निर्मिती सावंत आणि अलका कुबल यांचं मनोरंजन विश्वात मोठं नाव आहे. दोघींनीही अॅक्टिंगपासून प्रोडक्शनपर्यंत विविध विभागांमध्ये स्वत:ला सिद्ध केलं आहे. या दोघींचं पडद्यापलीकडे एक अनोखं नातं आहे. अलका नेहमी निर्मिती यांना ‘वहिनी’ म्हणून संबोधतात. त्यामागील रहस्य त्यांनी ‘आलंय माझ्या राशीला’ या चित्रपटाच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने उलगडलं. आपल्या निर्मिती वहिनीबाबत अलका म्हणाल्या की, निर्मिती वहिनींसोबत पहिल्यांदाच सिनेमात काम करत आहे. यापूर्वी मी त्यांच्यासोबत कधी काम केलं नाही. पण त्यांच्या प्रोडक्शनच्या ‘आपलं माणूस’ या नाटकात काम केलं आहे. ‘आलंय माझ्या राशीला’ या चित्रपटाच्या निमित्तानं निर्मिती वहिनींसोबत काम करण्याचा योग जुळून आला. आमचं पडद्यापलीकडचं बाँडिंग खूप छान आहे. मी महेश सावंत यांना ‘महेशभैय्या’ म्हणायचे, त्यामुळे ती ‘माझी वहिनी’ आहे. ती सर्वांची ‘निर्मितीताई’ असली तरी मी तिला ‘वहिनीच’ म्हणते. असं आमचं खरंच वेगळं नातं आहे.
या चित्रपटात एंट्री करण्याबाबत सांगायचं, तर आनंद पिंपळकर हे वास्तुतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत. आपल्या राशी काय सांगतात ते अत्यंत नेमकेपणाने सांगत असल्यानं ते काय सांगतात, याबद्दल उत्सुकता असते. आपल्या राशीत काय आहे, हे वाचायला सर्वांनाच आवडतं. या चित्रपटासाठी दिलीप जाधवांनी काॅल करून सांगितलं की, ‘आलंय माझ्या राशीला’मध्ये एका राशीचं कॅरेक्टर तुला करायचं आहे. कॅरेक्टर ऐकल्यावर खूप आवडलं. मी जरी मेलोड्रामा खूप केला असला तरी असं काही वेगळं येतं तेव्हा वेगळा हुरूप येतो. ही कथा आताच्या काळातील आहे. माझी कथा पाहताना प्रेक्षकांच्या डोळ्यांत टचकन पाणी येईल. यात सर्व राशींचे सर्व गुण आहेतच, पण हा एक परिपूर्ण मनोरंजक चित्रपट आहे. अजित शिरोळेंसोबत प्रथमच काम करतेय.
ज्योतिष आणि भविष्याबद्दल सांगणाऱ्या ‘आलंय माझ्या राशीला’ या चित्रपटाचं लेखन हेमंत एदलाबादकर यांनी केलं आहे. यात चिन्मय मांडलेकर, मोहन जोशी, अतुल परचुरे, प्रसाद ओक, मंगेश देसाई, उषा नाईक, भार्गवी चिरमुले, अश्विनी कुलकर्णी, पौर्णिमा अहिरे, दिगंबर नाईक, संग्राम चौगुले, स्वप्निल राजशेखर, प्रणव पिंपळकर, सिद्धार्थ खिरीड आदी मराठीतील आघाडीची स्टारकास्ट आहे. ओंकार माने, प्रणव पिंपळकर या चित्रपटाचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहेत. गीतरचना गुरु ठाकूर, अभय इनामदार, कौतुक शिरोडकर यांनी लिहिल्या असून, पार्श्वसंगीत मिलिंद मोरे यांनी दिले आहे. छायांकन कृष्णा सोरेन यांचे, तर संकलन विजय खोचीकर यांचे आहे. नृत्यदिग्दर्शन सुजितकुमार, नरेंद्र पंडित, प्रीतम पाटील यांनी केलं आहे. अकबर शरीफ यांनी साहसदृश्ये, वासू पाटील यांनी कलादिग्दर्शन, तर श्रेयस केदारी, रितेश पवार यांनी व्हीएफएक्सची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे.