विवाह म्हटलं की, वधूचा आणि वराचा शोध सुरू होतो. काही लोकांना नात्यातलेच वधू-वर मिळतात. काहींना योग्य वधू आणि योग्य वर शोधण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. मग काही लोक वैवाहिक संस्थांचा आधार घेतात. काही संस्था नोंदणीकृत असतात, तर काही वैवाहिक संस्था या घरात बसून गृहिणी चालवत असतात. वधू आणि वराकडून ठरावीक रक्कम व बदल्यात दोन्ही पक्षाकडून साडी असे या गृहिणी घेत असतात.
रामराव यांना दोन मुलगे व एक मुलगी. मुलीचे नाव सीमा. रामराव हे बीएमसीमधून रिटायर झालेली व्यक्ती. सीमा हिने ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर एका प्रायव्हेट शाळेमध्ये सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत होती. रामराव हे आता आपल्या मुलीसाठी एका वराच्या शोधात होते. त्यांच्या नात्यातली एक महिला विवाह संस्था चालवते, असे त्यांना कळले. म्हणून रामराव हे आपल्या मुलीला घेऊन त्या महिलेला भेटायला गेले. त्या यशोदा नामक स्त्रीने मुलगा आहे, पण तुम्हाला अगोदर मला वीस हजार रुपये द्यावे लागतील व लग्न ठरल्यानंतर साडी-चोळी देणे अशी आमच्यात पद्धत आहे. असं तिने रामराव यांना सांगितलं. वीस हजार रुपये दिल्यानंतर तुम्हाला मुलीचं लग्न ठरेपर्यंत आम्ही तुम्हाला मुलं दाखवत राहू, असं तिने सांगितलं. रामराव आणि सीमा या गोष्टीला तयार झाले आणि त्यांनी वीस हजार रुपये भरले. यशोदा हिने आपल्या मावस बहिणीचा भाचा संतोष याचं स्थळ सीमा हिला सुचवलं. रामराव यांनी विचार केला की, आपल्या नात्यातली स्त्री लग्न ठरवणारी आहे व तिच्या नात्यांमध्ये मुलगा आहे. सीमाचं लग्न करायला काहीच हरकत नाही. मुलगा हा एकुलता एक होता तो आणि त्याची आई एवढंच त्यांचं कुटुंब होतं. मुलगा बिल्डरच्या हाताखाली कामाला होता. संतोष आणि त्याची आई विधवा मामीकडे राहत होते. मामीलाही तीन मुली होत्या. लग्न झाल्यानंतर आम्ही वेगळे राहू, असं मुलाची आई बोलली होती. लग्न ठरवणाऱ्या यशोदाने सांगितलं होतं की, मुलगा चांगला आहे. निर्व्यसनी आहे. या सर्व गोष्टीवर विश्वास ठेवून रामराव यांनी सीमा व संतोषचा विवाह करण्याचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी तिला लागणाऱ्या सर्व वस्तू फ्रीज, शोकेस, कपाट व घरातील भांडी सर्व रामराव आणि त्यांच्या मुलाने आपल्या मुलीला दिल्या. लग्न झाल्यानंतर संतोष व त्याची आई यांनी मामीकडे राहत असलेल्या बिल्डिंगमध्ये रूम भाड्याने घेतली व तिथे सीमा संतोष आणि त्याची आई राहू लागले. वडिलांनी दिलेला लग्नात अाहेर म्हणून सर्व वस्तू तिने आपल्या घरात आणल्या. म्हणजे जेव्हा लग्न केलं, तेव्हा नवऱ्याच्या घरात सुई नव्हती, अशी अवस्था संतोषच्या घरची होती. लग्न झाल्यानंतर काही गोष्टी सीमाला कळू लागल्या की, संतोषवर त्याची मामी जास्त अधिकार गाजवत आहे. संतोष सकाळी कामाला निघाला की, पहिल्यांदा मामीच्या घरी जायचा. तिला भेटायचा आणि नंतर कामावर जायचा. कामावरून आला की, घरी न येता मामीच्या घरी जायचा व घरी एक दीडला यायचा. या गोष्टीबद्दल सीमाने संतोषला विचारले असता तो सरळ उत्तर द्यायचा की, माझी मामी ही माझ्या आईपेक्षा मला जास्त प्रिय आहे. सीमालाही वाटायचं की, संतोष आणि त्याच्या आईला तिने आसरा दिला म्हणून तो कदाचित मामीला आईपेक्षाही मानत असेल. पण आठ वाजता कामावरून आलेला संतोष मामीकडे जायचा तो एक किंवा दीडला यायचा. ही गोष्ट मात्र कुठेतरी सीमाला खटकत होती आणि मामीचा संतोषला आदेश होता की, सीमाने कामावर आणि कामावरून येताना माझ्या पाया पडून जायला हवे. त्यामुळे ही गोष्ट सीमाला विचित्र वाटत होती. तरी सीमा आपल्या नवऱ्यासाठी ते करत होती. सीमा जो पगार घेत होती, त्या पगारात सीमाला घर-सामान भरण्याचा अधिकार नव्हता. ते सर्व पैसे त्याची मामी घेत असे आणि मामी घरातलं सामान भरत असे. ही गोष्ट सीमाच्या मनाला फार लागत होती की, आपला संसार आहे. आपण बघायचा का दुसऱ्यांनी बघायचा? हा प्रश्न तिला पडलेला होता. घरात काही आणायचं