संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावर बोलताना काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभेत अदानी प्रकरणावरून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले होते. ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ संस्थेच्या अहवालाबाबत चौकशीचे आदेश न देणारे पंतप्रधान अदानींचा बचाव करत आहेत, असा आरोप यावेळी राहुल गांधी यांनी केला. त्यानंतर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर देताना पंतप्रधानांनी काँग्रेसवर घणाघाती हल्ला करत विरोधकांना पळताभुई थोडी केली. पंतप्रधानांनी काँग्रेस सरकारच्या काळातील अपयशांचा पाढाच यावेळी वाचला. काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारची २००४ ते २०१४ ही दहा वर्षे म्हणजे वाया गेलेले दशक होते, अशी टीका त्यांनी केली. प्रत्येक संधीचे संकटात रूपांतर करणे हेच काँग्रेस सरकारचे व्यवच्छेदक लक्षण होते, अशा शब्दांत आसूड ओढत त्यांनी आताचे दशक मात्र भारताचे आहे, जगभरात देशाचे यश मिरवण्याचे आहे, असे सांगत मोदी यांनी विरोधकांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले. या सगळ्यावर उत्तर देताना पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना टोमणे लगावले आहेत. राहुल गांधी यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. मोदी म्हणाले की, काल काही लोक उड्या मारत होते. काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेची श्रीनगरमध्ये सांगता करताना राहुल गांधींनी लालचौकात तिरंगा फडकवला होता. तो धागा पकडत केंद्राच्या धोरणांमुळे काश्मीर खोऱ्यात शांतता निर्माण झाली आहे आणि त्यामुळे आता लालचौकात तिरंगा फडकवला जात असल्याचा टोला मोदी यांनी लगावला. तसेच श्रीनगरमध्ये लालचौकात तिरंगा फडकवण्याचे दहशतवाद्यांचे आव्हान स्वीकारत मोदी यांनी कुठल्याही सुरक्षेविना, बुलेटप्रूफ जॅकेटविना लालचौकात तिरंगा फडकावला होता. याचीही आठवण त्यांनी यावेळी करून दिली.
देशात ‘२ जी’, ‘कॅश फॉर व्होट’, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भ्रष्टाचार, कोळसा घोटाळा अशी अनेक प्रकरणे झाली काँग्रेसच्या काळात झाली. अब्जावधींचा भ्रष्टाचार, घोटाळा झाला. २००८ मध्ये झालेला दहशतवादी हल्ला कोणीही विसरू शकणार नाही. कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत देशभर दहशतवादी हल्ले झाले. पण दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्याची हिंमत काँग्रेस सरकारने कधी दाखवली नव्हती, असे ते म्हणाले.
भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी केली म्हणून सक्तवसुली संचालनालयावर (ईडी) विरोधकांनी आरोप केले. मतदारांनी विरोधकांना नाकारले, त्यांना एका मंचावर आणले नाही. पण ‘ईडी’विरोधात मात्र विरोधक एकत्र झाले आहेत. त्यांनी ‘ईडी’चे आभार मानले पाहिजेत, असा खोचक सल्लाही मोदींनी दिला. सभागृहात काल राहुल गांधींचे भाषण होत असताना विरोधी बाकांवर आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. काही इतके खूश झाले आणि गाढ झोपले की, त्यांना सकाळी जागच आली नाही आणि ते आजही आलेले नाहीत, असा टोला मोदींनी लगावला. मोदींच्या भाषणाच्या वेळी राहुल गांधी मात्र सभागृहात उपस्थित होते. काही लोक आरोप करतात की, २०१४ पासून देश कमकुवत झाला, जगात भारताला कोणी विचारत नाही. तसेच हे लोक म्हणतात की, दुसऱ्या देशावर दबाव आणून सरकार धोरणे ठरवते. सरकारवर आरोप करणाऱ्यांनी देश कमकुवत की मजबूत झाला हे ठरवावे, असा सल्लाही मोदी यांनी दिला. विशेषत: कोरोना महामारीचा काळ, युद्ध आणि विभागलेले जग अशी अनेक आव्हाने समोर असतानाही भारत आत्मविश्वासाने पुढे निघाला आहे. जगभरात महागाई, बेरोजगारीची चिंता वाढलेली असताना भारत मात्र पाचवी मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. आता देशात राजकीय स्थैर्य निर्माण झाले असून ठोस निर्णय घेणारे सरकार सत्तेवर आले आहे. ‘डिजिटल इंडिया’चे जगाला कुतूहल आहे. भारत जागतिक उत्पादन केंद्र बनू लागला आहे. ही प्रगती विरोधकांना बघवत नाही, असा आरोप पंतप्रधानांनी केला. मी टीव्ही आणि वृत्तपत्रांच्या आधारे देशवासीयांचा विश्वास मिळवलेला नाही. देशासाठी आयुष्य वेचले आहे. मोफत धान्य योजनेचा लाभ घेणारे ८० कोटी देशवासी हे विरोधकांच्या शिव्यांवर विश्वास ठेवतील का? वंचित, दलित आदिवासी अशा समाजातील सर्वांसाठी विकासाच्या योजना सरकारतर्फे पोहोचविल्या जात आहेत. संकटाच्या वेळी मोदी मदतीला आले, हे लोकांना माहिती आहे. भारत कमकुवत झाला आहे की, मजबूत झाला आहे हे विरोधकांनी आधी ठरवावे. प्रथम ते म्हणतात की, देश कमकुवत झाला आहे. मग ते म्हणतात की, भारत इतर देशांवर दबाव आणून निर्णय घेत आहे. काही लोक आजही उद्धटपणे जगत आहेत. मोदींना शिव्या देऊनच मार्ग सापडेल, असे त्यांना वाटत असेल, तर ते भ्रमात आहेत, असा सारा माहोल मोदी यांच्या भाषणाने तयार केला.
मुख्य म्हणजे काँग्रेसने नेहमी फक्त मतांचे राजकारण केले. त्यामुळे देशाच्या विकासाला, सामर्थ्याला धक्का बसला. तसेच मध्यमवर्गाकडे, तर सतत दुर्लक्ष करण्यात आले. मात्र मोदी सरकार आल्यावर आता मध्यमवर्गाला इमानदारीचे फळ मिळू लागले आहे. त्यांच्यासाठी अनेक योजना सरकार राबवत आहे. गृहकर्ज मिळू लागले आहे, ‘रेरा’मुळे घर मिळण्याची शाश्वती आहे, शिक्षणाच्या संधी मिळत आहेत. विशेष म्हणजे मतदारांनी काँग्रेसला सातत्याने नाकारले असून देशाची प्रगती बघून विरोधक आणखी निराश झाले आहेत. त्यामुळेच ते खोटे-नाटे आरोप करत आहेत. मात्र १४० कोटी देशवासीयांचा विश्वास हीच आपली ढाल आहे, असे चोख प्रत्युत्तर नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना दिले आणि त्यांच्या आरोपांतील हवाच काढून घेतली. तसेच त्यांची बालेतीही बंद केली.