
अलिबाग (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांनी प्रत्येक स्पर्धेत सहभागी झाले पाहिजे. क्रीडा क्षेत्रात कामगिरी करीत असताना कोणी जिंकेल, कोणी हरेल; पण हताश होऊ नका. कारण प्रत्येक अपयश आपल्याला नवीन गोष्टी शिकवून जाते. काय चुका करू नयेत हे शिकवते. अपयशातूनच यशाचा राजमार्ग मिळतो. तुम्ही फक्त खेळांचा आनंद घ्या, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले. पीएनपी एज्युकेशन सोसायटीची सायरस पुनावाला सीबीएसई स्कूल नागाव येथे नुकतेच दोन दिवसीय स्पोर्ट्स डे, विज्ञान प्रदर्शन आणि बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, नृत्य दिग्दर्शक जयेश पाटील, डॉ. चंद्रकांत वाजे, अॅड. भूमी कोळी, नागावचे सरपंच निखिल मयेकर, सदस्या हर्षदा मयेकर, विशेष कार्यकारी अधिकारी संजय मिर्जी, मुख्याध्यापिका रसना व्यास आणि इतर मान्यवर, विद्यार्थी व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी पालक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पीएनपी सायरस पुनावाला शाळेचा परिसर, शाळेची इमारत, क्रीडा सुविधा अत्यंत सुंदर आहेत. संपूर्ण रायगड जिल्ह्यात अशी सुंदर व परिपूर्ण शाळा नसेल. त्याचप्रमाणे विद्यार्थी देखील अत्यंत तल्लख बुद्धीचे आहेत. ही शाळा, या शाळेतील सुविधा बघून फार आनंद झाला असल्याचेही त्यांनी सांगितले. समारोपप्रसंगी नागावचे सरपंच निखिल मयेकर, सदस्या हर्षदा मयेकर, डॉ. राजेंद्र चांदोरकर, डॉ. राजश्री चांदोरकर, डॉ. गणेश गवळी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी दोन दिवसीय विविध क्रिडा स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षिसे देवून गौरविण्यात आले. पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांनी सांगितले की, स्वर्गीय प्रभाकर पाटील यांच्या प्रेरणेने शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात कार्यरत आहोत. या क्षेत्रात अजून खूप वाटचाल करायची आहे. ही शाळा खरतर सर्वांची म्हणजेच पालकांची आणि कर्मचाऱ्यांची आहे. त्यांच्यामुळे शाळेचे चांगले अस्तित्व आहे. खेळ म्हंटले की, हरणे-जिंकणे आलेच. मात्र तुम्ही दडपण न घेता त्या क्षणाचा आनंद घ्या, असे त्यांनी सांगितले.