असेल, तर मामीला पहिल्यांदा विचारायचा. सीमाच्या घरात सगळ्या वस्तू सीमाच्या वडिलांनी दिलेल्या होत्या. सीमा अजूनपर्यंत स्टोव्हरवर जेवण करत होती. तिच्याकडे साधा गॅसही तिला संतोषने घेऊन दिला नव्हता. कारण काय तर मामीने नको म्हटलेला आहे म्हणून. मामी सांगेल तसंच संतोष आणि संतोषची आई करत होती. या गोष्टीची सगळी खबर तिने आपल्या माहेरच्या लोकांना सांगितली. माहेरच्या लोकांनी एक साधी मीटिंग घेतली. त्यामध्ये संतोष सरळ बोलला एक वेळ मी सीमाला सोडून देईन पण मामीला सोडणार नाही. संतोषच्या तोंडचे हे वाक्य ऐकून सीमासकट सीमाच्या माहेरची लोकं आश्चर्यचकित झाली. लग्न ठरताना सीमाला सांगण्यात आलं होतं की, संतोष हा निर्व्यसनी आहे, पण इथे तर लग्न झाल्यापासून संतोष दररोज दारू पिऊन घरी येत होता. कधी कधी तर स्वतःच्या अंगावरच्या कपड्यांचेही त्याला भान नसायचे. बिल्डरच्या ऑफिसमध्ये दोन लाखांची अफरातफर केली म्हणून तो आता घरीच बसून होता. त्याच्या वडिलांनी बिल्डरच्या हाता-पाया पडून पुन्हा त्याला कामावर रुजू करून घेतलेलं होतं. रामराव यांनी पनवेलला रूम घेतला होता आणि त्या रूममध्ये त्यांचा मोठा मुलगा राहत होता. संतोष सीमाला सांगू लागला की, ‘तुझ्या वडिलांना सांगून तो रूम मला दे. तुझ्या भावाला घरातून बाहेर काढा किंवा मला टू बीएचके घेऊन द्यायला सांग. त्यामध्ये आपण सर्वजण म्हणजे मामी, तिच्या तीन मुली आणि आपण तिघं सर्व राहू, असं सांगत तो सीमाच्या मागे लागला. सीमा या गोष्टीला नकार देत होती, म्हणून दारू पिऊन येऊन तिला मारझोड करू लागला. सीमाने कसं तरी वर्षं तिथे काढले आणि सगळ्या गोष्टी तिला हळूहळू समजू लागल्या. संतोष आणि त्याच्या मामीचं अनैतिक संबंध होते आणि म्हणून तो मामीपासून लांब जाऊ इच्छित नव्हता. सीमाला आता आपण कुठेतरी फसलो गेलो आहोत याची जाणीव झाली. ती आपल्या माहेरी आली. रामराव यांनी संतोषच्या विरुद्ध पोलिसात तक्रार केली. त्याच्या विरुद्ध ४९८ कोर्टामध्ये दाखल झाला. अनैतिक संबंध, पत्नीकडून हुंडा मागणी आणि दारू पिऊन मारझोड करणे. या गोष्टी अंतर्गत सीमाने त्याच्यावर केस टाकली तरीही तो कोर्टात येत नव्हता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर केस सेटलमेंटसाठी करण्याचे दोन्ही पार्टीने ठरवलं होतं. कारण सीमाला याच्याबरोबर संसार करून काहीही पुढे होणार नव्हतं. सीमाचंच आयुष्य उलट बरबाद होणार होतं. म्हणून पुढे म्युचल अंडरस्टँडप्रमाणे घटस्फोट घेण्याचे ठरलं. पण सीमाची जी फसवणूक केलेली होती व तिला मारझोड व वस्तूच्या रूपात हुंडा घेतलेला होता, त्याची नुकसान भरपाई तिला हवी होती, म्हणून पाच लाख रुपये तिने संतोषकडे मागितले ते दोघांच्या वकिलाने समजूत घालून ते दीड लाखांपर्यंत करण्यात आले. सीमा आणि सीमाच्या वडिलांनी यशोदा नावाच्या त्या स्त्रीला जिने लग्न ठरलं होतं तिला या गोष्टीबद्दल विचारले असता, तिने सरळ सांगितलं, माझ्या नात्यातला मुलगा होता म्हणून मी ठरवलं. मला काय माहीत, तो दारू पीत होता की त्याचे अनैतिक संबंध होते. मी फक्त दाखवण्याचं काम केलं. असं म्हणून तिने हात वरती केले. मुलीचं नशीब खराब. त्याला मी काय करणार. अशी उडवा-उडवीची उत्तरे ती देऊ लागली.
घरगुती विवाह संस्थेवर विश्वास ठेवून सीमाचं आयुष्य अक्षरश: बरबाद झालेलं होतं. खरोखर या घरगुती विवाह संस्था असतात त्या वधू-वर दाखवण्याचं काम करतात. त्यांची पूर्ण चौकशी त्यांनी केलेली असते का? तर नाही, असंच उत्तर येईल. कारण फक्त ही मुलं दाखवण्याची काम करतात. पण आपण ज्याला दाखवत आहोत. त्याला तोवर किंवा वधू योग्य दाखवत आहोत का? याचा मात्र ते विचार करत नाहीत. त्यांना फक्त दोन्ही पक्षाकडून मिळणाऱ्या पैशांशी मतलब असतं. पण, या पैशांच्या मतलब असलेल्या गोष्टींमुळे अनेक मुलांची विवाह हे संतुष्टात येत आहेत. याचा विचारही वैवाहिक संस्था करत नाहीत. त्यावेळी मात्र आमचा काही संबंध नाही, असा अाविर्भाव या संस्था आणतात.
-अॅड. रिया करंजकर
(सत्यघटनेवर आधारित)