मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्याआगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मिशन १५० ठरविण्यात आले आहे. त्या आनुषंगानेच मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अॅड. आशीष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई प्रदेश भाजप कार्यकारणीची बैठक रविवारी १२ फेब्रुवारी रोजी दादर येथील कार्यालयात पार पडली. मात्र भाजपचे हे मिशन १५० म्हणजे नेमके काय आहे? याची चर्चा मुंबईच्या राजकीय वर्तुळात रंगल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान मुंबई महानगरपालिका निवडणुकांबाबत शिवसेना, भाजपसह इतर पक्षांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे. प्रत्येक पक्षाने आपली रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. यावेळी शिवसेना आणि भाजप पुन्हा एकदा आमनेसामने येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारी मुंबईत भाजपची कार्यकारणी बैठक पार पडली. या बैठकीला भाजपचे मुंबईतील खासदार, आमदार, नगरसेवक आणि मुंबईचे पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत विनोद तावडे, राष्ट्रीय सरचिटणीस,भाजप, चंद्रशेखर बावनकुळे – प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र भाजप, पूनम महाजन, अॅड. आशीष शेलार यांनी या बैठकीदरम्यान पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन आणि सूचना दिल्या. भाजपच्या मिशन १५० ला रविवारपासून सुरुवात झाल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान या बैठकीत मुंबई पालिकेत १५० नगरसेवक निवडून येतील, या दृष्टीने नेत्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच शिवसेनेच्या कार्यकाळात झालेला भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा राजकीय ठराव, प्रत्येक वॉर्डमध्ये विरोधकांची स्थानिक पातळीवरील चुकीची कामे लोकांच्या निदर्शनास आणणे.
पक्ष संघटन आणखी मजबूत करून विविध कार्यक्रम राबवणे, राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने घेतलेले निर्णय लोकांपर्यंत पोहोचवणे. मुंबईतील मूलभूत सोयीसुविधा लोकांपर्यंत पोहोचविणे, माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर भर देणे, जिथे भाजपचा नगरसेवक तिथे भाजप उमेदवार दिला जाईल, जिथे सेनेचा तिथे शिंदे गट किंवा आपला चांगला उमेदवार देऊ. इतर पक्षाचे नगरसेवक आहेत. त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी आपला जोर लावा, त्या जागा आपण लढवू असे यावेळी सांगण्यात आले.
आगामी निवडणुकीत भाजपने जे लक्ष्य निश्चित केले आहे, ते कसे साध्य केले जाईल याचे समीकरण विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांनी मांडले.