मुंबई : प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता बेस्टतर्फे नवीन बससेवा सुरू करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दहिसर मेट्रो स्थानक ते मीरा रोडदरम्यान नवीन थेट बससेवा सोमवारपासून सुरू होणार आहे.
जानेवारी २०२३ पासून मुंबईतील प्रवाशांच्या सोयीकरिता मुंबई उपनगरमध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने दहिसर ते गुंदवली-अंधेरी (पूर्व) दरम्यान ‘मेट्रो रेल-७’ आणि दहिसर ते एसिक नगर अंधेरी (पश्चिम) दरम्यान ‘मेट्रो रेल-२ ब’ सुरू करण्यात आली आहे. मेट्रोतून उतरल्यानंतर आपल्या इच्छित स्थळी जाण्यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रमाच्या नियमित बस उपलब्ध आहेत.
मात्र प्रवाशांची मागणी लक्षात घेता बेस्टतर्फे नवीन बसमार्गही सुरू केले जात आहेत. विशेषतः दहिसर मेट्रो रेल्वे स्थानकाकडे येणारे प्रवासी मोठ्या प्रमाणात मीरा रोड येथून येत असून या प्रवासाकरिता त्यांना बेस्ट उपक्रमाच्या सेवांवर अवलंबून राहावे लागत आहे. प्रवाशांची ही मागणी लक्षात घेता सोमवार १३ फेब्रुवारीपासून दहिसर मेट्रो स्थानक आणि मीरा रोड रेल्वे स्थानक (पूर्व) दरम्यान काशिमीरा, सिल्वर पार्क, जम्मू काश्मीर बँक मार्गे नवीन विशेष बसमार्ग क्र. पीपीएस-१ सुरू करण्यात येत आहे.
या बसमार्गावरील बस दहिसर मेट्रो स्थानक-मीरा रोड रेल्वे स्थानक (पूर्व) दरम्यान दहिसर चेकनाका - काशिमीरा - सिल्वर पार्क - जम्मू काश्मीर बँक - मीरा रोड रेल्वे स्थानक (पूर्व) दरम्यान धावेल.






