अध्यक्षपदाचं भाषण लिहिताना काका बरेच विचारात गुंतलेले. काय लिहावं या विचारात असतानाच मागून खाकरत असलेल्या काकूंचा खरखरीतपणा त्यांना स्पष्ट जाणवू लागलेला. काकू वारंवार काकांच्या शेजारी येऊन उगाचच खाकरत राहिलेली. तसे काका भुवया वर करत राहिलेले. न राहवून म्हणाले, ‘बस कर आता, किती खाकरत राहशील? इथे सोसायटीच्या समारंभाचं भाषण सुचत नाहीये मला.’
‘मी देऊ का लिहून?’
‘काही गरज नाही. माझं मी लिहीन. खाकरत राहायची गरज नाही.’
‘कालपासून भाषण लिहीत बसला आहात, एक शब्द तरी सुचला का? आणि सुचेल तरी कसा, सारं लक्ष आत-बाहेर लागलेलं आहे तुमचं…’ काकू पुन्हा खरखरली. काकांना ‘ते बोल’ नाही म्हटले तरी लागलेच. तसं त्यांनी रागानेच काहीतरी लिहायला घेतलं. पटपट लिहून तो कागद खिशात घालून ते बाहेर गेले. सायंकाळी समारंभ म्हणून ते घरातून निघून गेले आणि बऱ्याच वेळाने परतले. काकू त्यांची वाट पाहत राहिलेली. त्यांना घरी आलेली पाहताच हलकेच म्हणाली, ‘काय हो, भाषण लिहून झालं का?’
‘हो.’ काकांनी दिमाखाने केसावरून हात फिरवला. तसे काकूंचे लक्ष त्यांच्या केसांकडे वळले.
‘अच्छा, म्हणजे तुम्ही आता स्वतःला सेट करायला गेला होतात तर… अध्यक्ष म्हणून मिरवायचं आहे. भाषणही तितकंच तोडीचं व्हायला हवं तुमचं.’ काकू म्हणाली.
‘अगं तू काय बोलतेस?’ काकांनी रागाने तिच्याकडे पाहिलं.
‘मला तुमचं भाषण वाचायला द्या बघू. काय लिहिलं ते बघू दे मला.’
‘नको, अजिबात नको.’ काकांनी तिला भाषण द्यायला नकार दिला. पण, काकांचं भाषण मनोमन ऐकण्याची उत्सुकता लागून राहिलेली. काकूदेखील कार्यक्रमाच्या तयारीला लागलेली. काकांचा दिमाख पुऱ्या सोसायटीत आहे हे तिने जाणलेलं. तशा अनेकजणींकडून त्यांच्याविषयीच्या अनेक तक्रारी तिने ऐकलेल्या. पण आता संसार जुना झाला तरी प्रेमाची गोडी काही कमी झाली नव्हती. अनेकींना चष्म्याच्या गोलाईतून निरखताना काकांना काकूने बरेचदा पकडलंही होतं. मित्रांच्या घोळक्यात काकांचं वागणंही जरा खटकायचं काकूंना. कधी कधी चिडणं, रागावणं असलं तरी आता संसार जुना झाला. काका आता सुधारलेत हे काकूंच्या लक्षात आलेलं. काकांचा स्वभाव पूर्वीसारखा राहिला नाही, तरी आत-बाहेर, शेजारी डोकावायच्या सवयीला मुरड घालता येत नाही, हे तिने जाणलेलं. पण आता संसार जुना झाला म्हणून तिने साऱ्याकडे दुर्लक्षच केलेलं.
काकू सायंकाळची वाट पाहत राहिलेली. तिला काकांच्या भाषणाची उत्सुकता लागून राहिली. काकू नटली. भरजरी साडी नेसून पहिल्या रांगेत बसली. काकाही तेवढेच दिमाखाने सजले. काका-काकूंचा जोडा शोभण्यासारखाच. कदाचित काका रंगमंचावर विराजमान झाले, तर काकूंनाही बोलावतील या अपेक्षेने काकू आस लावून राहिलेली.
काही वेळाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. रंगमंचावर बरीच मान्यवर मंडळी जमली. पाहिलं तर काकूंची शेजारीण काकूच्याच तोडीची साडी नेसून रंगमंचावर विराजमान झालेली. बाजूलाच काकादेखील बसलेले. काकूला वाटलं आता आपल्याला बोलावतील. पण नाही, काकूला कुणी बोलावलंच नाही. तशी काकू अस्वस्थ झाली. किमान काकांनी तरी तिला वर बोलवावं ही अपेक्षा होती, पण काकांनी लक्षसुद्धा दिलं नाही.
जाऊ दे, म्हणून मग काकूंनी दुर्लक्ष केलं आणि आता काका अध्यक्षीय भाषणासाठी उठतील या अपेक्षेने ती काकांकडे पाहत राहिली. पण जेव्हा अध्यक्षीय भाषणाची वेळ आली, तेव्हा मात्र काकांच्या जागी शेजारीणच अध्यक्षीय भाषणासाठी उभी राहिली. तिचं नाव पुकारून काकांनी तिला गुलाबपुष्प दिले.
तशा काकूने भुवया उंचावल्या. काकांना काय वाटेल म्हणून ती दुःखी झाली, पण काका आनंदाने टाळ्या वाजवत राहिलेले. शेजारीण उठली आणि दिमाखात भाषणासाठी उभी राहिली. तिच्या हातात काकांनी लिहिलेला भाषणाचा कागद होता. काकांनी तत्पूर्वी तिचं रेड रोझ देऊन केलेलं स्वागत काकूच्या डोळ्यांत साठलं. वर हे अध्यक्षीय भाषण ती करतेय म्हटल्यावर काकूंचे डोळेच भरून आले.
तिच्या लक्षात आलं, अध्यक्षीय भाषणाचा काकांनी कालपासून जो आटापिटा चालविला होता, तो स्वतःसाठी नव्हताच मुळी, सोसायटी समारंभाच्या अध्यक्षपदी काका नव्हतेच मुळी, तर होती ती शेजारीण आणि यांनी तिला भाषण लिहून तिच्यावर मोठे उपकार केले असल्यासारखे वागून ते तिच्या नजरेत फार महान बनले होते.
काकूला वाटलं काका अध्यक्ष आहेत आणि भाषणही करणार आहेत, पण काकांना शेजारणीचा आलेला पुळका काकूने आपल्या डोळ्यांनी पाहिला आणि कशाचंही दुःख न करता, संसार आता जुना झाला तरी खोड काही गेली नाही, असा विचार करून भर सभेतून उठून तिची पावलं घराकडे वळली.
-प्रियानी पाटील