ज्ञानदेव हे एक उत्कृष्ट वक्ता आहेत. आणि म्हणून ‘ज्ञानेश्वरी’तून आपल्याला वक्तृत्व-गुणाची शिकवण मिळते. चांगला वक्ता हा कठीण वाटणारा विषय सोपा करून मांडतो नि तो रसमय, रंगतदार करतो. ज्ञानदेव ही किमया सहज करतात. संपूर्ण ज्ञानेश्वरीत वारंवार याचा अनुभव येतो. पहिल्या अध्यायापासूनच या वक्तृत्वाची प्रचिती येते. उत्तम वक्ता काय करतो? तर सुरुवातीला गुरूंना, श्रोत्यांना वंदन करतो. ज्ञानदेव स्वतः ‘ज्ञान’देव असूनही सर्वांना – देवदेवता, गुरू श्रीनिवृत्तीनाथ यांना वंदन करतात.
‘का चिंतामणी आलिया हातीं। सदा विजयवृत्ति मनोरथीं, तैसा मी पूर्णकाम श्रीनिवृत्ति। ज्ञानदेव म्हणे॥’ ओवी क्र. २४
म्हणजे ‘मनोरथ पूर्ण करणारा चिंतामणी हाती आला असता सर्व हेतू पूर्ण होतात, त्याप्रमाणे श्रीनिवृत्तीनाथांच्या कृपेने ‘माझे सर्व हेतू नेहमी तडीस जातात.’ त्यानंतर आपल्याला जो विषय मांडायचा आहे, त्याचे महत्त्व श्रोत्यांना पटवून देतात. त्याप्रसंगी ते म्हणतात, ‘आता यापुढे विचाररूप वृक्षांची अपूर्व बागच अशी गहन कथा ऐका..’ ‘जणू सरस्वती ही श्रीव्यासांच्या महामतीत प्रवेश करून कथारूपाने या जगात प्रकटली आहे म्हणून ही कथा म्हणजे जणू सर्व काव्यांचा राजा होय. ही कथा अद्वितीय, उत्तम, पवित्र, अतिकल्याणकारक आहे ती ऐका.’ अशा प्रकारे आपल्या विषयाची महती श्रोत्यांच्या मनावर ठसवतात. केवळ ‘कथा ऐका’ असं म्हणून ज्ञानोबा थांबत नाहीत; ही कथा, हे तत्त्वज्ञान कसं ऐकायचं याचीही शिकवण ते देतात. एका अर्थी श्रोत्यांचं ‘ओरिएन्टेशन’ करतात. वक्ता जे काही बोलणार, ते ऐकण्यासाठी श्रोत्यांची मनं तयार करणं हा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो नि तो माऊली अशा रसपूर्ण रीतीने मांडतात की अहाहा! त्या प्रसिद्ध ओव्या अशा –
जैसें शारदीचिये चंद्रकळे।
माजी अमृतकण कोंवळे।
ते वेंचिती मनें मवाळें। चकोरतलगे॥ ओ. क्र. ५६
तियांपरि श्रोता। अनुभवावी हे कथा।
अतिहळूवारपण चित्ता। आणुनिया॥ ओ. क्र. ५७
ज्याप्रमाणे शरद ऋतूतील पौर्णिमेच्या चांदण्याचे कोवळे अमृतकण, चकोर पक्ष्यांची पिल्ले हळुवार मनाने प्राशन करतात, त्याप्रमाणे श्रोत्यांनी चित्ताची एकाग्रता करून या भगवद्गीतेचा अनुभव घ्यावा. अतिशय अप्रतिम, अर्थपूर्ण असा हा दृष्टांत आहे. पुढे ते श्रोत्यांना मोठेपणा देऊन स्वतःकडे कमीपणा घेतात. ‘ज्याप्रमाणे आपले मूल बोबडे बोलले तरी आईबापांना त्याचा संतोष वाटतो, त्याप्रमाणे तुम्ही सज्जनांनी माझा स्वीकार केला आहे.
‘त्या अर्थी तुम्ही माझे जे काही उणे असेल ते सहज कराल.’
‘जैसा स्वभाव मायबापांचा।
अपत्य बोले जरी बोबडी वाचा।
तरि अधिक तयाचा। संतोष आथी॥’ ओ. क्र.६४
अशा तऱ्हेने सुरुवातीपासूनच ज्ञानदेव श्रोत्यांची मनं जिंकून घेतात आणि म्हणूनच आज सातशे वर्षं उलटूनही ही ‘भावार्थदीपिका’ अर्थात ‘ज्ञानेश्वरी’ आपल्या हृदयात आहे.
-प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे