आजच्या लेखाचा विषय लक्षात आला असेल. सर्व कवी मंडळींचा, सौंदर्य व्यक्त करण्याचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे हे डोळे. उत्तमांगात श्रेष्ठ, ज्ञानेन्द्रियांपैकी महत्त्वाचा असा हा अवयव आहे. प्रत्यक्ष ज्ञान होण्यासाठी, सर्व जग पाहण्यासाठी डोळे आपल्याला खूपच आवश्यक आहेत. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सतत कामात असणारा असा हा अवयव आहे. या डोळ्यांची काळजी कशी घ्यायची, त्याचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आहारात काय गोष्टींचा समावेश करायचा, डोळ्यांच्या तक्रारी कशामुळे होतात, हे या लेखात पाहू.
वाचून कदाचित आश्चर्य वाटेल, पण डोळ्याविषयी आयुर्वेद शास्त्र संहितामधील सुश्रुतसंहितेत, संपूर्ण, स्वतंत्र स्थान सांगितले आहे. सर्जरीसाठी देखील ज्याला मान्यता आहे, असा हा वैद्यक शास्त्र प्रणेता आहे. हे सांगण्याचे कारण आजही यातील विषय तितकेच योग्य ठरत आहेत. यावरून हे आपल्या भारतीय वैद्यकशास्त्राचे शास्त्रीयत्व अजून अधोरेखित होते. गरज आहे ती सामान्य माणसाला. ते समजण्याची आणि प्रचारात त्याचा उपयोग सिद्ध होण्याची.
हे कळकळीने सांगण्याचे कारण, आज व्यवहारात चाळिशीतच मोतीबिंदू होण्याचे प्रमाण वाढताना दिसते आहे. एवढेच कशाला लहान मुलांमध्ये चष्मा लागणे हे सहज घेतले जात आहे. दृष्टी लवकर कमकुवक होते आहे. या गोष्टीकडे सजगपणाने पाहिले पाहिजे. विविध कंपन्यांचे चष्मे ते लेसिक आय सर्जरी या उपायांकडचाच फोकस वाढताना दिसतोय. असो.
आता बघू डोळ्यांच्या सामान्य रचनेविषयी – नयन नीयते दृष्टिविषयं अनेन इति। म्हणजे कोणतीही वस्तू दिसण्यासाठी डोळा हा महत्त्वाचा विषय आहे. चक्षुः तेजोमयम् पंचमहाभुतांपैकी तेज महाभुताचे अधिष्ठान डोळ्यांत असते. आलोचक पित्त हे पित्ताच्या पाच प्रकारांपैकी नेत्राचे ठिकाणी कार्यरत असते. मसुरदलमात्र असा दृष्टीपटल मध्यभागी त्या भोवती श्वेत, कृष्ण पटल, बाहेर पापण्यांचे आवरण असा हा अवयव डोक्यातील चेहऱ्यात विशिष्ट पद्धतीने खोबणीत स्नायूंनी स्थिर बसवलेला असतो. रक्ताचा सर्वात जास्त पुरवठा डोळ्यांना होतो. नेत्रविकार होण्यामागची कारणे – खूप उन्हात हिंडल्यावर लगेच पाण्यात जाणे, खूप लांबचे सतत पाहणे किंवा अतिशय बारीक गोष्टी पाहणे, खूप रडणे, चिडचिड करणे, दुःखी राहणे, मानसिक आघात होणे, धूर-धुळीशी संपर्क येणे, झोपेचे तंत्र बिघडणे, कोणताही नैसर्गिक, शारीरिक, मानसिक वेग धारण किंवा रोखला जाणे, अशा प्रमुख कारणांचा विचार डोळ्यांचे विकार निर्माण होण्यास कारणीभूत असू शकतात. तेव्हा अशा कारणांना वेळीच टाळण्याचा प्रयत्न केला, तर डोळ्यांचे आरोग्य दीर्घकाळ टिकायला मदत होऊ शकेल.
नेत्ररोग व नेत्रविकार : डोळ्यांच्या भागात उत्पन्न होणाऱ्या रोगांचा तसेच डोळ्यांच्या खाचेतील अस्थींना होणाऱ्या रोगांचा नेत्ररोगांत समावेश होतो. उदा., रांजणवाडी, खुपरी, पापणीशोथ, पापणीघात, नेत्रश्लेष्मशोथ (डोळे येणे). नेत्रविकारांमध्ये नेत्राघात, अधिहर्षता, फूल पडणे, तिरळेपणा, मोतीबिंदू, काचबिंदू, नेत्रदोल, हिमांधत्व, रातांधळेपणा, अंधत्व इत्यादींचा समावेश होतो.
रंगांधळेपणा : हा आनुवंशिक दोष आहे. ज्या व्यक्तित हा दोष असतो ती व्यक्ती रंग किंवा रंगाच्या छटा नीट ओळखू शकत नाही. रंगांधळेपणाचे प्रमाण पुरुषांमध्ये अधिक असते. वाहनचालक, रेल्वेचालक, संरक्षण दले, कापड उद्योग, रंगकारखाने, मुद्रणव्यवसाय इत्यादी ठिकाणच्या कर्मचाऱ्यांमध्ये हा दोष शोधण्यासाठी इशिहारा चाचणी घेतली जाते.
अंधत्व : डोळ्यास प्रत्यक्ष इजा होणे, आहारात अ-जीवनसत्त्वाची कमतरता होणे, पारपटल अपारदर्शक होणे, मोतीबिंदू, काचबिंदू, मधुमेहामुळे दृष्टिपटल सुटे होणे इत्यादींमुळे अंधत्व येऊ शकते. अ-जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे आलेल्या अंधत्त्वावर उपचार करता येतात. दृष्टिपटल सरकण्यामुळे आलेल्या अंधत्वावर तत्काळ उपचार करावे लागतात. अचानक दृष्टीत बदल जाणवल्यास किंवा डोळ्यांसमोर चमकल्यासारखे होऊ लागल्यास त्वरित नेत्रतज्ज्ञाचा सल्ला घ्यावा. मुदत संपलेली औषधे डोळ्यांमध्ये वापरू नयेत. अप्रशिक्षित व्यक्तींकडून डोळ्यांवरील उपचार टाळावेत. डोळ्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी आहारात पुढील गोष्टी जरूर ठेवाव्यात – गाईचे तूप, मध, रक्तसाळी तांदूळ, आवळा, मूग,
मसूर, तृणधान्ये.
Vitamin E, carotenoids असणारे पदार्थ आहारात घ्या. याखेरीज प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कौटुंबिक इतिहास समजून घ्या. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवा. बाहेर फिरताना डोळ्यांवर गॉगल-चष्मा स्वच्छ वापरा. धूम्रपान करणे टाळा. एरण्डेल तेल हे तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने पापण्यांची खाज येत असेल तर लावावे. ते जंतुनाशक आणि पापण्यांना येणारी सूज कमी करायला उपयोगी पडते. रात्री झोपताना तळपायाला नियमितपणे तुपाने पादाभ्यंग करावा. त्याने डोळ्यांपर्यंत होणारे रक्ताभिसरण चांगले राहते. थोडक्यात डोळ्यांचे आरोग्य महत्त्वाचे आहे. आता तंत्रयुगात तर ते विशेष महत्त्वाचे ठरणार आहे. तेव्हा वेळीच डोळ्यांच्या आरोग्याबद्दल डोळस होऊ या.
-डॉ. लीना राजवाडे
[email protected]