Tuesday, February 11, 2025

चतुर राम

बरं का बालमित्रांनो! तशी ही काही फार जुनी गोष्ट नाही आहे. अलीकडच्याच तुमच्या-आमच्या काळातील थोड्या मागील वर्षांपूर्वीची. आसलगाव या गावी श्यामराव नावाचे एक जमीनदार राहत होते. श्यामरावांना थोडासुद्धा गर्व नव्हता.

गावकऱ्यांच्या संकटात, तर ते नेहमी धावून जात असत. त्यामुळे गावात त्यांच्या शब्दाला मान होता. गावातील सारे सार्वजनिक व धार्मिक उत्सव त्यांच्या पुढाकारानेच व सा­ऱ्या गावक­ऱ्यांच्या सहकार्याने अगदी धुमधडाक्यात नि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडत असत. या श्यामरावांच्या सुशील पत्नीचे नाव होते राधिका. ती सुद्धा श्यामरावांप्रमाणेच सहाय्यकारी स्वभावाची होती. अडल्या-नडल्या बायामाणसांना तीही अपुलकीने मदत करीत असे. असे हे श्यामराव व राधिकाबाईंचे कोणाच्याही कामात पडणारे परोपकारी वृत्तीचे जोडपे होते. बरे हे दोघंही अतिशय देवभोळे होते. ईश्वरावर त्यांची नितांत श्रद्धा होती. प्रभू रामचंद्राचे ते दोघेही अतिशय भक्त होते.

रामनवमी, गोकुळाष्टमी, हनुमान जयंती आदी उत्सव, तर ते संपूर्ण गावासाठी स्वखर्चाने साजरे करीत असत. अशाच एका रामनवमीच्या दिवशी बाहेर रामनवमीचा उत्सव रंगात आला असताना इकडे घरात राधिकाबाईंनी एका गोंडस बाळाला जन्म दिला आणि श्यामरावांना पुत्ररत्न प्राप्त झाले. रामनवमीला जन्म झाला म्हणून सर्वानुमते बाळाचे नाव राम ठेवण्यात आले. श्यामराव जमीनदारांचा वाडा जरी मोठा होता तरी शेतकऱ्यांच्या घरात माल ठेवायला कितीही जागा असली तरी कमीच पडते. त्या काळात स्वयंपाकासाठी घरोघरी काही आजच्यासारख्या गॅसच्या शेगड्या नव्हत्या. गृहिणींना चुलीमध्ये सरपण घालून, पेटवून चुलीवर स्वयंपाक करावा लागायचा. त्यासाठी शेतकरी असो वा शेतमजूर प्रत्येकाच्या घरी खूप सरपण साठवून ठेवलेले असायचे.

ते पावसाळ्याचे दिवस होते. पावसाळ्याच्या दिवसांत ओल्या सरपणावर स्वयंपाक करताना खूप धूर व्हायचा, हवेचे प्रदूषण खूप व्हायचे. त्यामुळे गृहिणींना अत्यंत त्रास व्हायचा, धुराने डोळे चुरचुरायचे. हा त्रास टाळण्यासाठी व सरपण ओले होऊ नये म्हणून प्रत्येकजण आपल्या घरात उन्हाळ्यातच कोरड्या सरपणाचा भरपूर साठा करून ठेवायचे. याला श्यामराव तरी कसे अपवाद असणार? त्यांच्या घरीसुद्धा पावसाळ्याच्या तोंडावर स्वयंपाकघराजवळच्या खोलीत त्यांच्या गडीमाणसांनी असाच सुकलेल्या सरपणाचा भरपूर साठा करून ठेवला होता. रामने आपल्या प्रेमळ वागण्याने साऱ्यांची मने जिंकून घेतली होती. घरात तो साऱ्यांचा लाडका होता. त्यामुळे राधिकाबाई सहसा संध्याकाळी त्यालाच विचारून स्वयंपाक करायच्या. एका दिवशी राधिकाबाईंनी रामच्या आवडीची झुणका-भाकर करण्याचे ठरविले. झुणका-भाकरीचे नाव ऐकताच छोटासा राम तेथेच स्वयंपाक घरात आईशेजारी आनंदात खेळू लागला. राधिकाबाईंनी स्वयंपाक करण्यासाठी सरपण चुलीजवळ आणले. चुलीत जाळ करण्यासाठी त्या सरपणाची एक मूठ चुलीच्या तोंडात घालू लागल्या.

पावसाळ्याच्या दिवसांत विंचू-काट्यांची पैदास खूप होत असते. असे दंशक कीटक कोठून कोठे व अचानक कसे टपकतील याचा काही नेम नसतो. झुणका लवकरात लवकर केव्हा होईल, या उत्सुकतेपोटी राम खेळता खेळता मधून-मधून आपल्या आईकडे बघत होता. एवढ्यात त्याला सरपणातील एक मोठ्ठा काळाशार विंचू तुरूतुरू आपल्या आईच्या जमिनीवर टेकलेल्या लुगड्यावरून वर चढताना दिसला. राधिकाबाई आपल्या रांधण्यात रांधताना रामचे खेळातील कौतुक बघण्यात तल्लीन होत्या. त्यांचे काही त्या विंचवाकडे लक्ष नव्हते. आईला सावध केले, तर आई घाबरेल व एखाद्या वेळी तो विंचू आपल्या आईला चावेल हे पटकन रामच्या लक्षात आले. त्याने क्षणाचाही विलंब न करता पटकन आईच्या जवळ पडलेली सांडशी घेतली. चटकन विंचवाची वाकडी नांगी सांडशीत पकडली व झटकन त्याला लुगड्यावरून बाजूला फेकला. तेव्हा रामची कर्तबगारी आईच्या लक्षात आली. तोपर्यंत रामने त्याला मारूनसुद्धा टाकले. राधिकाबाईंनी मायेने रामचे गोड गोड पापे घेतले. येथेच रामच्या धाडसाचे पहिले-वहिले पाऊल पडले. साऱ्यांनी त्याचे कौतुक केले.

-प्रा. देवबा पाटील

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -