शहापूर(वार्ताहर) : थायलंड येथील सुमारे ११० भिक्खूंचा संघ तसेच त्यासोबत भारतातील भिक्खू संघ आणि हजारो धम्म उपासकांसह बुद्धांच्या अस्थी घेऊन परभणी येथून निघालेली ही अस्थिकलश, धम्मपदयात्रा शनिवारी शहापूर व वासिंद शहरात दाखल झाली. बौद्धधर्मीय बांधवांनी अस्थिकलश धम्मयात्रेचे मोठ्या संख्येने एकत्र येत स्वागत केले. ‘बुद्धम् सरणम् गच्छामि, धम्मम् शरणम् गच्छामि, संघम् शरणम् गच्छामि’च्या घोषाने वातावरण बुध्दमय झाले. मोठ्या संख्येने उपासकांनी या कलशाचे दर्शन घेतले.
तथागत बुद्धांच्या अस्थिकलशासोबत थायलंडच्या भिक्खू संघाची शहापूर शहरात निघालेली पदयात्रा अस्थिकलश रथ आणि भंतेजींची पदयात्रा भ्रमण करीत ठाणे जिल्ह्यातील शहापूर व वासिंद शहरात दाखल झाली़ यावेळी शहापूर शहरातील मुख्य रस्त्यावर रांगोळीसह फुलांचा वर्षाव करीत शहापूरकरांनी जागोजागी धम्मपदयात्रेचे धम्म उपासकांनी अभूतपूर्व स्वागत केले.
याप्रसंगी उपासकांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करीत सकाळपासून अस्थिकलश आणि पदयात्रेच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. जागतिक धर्मगुरू दाखल झाल्यानंतर ठिकठिकाणी भंते तेप्रिवय यधिष्ठी, भंते लाँगफुजी, भंते सोंगसेक फॅन्टफियन, भंते यांच्यासह मुंबई येथील भंते विनयबोधी, भंते लामाजी, भंते शांतीरत्न, भंते बोदानंद समवेत नाशिकचे भंते सुगत सहभागी झाले़