.


सदानंद दाते हे मुंबईतील कायदा व सुवस्था तसेच गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त होते. २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात दाखवलेल्या शौर्याबाबत दाते यांचा गौरवही करण्यात आला. ते तीन वर्षे केंद्रीय राखीव पोलीस दलाचे अतिरिक्त पोलीस महासंचालकही होते. मीरा-भाईंदर पोलीस आयुक्त म्हणूनही त्यांनी काम केले आहे. सध्या ते महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.


तर अतुलचंद्र कुलकर्णी हे सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणेत (एनआयए) कार्यरत आहेत. त्यांनी इंटेलिजेंस ब्युरोमध्ये (आयबी) काम केले आहे. मुंबई गुन्हे शाखेत ते कार्यरत होते. ते महाराष्ट्र एटीएस व सीआयडी प्रमुखही होते.

Comments
Add Comment