नेमेचि येती साहित्य संमेलने

Share

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९६वे साहित्य संमेलन वर्धा येथे नुकतेच पार पडले आणि आयोजकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. राजकारण्यांची उपस्थिती, साहित्यिकांची नाराजी, सुरक्षा यंत्रणेचा अतिरेक, आयोजकांचा निष्काळजीपणा, नियोजनातील ढिसाळपणा अशा अनेक मुद्द्यांवर सध्या वर्तमानपत्रांमध्ये रकानेच्या रकाने भरून येत आहेत. आणखी आठवडाभर संमेलनाचे हे धुरळे उडत राहतील आणि नंतर एकदाचे शांत होईल. अखिल भारतीय साहित्य महामंडळ पुढच्या संमेलनाच्या आयोजनासाठी पुन्हा सक्रिय होईल. संमेलनासाठी कोण-कोण इच्छुक आहे, याची यादी तयार होईल आणि ‘नेमेचि येती साहित्य संमेलने’ म्हणत संमेलनाच्या तयारीला वेग येईल.

एक वर्षापूर्वी उद्गीरमध्ये पार पडलेल्या ९५ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या वेळीही हेच घडले होते. त्याही आधीच्या संमेलनांच्या इतिहासात डोकावून पाहिले तर कमी अधिक प्रमाणात असेच काहीसे घडल्याचे आपल्याला दिसून येते. पण म्हणून कोणी आयोजने थांबवली नाहीत. नित्यनेमाने संमेलने होतच राहिली. त्यांच्यावर चर्चेचे धुरळेही उठत राहिले. पण तरी महामंडळ आपली जबाबदारी इमानेइतबारे पार पाडत राहिले आहे.

मागील वर्षी मे महिन्यात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेऊन ९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्धा येथे होणार असल्याची घोषणा केली, तेव्हापासून साहित्य संमेलनाच्या प्रत्येक घडामोडीची मूक साक्षीदार या नात्याने हा लेख लिहिते आहे.

विदर्भ साहित्य संघाचे यंदाचे हे शताब्दी वर्ष. त्यामुळे साहित्य संमेलन विदर्भात व्हावे, यासाठी तत्कालीन अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांनी पुढाकार घेतला होता. नियोजित संमेलनस्थळाची पाहणी केल्यानंतर महामंडळाने वर्धेच्या नावावर शिक्कामोर्तब केले. १९६९ सालानंतर परत एकदा वर्ध्याला साहित्य संमेलन होणार म्हणून वर्धेकर आनंदले होते.

दरम्यानच्या काळात मनोहर म्हैसाळकर यांचे निधन झाले. विदर्भ साहित्य संघासमोर मोठा पेचप्रसंग उभा राहिला. आता अध्यक्षाची धुरा कोण सांभाळणार, अशी चर्चा सुरू असतानाच वि. सा. संघाच्या वर्धा शाखेचे समन्वयक प्रदीप दाते यांचे नाव समोर आले. प्रदीप दाते हे आधीपासूनच विदर्भ साहित्य संघात सक्रिय होते. लोकसंग्रह, राजकीय वर्तुळातील वावर, मोठ्या कार्यक्रमांच्या आयोजनाचा अनुभव असलेले मितभाषी पण तितकेच उत्साही प्रदीप दाते विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष झाले. वर्ध्यात होऊ घातलेल्या साहित्य संमेलनाचे शिवधनुष्य ते पेलू शकतील, असा विश्वास त्यामागे होता कदाचित. अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी वर्धा जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय क्षेत्रातील लोकांच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली. साहित्य संमेलन घ्यायचे म्हणजे मोठ्या प्रमाणात पैशाची गरज भासणार होती. सर्व प्रकारची सोंगे आणता येतात, पण पैशाचे सोंग आणता येत नाही. अनेक आमदार, खासदारांच्या भेटी घेतल्यानंतर माजी खासदार दत्ताजी मेघे यांनी स्वागताध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. इतरांनीही मदतीसाठी हात पुढे केले. त्यामुळे भार थोडा हलका झाला.

वर्धेतील स्वावलंबी विद्यालयाच्या २३ एकरच्या विस्तीर्ण जागेवर तयारीला प्रारंभ झाला. निवास, भोजन, मंडप, वाहतूक, रंगमंच व सभागृह सजावट, सांस्कृतिक, पुस्तक प्रकाशन, ग्रंथ दालने, ग्रंथ दिंडी येथपासून तर रांगोळी, प्रतिनिधी नोंदणी, स्वागत, सत्कार, वैद्यकीय मदत अशा विविध समित्या स्थापन झाल्या. हजारो कार्यकर्ते कामाला लागले. जिल्हा प्रशासन, आयोजन समिती व विदर्भ साहित्य संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियमित आढावा बैठका होऊ लागल्या. संमेलनानिमित्त येणारे निमंत्रित व प्रतिनिधींची राहण्याची व्यवस्था हॉटेल्स, महाविद्यालये, यात्री निवास जिथे जिथे जागा मिळेल ते सर्व आरक्षित करण्यात आले.

