जुन्या काळातील रसायनशास्त्राचा अभ्यास म्हणजे परीस बनवणं हा होता. तो एक विलक्षण शक्तीचा पुरातनकालीन दगड आहे, जो कुठल्याही धातूचं सोन्यात रूपांतर करू शकेल… तो अमृतदेखील बनवू शकेल… ते पिणारी व्यक्ती अमर होऊन जाईल.’ ही ‘हॅरी पॉटर ॲण्ड फिलॉसॉफर स्टोन्स’ या पुस्तकातील हर्मायनीची वाक्यं वाचताना मी नकळतपणे त्या परिसाकडे खेचले गेले.
गेली अनेक शतकं या परिसाबद्दल अनेक कथा प्रचलित आहेत, पण खरंच परीस अस्तित्वात आहे का? की ही केवळ एक कल्पना आहे? आमच्या ऐकिवात तर हेच आलंय की, परीस नामक मौल्यवान दगड लोखंडाचं सोनं करतो, तर मग खरंच हा परीस आपल्याला मिळाला, तर काय चमत्कार होईल ना! जग इकडचं तिकडे होऊन जाईल. मनात येईल ती इच्छा आपण त्या परिसाच्या जोरावर पूर्ण करू शकू. परीस सापडलेला माणूस लगोलग हजारो, करोडो किलो लोखंड खरेदी करेल आणि परीसस्पर्शाने त्याचं सोन्यात रूपांतर करेल. वा! काय कमाल आहे नाही! मग तो ऐषोआरामात जीवन व्यतीत करेल, पैशाची कधीच चणचण त्याला भासणार नाही. स्वतःची-कुटुंबाची हवी ती इच्छा त्याला पूर्ण करता येईल. पण हे सर्व असंच होईल का? अन् मिडास राजाच्या गोष्टीप्रमाणे घडलं तर? सुरुवातीला आपल्या हस्तस्पर्शाने सर्वच वस्तू सोन्याच्या झाल्याने आनंदित झालेला राजा जेव्हा जीवनावश्यक गोष्टीपासून वंचित राहिला आणि आपल्या मुलीलाही जवळ घेऊ शकला नाही, तेव्हा त्याला जे वरदान वाटलं होतं. तेच त्याच्या हव्यासामुळे त्याच्यासाठी अखेर शाप ठरले. परीस सापडणाऱ्या माणसाचंही असंच झालं तर? कारण परीस मिळाला, तर कोणतेही कष्ट न घेता तो सतत लोखंडाचं सोनंच करत बसेल. कामधंदा सोडून दिवस-रात्र लोळत राहील. जगण्याची जी उर्मी असते, स्वतः केलेल्या कामाची-घामाची जी मजा असते तीच तो हरवून बसेल. मग त्या परिसाचा काय उपयोग? आपोआप मिळालेली, फुकट प्राप्त झालेली, विनासायास मिळालेली कोणतीही गोष्ट लाभदायक नसते. कारण, त्यात आपण स्वतः नसतो. यशाचं शिखर गाठण्यासाठी अहोरात्र कष्ट करून त्याच्यापर्यंत नेणाऱ्या कठीण पायऱ्या चढाव्या लागतात.
म्हणून असे सांगावेसे वाटते की,
कोण एकेकाळी
माणसाला नव्हता वाली,
परीसस्पर्शाची गोष्ट
होती त्यांनी ऐकली…
लोखंडाला करेल सोने
फिटेल माझे सर्व देणे,
म्हणून तो फिरला
दगड शोधत हिंडला…
उन्हात रानात भटकला,
पण परीस नाही मिळाला…
फिरता फिरता थकला,
झाडाला टेकला…
अन् आश्चर्य घडले ऐसे
की परीसस्पर्शाने
लोखंड झाले होते सोने…
पण सर्व दगडधोंड्यात
परीस मात्र हरवले,
निद्रावस्थेत असे
स्वप्न त्याला पडले…
धर्मबिंदूंनी चमकणारा
नवा परीस स्पर्श घेऊन
त्याचे मन घरी परतले…
सहज मिळालेला परीस कसा बरं लाभदायक ठरेल? कारण त्यात त्याला मिळवण्यासाठीची जी जिद्द असते ती नसेल. काम नाही, तर दाम घेण्यात मजा नाही. संकट नाही, तर कणखरपणा नाही. सोप्पं मिळत असेल, तर तिथे धैर्य नाही आणि धैर्य नाही, तिथे निर्धार नाही. म्हणजेच लोखंडाचे गुणधर्मच नसतील, तर परीस तरी काय बरं करेल? शेवटी समोरच्याकडून काही मौल्यवान घ्यायचं असेल, तर मुळात आपण लोखंडासारखं मजबूत आणि कणखर असणं गरजेचं आहे. परीस ही जरी काल्पनिक संकल्पना असली तरी त्याचा परिणाम असा खोलवर होतो. कारण जरी परीस दगड आपल्याला मिळाला नसेल, तरी जीवनात अशा अनेक आदर्श व्यक्ती भेटतात. ज्यांच्या येण्याने, असण्याने, त्यांच्या सहवासाने आपलं सोनं होऊन जातं. शिष्याला योग्य गुरू भेटला, तर तो विद्यार्थी आपल्या क्षेत्रात सोन्यासारखा चमकतो. जीवनात प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आयुष्यात संकटकाळी, निराशेच्या अवस्थेत अशी मौल्यवान व्यक्ती भेटते, जी समोरच्या व्यक्तीला योग्य सल्ला देऊन, योग्य दिशा दाखवून त्याचं सोनं करते. आपल्या आयुष्यात आपले आई-वडील, भाऊ, बहीण, मित्र-मैत्रिणी, शिक्षक आपले सहकारी अनेक वेळा आपल्याला असे कळत नकळत मदत करत असतात. जेव्हा आपण काही समस्यांना घेऊन चाचपडत असतो, तेव्हा त्यांचे अनुभवी मार्गदर्शन, योग्य सल्ला हा आपल्या यशस्वी वाटचालीकडे नेणारी पहिली पायरी ठरू शकते. त्यामुळे येणारं संकट आपल्याला लोखंडासारखं कणखर व कठीण बनवतं, अशी परिसासमान थोर माणसं भेटल्याने मनुष्याच्या जीवनाचं सोनं होऊन जातं.
परीस मौल्यवानच राहील आणि परिसासारखी ही मौल्यवान थोर माणसं तशीच राहतील. पण आधी आपल्याला लोखंडासारखं बनावं लागेल. धैर्यशील व्हावं लागेल. नाही तर फुकट मिळालेलं त्या कपोलकल्पित हॅरी पॉटरसारख्या गोष्टीतल्या नावाप्रमाणे तो फक्त परीस दगडच राहील. काल्पनिक गोष्टीतल्या परीस दगडामागे धावून आयुष्य शापित करायचं की, खऱ्या परीसरूपी व्यक्ती भेटल्यावर स्वत:चं सोनं बनून वरदान ठरवायचं? हे शेवटी आपलं आपल्याच हाती आहे.
-रूपाली हिर्लेकर