कलिंगडासह काकडी, वांगी, पालेभाजीतून साधला आर्थिक उन्नतीचा मार्ग
देवरुख : कृषी क्षेत्रात पदवी घेतल्यानंतर तिचा उपयोग नोकरीसाठी न करता स्वतःच्याच शेतात निरनिराळे प्रयोग करत आहे. तो म्हणजे लोवलेतील युवक शुभम दोरखडे. या तरुणाने एकाच वेळी ५०० किलो मेलोडी या जातीचे कलिंगड उत्पादन घेतले आहे. कलिंगडसह काकडी, वांगी इत्यादी पालेभाजीचे उत्पादन घेतले आहे.
शुभमने दापोली कृषी विद्यापीठातून कृषी पदवी प्राप्त केली. त्यानंतर तो स्वमालकीच्या जागेत गेली पाच सहा वर्षे निरनिराळे प्रयोग करत आहे. यंदा त्याने १० गुंठे क्षेत्रात कलिंगड लागवड केली आहे. ३ टप्प्यात केलेल्या लागवडीच्या पहिल्या टप्प्यात त्याने तब्बल ५०० किलोचे कलिंगड उत्पादन घेतले आहे. अजुन दोन उत्पादने आहेत ती पुढच्या दोन महिन्यांत पूर्ण होतील, असा विश्वास शुभमला आहे.
हे सर्व पीक घेत असताना तो रासायनिक खतांचा वापर न करता गांडूळ खत, वर्मी खत अशा नैसर्गिक खतांचा वापर करत आहे. शुभमने रस्त्यालगत घर असल्याने तिथेच स्टॉल उभारून तिथेच कलिंगड आणि भाजी विक्री सुरू केली आहे.
त्याच्या या प्रयत्नांना आई-वडील आणि बहिणीने मोलाची साथ दिली आहे. आपल्याकडे कलिंगड आणि काकडी यांना मागणी खूप आहे.त्यामुळे दररोज दोन हजार रुपयांहून अधिक किमतीचे कलिंगड आणि भाजी विक्री होते. कृषीच्या शिक्षणाचा उपयोग अर्थार्जनासाठी केला आणि स्वतःच्या मालकीची जमीन असल्याने ती लागवडीसाठी उपयुक्त असल्याने तिचा वापर करून घेत आर्थिक प्रगती साधली असल्याचे मत तरुण शेतकरी शुभम दोरखडे याने व्यक्त केले.