कोणतीही घटना, आयोजन किंवा परिस्थितीकडे बघण्याचे ३६० कोन असतात. तुम्ही त्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघता यावरून त्या घटनेचे यशापयश ठरत असते. यशाची चर्चा फारशी होताना दिसत नाही, पण अपयश, वाद, भांडण-तंटे, रुसवे-फुगवे अशा नकारात्मक गोष्टींचे रवंथ करणारे लोक बरेच असतात. काही माणसे तर नकारात्मकता पसरवण्यासाठीच पेरलेली असतात, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. तशी ती आयोजन समित्यांमध्ये, विविध भागातून आलेल्या प्रतिनिधींमध्ये, साहित्यिकांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्येही दडलेली होती. साहित्य संमेलनाच्या तयारीच्या काळात त्याचा प्रत्यय पदोपदी येत होताच. उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी तर तो प्रकर्षाने जाणवला. संमेलनाध्यक्षांच्या भाषणात अडथळे निर्माण करणे, त्यांची गाडी रोखणे, आमंत्रितांचे मानधन अशा अनेक प्रसंगातून ही नकारात्मता वारंवार डोकावत राहिली. मोठ्या आयोजनांमध्ये कुठे खुट्ट जरी झाले तरी त्याचा आवाज मोठा होता, हे या नकारात्मक मानसिकतेच्या लोकांना चांगले ठाऊक असते. त्यामुळे त्याचा पुरेपूर फायदा घेत त्यांनी आपला उल्लू सिधा करून घेतला. साहित्य संमेलनाच्या नियोजनात, आयोजनात गडबड, गोंधळ नव्हता का? तर होता. निश्चितपणे होता. आपल्याही घरात जेव्हा छोटे-मोठे समारंभ होतात तेव्हा त्यांचेही बरेचदा नियोजन चुकते, आयोजनात गोंधळ उडतोच. सासरकडच्या मंडळींकडून एक तरी मानापमानाचा प्रयोग होतोच. मग हे तर अखिल भारतीय स्तरावरचे आयोजन होते. यात हजारो माणसे गुंतलेली होती. अशाही स्थितीत संमेलनाचा हा डोलारा उभा करण्याचे धनुष्य विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते यांनी आपल्या खांद्यावर पेलले. त्यांच्या खांद्याला खांदा देणारे अनेकजण जसे आयोजन समितीत होते तसे त्यांचे पाय खेचणारेही बरेच होते. त्याचे पडसाद दृश्य-अदृश्य स्वरूपात साहित्य संमेलनादरम्यान उमटत राहिले. असे गोंधळ, असे मानापमान केवळ याच संमेलनात झालेत असेही नाही. या आधीच्या संमेलनांचा इतिहास पाहिला तर आपल्याला असे जाणवते की, मंत्र्यांच्या अंगावर शाई फेकण्यापासून ते नारेबाजी, प्रमुख पाहुण्यांच्या नावावरून वाद, संमेलनाध्यक्षांच्या भाषणांवरून वाद झाल्याचे आपल्या निदर्शनास येते.

साहित्य संमेलनांचे फलित काय, असा एक सूर प्रत्येक संमेलनानंतर उमटतो. वर्धेतील ९६वे साहित्य संमेलन अनेक बाबतीत वेगळे ठरले. २३ एकराच्या जागेत भव्य स्वरूपात भरलेले हे कदाचित पहिलेच संमेलन असावे. ग्रंथप्रदर्शनासाठी मिळालेला विस्तीर्ण परिसर, संमेलनाच्या आधल्याच दिवशीपासून ग्रंथप्रदर्शनाला झालेली सुरुवात या जमेच्या बाजू म्हणता येतील. मागील दोन वर्षांच्या तुलनेत सुमारे ३ कोटी रुपयांची झालेली ग्रंथविक्री ही देखील संमेलनाची एक सकारात्मक बाजू म्हणता येईल. अनेक विषयांवरचे परिसंवाद, कविसंमेलने, कविकट्टा, गझलकट्टा, प्रकाशन मंच, वाचन मंच, बालसाहित्य मंच, बालचित्र प्रदर्शनी, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात साहित्यिक आणि कलाकारांना व्यासपीठ देण्याचे काम या साहित्य संमेलनाने केले. डॉ. अभय बंग यांच्या मुलाखतीने जसा साहित्य संमेलनाला सामाजिक टच दिला तसाच चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे, कवी सौमित्र व अभिनेते सयाजी शिंदे यांच्या भेटीने संमेलनाला ग्लॅमर आणून दिले. संमेलनाध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी वर्ध्यातच त्या काळात सुरू असलेल्या विद्रोही साहित्य संमेलनाला हजेरी लावून सौहार्दाचे दर्शन घडवले. शासनाकडून साहित्य संमेलनाचा दोन कोटींचा निधी तर मंजूर झालाच शिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भ साहित्य संघाने दहा कोटी रुपयांचा निधी जाहीर केल्यामुळे या संमेलनाने कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली. पण, या सकारात्मक गोष्टींची चर्चा कमी होते आहे. संमेलनातील तृटी काढण्यातच काहीजण धन्यता मानत आहेत. त्यांना त्यात समाधान मिळत असेल, तर मिळू द्यावे. आपण आठवडाभर शांत बसावे. हा चर्चेचा धुरळा आठवडाभराने खाली बसेल आणि महामंडळ परत एकदा पुढील संमेलन कोठे भरवायचे, यावर विचार करायला मोकळे होईल.

-मंजुषा जोशी, नागपूर

Recent Posts

चंद्रपूर: येत्या २४ एप्रिल पर्यंत उष्णतेचा ‘येलो अलर्ट’

चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…

28 minutes ago

KKR vs GT, IPL 2025: गुजरातविरुद्ध घरच्या मैदानावर कोलकत्त्याचा लाजिरवाणा पराभव

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…

7 hours ago

उबाठाला राणेंचा दणका! सिंधुदुर्गात होणार १५०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश!

२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…

8 hours ago

ही कणकवली नव्हे, कुडाळ आहे! निलेश राणे यांच्याशी पंगा नको!

माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…

8 hours ago

नाल्यातून गाळ काढताना ३० सेकंदाचा व्हिडीओ कंत्राट कंपनीला बंधनकारक

लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…

9 hours ago

PM Modi : आजची धोरणं, उद्याचं भारत! – पंतप्रधान मोदींचा नागरी सेवकांना मंत्र

PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…

9 hours ago