Saturday, July 13, 2024
Homeसाप्ताहिककिलबिलहाती आलेला दिवस

हाती आलेला दिवस

खूपच दुःखी चेहऱ्याने आसपास माणसे वावरत असतात. कोणती दुःखे त्यांना दिवसभर छळतात, माहीत नाही. दिवसभरात काहीच चांगलं घडत नाही का? थोडा बुद्धीला ताण देऊन बघा. दिवसभरात खूप चांगल्या घटना घडलेल्या असतात. फक्त आपले त्यांच्याकडे लक्ष नसते म्हणून त्या लक्षात येत नाहीत.

सकाळी उठून सकाळचा चहा घेतो, त्याचीही चव कधीकधी खूप वेगळी असते, अमृततुल्य असते. आपले जर त्याच्याकडे लक्ष असेल, तरच लक्षात येणार ना? गॅलरीत लावलेल्या गुलाबाला, कालपर्यंत जे खोडके वाटत होते त्यावर एक हलकीशी कळी उगवलेली असते म्हणजे आज नाहीतर उद्या इथे गुलाब नक्कीच फुलणार असतो!

टीव्हीवरचे चॅनेल बदलताना सहज आपल्या अत्यंत आवडीच्या गाण्याची लकेर ऐकू येते किंवा जर आपल्या आवडीचा हिरो दिसला तर काय प्रश्नच नाही… आईपासून लपवून चोरून मैत्रिणींबरोबर दूरवरच्या थिएटरमध्ये पाहिलेला सिनेमा आठवतो. एकदा सिनेमा आठवला की, अनेक गोष्टी त्या आनुषंगाने आठवतात जसे तेव्हा खाल्लेला सामोसा असेल किंवा एखादीने सिनेमानंतर दिलेली आईस्क्रीमची पार्टी असेल. काही जणांना तर आपल्या पहिल्या प्रियकरासोबत पाहिलेला सिनेमासुद्धा आठवू शकतो. आता मी काही प्रत्येक गोष्ट इथे लिहिण्याची गरज नाही. तुमच्या मनातले सगळे मळभ दूर होऊ शकतील, इतके भरभरून जगल्याचे सगळे समृद्ध क्षण…

ऑफिसमध्ये जाण्यासाठी बसस्टॉपवर उभे राहिल्यावर कोणीतरी अचानक लिफ्ट देऊन जातो. कधी कधी तो दूरचा तर कधी जवळचा ओळखीचा माणूस असू शकतो किंवा बस वा ट्रेनमध्ये चढल्यावर मिळालेली विंडो सीट. रस्त्यावरून जाणारी माणसे पाहताना जर एखादा भिकारी आपण पाहिला की, ज्याला पाय नाही किंवा डोळे नाहीत आणि तेव्हा आपल्याकडे काय नाही?, असे वाटल्याची क्षणिक भावना…

जाताना आपल्या मुलाने हात धरून ठेवला आणि विनवले की ‘नको ना जाऊस आज!’ त्याच्या डोळ्यांतले भाव हा सुद्धा खूप मोठा आनंदाचा ठेवा असू शकतो की, कोणालातरी आपली खूप गरज आहे, आपली सोबत हवीशी वाटत आहे. एखाद्या दिवशी ऑफिसमध्ये काहीच काम नसणे किंवा कोणाशीही भांडण/ वाद न होणे.

दमून-भागून घरी परतताना ट्रेनमध्ये अचानक मोगऱ्याचे गजरे असलेली टोपली घेऊन एखादी बाई चढणे आणि संपूर्ण वातावरण सुगंधित होणे. पैसे खर्च करून ते विकत घेण्याची गरज नसते; परंतु तो सुगंध श्वासात भरभरून घेण्याची अनुभूती आहे. रस्त्यातून घराकडे परतताना आपल्या रोजच्याच पालेभाजीकडे सहसा न दिसणारी घोळाची भाजी दिसून येणे… लहानपणी आईच्या हाताच्या घोळाच्या भाजीच्या केलेल्या वड्या आठवणे… आणि मग त्या आनुषंगाने लहानपणीचे असंख्य पदार्थ त्याक्षणी आठवणे. ऑफिसमधून परतल्यावर घरात पाऊल टाकताच सासूबाईंनी ‘चहा करू का?’ विचारणे. मग उत्साहाने आपणच दोघींसाठीही चहा बनवणे आणि एकत्रितपणे त्याचा आस्वाद घेणे.

ही यादी कितीही लांबवता येईल. प्रत्येक माणसाला आनंददायी एकच वाक्य लिहायला सांगितले तरी लाखो वाक्ये या लेखामध्ये भर घालणारी ठरतील! कुठेतरी थांबायला हवे. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एकतरी चांगली घटना दिवसभरात घडतेच! फक्त गादीवर पहुडल्यावर ती घटना आठवणे, हे महत्त्वाचे आहे!

तर आजपासून संकल्प करूया की, माझ्या आयुष्यात खूप चांगल्या घटना घडतात त्यांची नोंद मी आजपासून घेणार आणि आनंदाने झोपणार. स्वतःला सुखद स्वप्नांच्या हवाली करणार! ‘हाती आलेला दिवस’ पुढच्या भविष्यकाळातील जगण्याच्या कोलाहलात आनंद निर्मितीसाठी जपून ठेवणार!

-प्रा. प्रतिभा सराफ

pratibha.saraph@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -