भाईंदर(वार्ताहर) : मीरा-भाईंदर महानगरपालिका परिवहन विभागाचे बसचालक तसेच अन्य कर्मचाऱ्यांना मीरा रोड रेल्वे स्थानकाजवळ मारहाण करणाऱ्या दोन जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
शनिवारी दुपारी परिवहन विभागाचे बसचालक हनुमंत उगलमोगले हे मीरा रोड स्थानकाजवळ बस घेवून पोहचले तेव्हा एका वाहनामुळे बस वळवून घेण्यास अडथळा होत असल्याने त्यांनी समोरील व्यक्तीस गाडी थोडी पुढे घेण्यास सांगितले असता, त्याने त्यास नकार देऊन महानगरपालिका परिवहन बसचालकास शिविगाळ केली. सदरची व्यक्ती ही टॉप१० मोबाइल दुकान मालक अनिल छेडा असल्याचे कळून आले. तद्नंतर दुकान मालक छेडा याच्या काही कर्मचाऱ्यांनी परिवहन विभागातील बसचालकाला शिवीगाळ व धक्काबुक्की केली.
दरम्यान, परिवहन विभागाचे वाहक घनश्याम पाटील यांच्या हातातील दहा हजार रोख रक्कम कोठेतरी पडून गहाळ झाली व तिकीट मशीनचे तुटून नुकसान झाले. त्या अनुषंगाने छेडा व त्याचे कर्मचारी कमलेश मिश्रा यांच्यावर मारहाण व शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी नयानगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.