कल्याण : भारतीय जनता पार्टीचे माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे आणि नगरसेविका कविता म्हात्रे यांच्यावतीने डोंबिवलीतील मॉंडल इंग्लिश स्कूल कुंभारखाण पाडा येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्यात ६० हून अधिक कंपन्यांनी सहभाग घेतला होता. याद्वारे मोठ्या प्रमाणात बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने मोठ्या प्रमाणात बेरोजगारांची संख्या वाढली आहे. आता कोरोना परिस्थिती निवळल्यानंतर सर्व जनजीवन पूर्वपदावर आले आहे. मात्र बेरोजगार झालेल्या अनेकांना आपल्या नोकरीचा प्रश्न भेडसावत होता. अशा बेरोजगारांसाठी या रोजगार मेळाव्याचे आयोजन केल्याची माहिती आयोजक विकास म्हात्रे यांनी दिली.
यावेळी फार्मास्युटिकल, हेल्थकेअर, पेट्रोकेमिकल, केमिकल, बँक, आयटी, मॅन्युफॅक्चरिंग, कन्सल्टंट, हाउसकीपिंग, सिक्युरिटी, कॉर्पोरेट इत्यादी विविध क्षेत्रातील ६० कंपन्या आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कंपन्यांच्या प्रतिनिधींनी इच्छुकांच्या मुलाखती घेऊन त्यांचे शिक्षण, कला आणि अनुभवाच्या आधारे त्यांना नोकरी दिली. मुलाखती घेतल्यानंतर जागेवरच नियुक्ती लेटर देण्यात आले, त्यामुळे डोंबिवलीतील शेकडो सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीची संधी मिळाली.