कल्याण : लांब पल्ल्याच्या गाडीत झोपेत असलेल्या प्रवाश्यांच्या मुद्देमालाची चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळून त्याच्या कडून सुमारे ७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात कल्याण रेल्वे गुन्हे शाखेच्या पोलिसांना मोठे यश आले आहे.
गुन्हे शाखेच्या पोलिसांना सुत्रांकडून मिळालेल्या माहीती नुसार ३० जानेवारी २०२३ रोजी अहमदनगर – कोल्हापूर एक्सप्रेसने प्रवास करणारी एक महिला प्रवासी झोपेत असतांना पहाटे २ ते ४ दरम्यान एका अज्ञात इसमाने त्यांच्या डोक्याजवळील लेडीज पर्स लंपास केली होती. या गुन्ह्याची नोंद डोंबिवली रेल्वे पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. याच गुन्ह्याचा तपास करत असतांना संशयीत आरोपी वसई रेल्वे पोलिस ठाणे हद्दीतील सीसीटीव्ही दृश्यांमध्ये दिसून आला.
या आधारे शोध घेत असतांना पालघर येथे राहणाऱ्या सुभान अहमद जहरी अहमद (वय-४१वर्ष याला ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशी केली असता या आरोपीच्या नावे अशाच प्रकारचे आणखी ३ गुन्हे कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात दाखल असल्याची माहीती मिळाली. या चारही गुन्ह्यात आरोपीने लंपास केलेला सात लाख २९ हजार ४९८ इतक्या रकमेचा मुद्देमात हस्तगत करण्यात आला आहे यात ४ मोबाईल तसेच दागिन्यांचा समावेश आहे.
हे गुन्हे उघड करण्यात पोलिस आयुक्त (लोहमार्ग-मुंबई ) डॉ. रविंद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त मनोज पाटील, मध्य परिमंडळ सहाय्यक आयुक्त (गुन्हे)सचिन कदम, वरीष्ठ पोलिस निरिक्षक(गुन्हे) अरशुद्दीन शेख यांचे मार्गदर्शनासह पोलिस अंमलदार राजेंद्र दिवटे, महेंद्र कर्डिले, रविन्द्र ठाकूर, अजित माने, अक्षय चव्हाण आदींचे सहकार्य लाभले.