Friday, July 5, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखबांगलादेशही दिवाळखोरीच्या वाटेवर

बांगलादेशही दिवाळखोरीच्या वाटेवर

दक्षिण आशियातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आणि भारतापेक्षा अव्वल जीडीपी असणारा देश म्हणून प्रसिद्ध असलेला बांगलादेश श्रीलंका-पाकिस्तानच्या वाटेवर आहे. तिथे सामान्य जनता आणि विरोधक रस्त्यावर उतरले आहेत. महागाई वेगाने वाढली आहे. गरजा भागवण्यासाठी हा देश जागतिक नाणेनिधीकडे कर्ज मागत आहे. दीर्घकाळ मंदीचा दबाव, संस्थांचे राजकीय केंद्रीकरण या घसरणीला कारणीभूत आहे.

एक वर्षापूर्वी बांगलादेशची आर्थिक स्थिती चांगली होती. दरडोई उत्पन्न आणि सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीत बांगलादेशने भारतावर मात केली होती; परंतु कोरोना, रशिया-युक्रेन युद्ध तसेच मंदीने बांगलादेशच्या आर्थिक व्यवस्थेला ग्रासले. बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेला धोका आहे आणि योग्य व्यवस्थापन न केल्यास ती दबावाखाली येईल. सध्याची परिस्थिती प्रतिकूल का बनली, हे तपासून उपाययोजना केली न गेल्यास बांगलादेशची अर्थव्यवस्था नक्कीच अडचणीत येईल. घरगुती उत्पन्न, औद्योगिक उत्पन्न आणि सरकारी उत्पन्न ही अर्थव्यवस्थेची तीन एकके असतात. बांगलादेशमध्ये सध्या या तीनही घटकांना आर्थिक मदतीची गरज आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक व्यापारात असंतुलनाचे संकट असून बांगलादेशच्या जागतिक नाणेनिधीच्या प्रस्तावित कर्जाची देशात चर्चा होत आहे. रशिया-युक्रेन युद्धापूर्वीच बांगलादेशच्या परकीय चलनाच्या साठ्यात घसरण सुरू झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे बांगलादेशमध्येही महागाई वाढत आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे महागाईचे संकट आणखी गहिरे झाले. बांगलादेशमधील लोकांचे घरगुती उत्पन्न कमी होत आहे. इथले बहुतेक लोक अनौपचारिक क्षेत्रात काम करत आहेत आणि कोणतीही मजबूत सामाजिक सुरक्षा व्यवस्था नाही. कोरोनाच्या काळात लोकांचे घरगुती उत्पन्न कमी झाले आणि त्यांनी खर्चासाठी कर्ज घेणे सुरू केले. वाढत्या महागाइने सर्वसामान्यांचे अर्थकारण बिघडले आणि हे संकट अधिक गडद झाले.

बांगलादेशमधील कामगार वर्ग हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे; मात्र झपाट्याने वाढणाऱ्या महागाईने देशात नवे गरीब निर्माण केले आहेत. हे असे लोक आहेत, जे आतापर्यंत आपल्या कमाईने कुटुंब चालवू शकत होते; परंतु महागाईमुळे त्यांना आपल्या गरजा भागवण्यासाठी कर्ज घ्यावे लागत आहे. गेल्या वर्षी केलेल्या एका संशोधनानुसार बांगलादेशच्या लोकसंख्येमध्ये एकूण तीन कोटी ९ लाख नवीन गरीब समोर आले आहेत. हे प्रमाण लोकसंख्येच्या १८.५४ टक्के आहे. संशोधनात दिसून आले आहे की, बांगलादेशमधल्या बहुतेक कुटुंबांनी खर्च कमी करण्यासाठी अन्नखरेदीमध्ये कपात केली आहे. कोरोना पूर्वीच्या पातळीशी तुलना केल्यास आता देशात नवीन गरीब निर्माण झाले आहेत. या लोकांच्या उत्पन्नात महागाईच्या तुलनेत वाढ झालेली नाही. आजघडीला येथील मोठ्या प्रमाणातील मध्यमवर्ग दैनंदिन खर्च भागवण्यासाठी क्रेडिट कार्डवर अवलंबून आहे. त्यांचे कर्ज संकट केवळ सर्वसामान्यांपुरते मर्यादित नाही. खर्च भागवण्यासाठी सरकारलाही कर्ज घ्यावे लागते. सरकारने विक्रमी पातळीवर कर्जे घेतली आहेत. चालू आर्थिक वर्षात तर बांगलादेशने एक लाख कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. बांगलादेशचा जीडीपी आणि कर गुणोत्तर दक्षिण आशियामध्ये सर्वात कमी आहे. ही बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेची संरचनात्मक समस्या आहे. अफगाणिस्ताननंतर बांगलादेशमध्ये जीडीपी-कर गुणोत्तर सर्वात कमी आहे. महागाईमुळे लोकांची खरेदी कमी झाली आहे, त्याचा परिणाम व्हॅटवर (मूल्यवर्धित कर) झाला असून सरकारचे उत्पन्न घटले आहे.

नेमकेपणाने सांगायचे तर या देशाचे जीडीपी-कर गुणोत्तर आधीच कमी होते. ते आणखी घसरले आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय बँकेकडून कर्ज घेण्याशिवाय सरकारकडे पर्याय उरलेला नाही. आर्थिक स्थिती ढासळण्यामागील एक महत्त्वाचे कारण म्हणजे बांगलादेशची अर्थव्यवस्था उपभोगावर आधारित आहे.पण महागाई वाढल्याने लोकांची क्रयशक्ती कमी झाली आणि जीडीपी घसरायला लागला. स्थलांतरित मजुरांनी (ज्यामध्ये महिलांची संख्या खूप मोठी आहे) बांगलादेशच्या आर्थिक विकासात भूमिका बजावली आहे. कामगारवर्गाचे उत्पन्न वाढले की खर्च वाढतो आणि त्याचा परिणाम आर्थिक विकासावर होतो; परंतु इथे नेमके उलट सुरू झाले. उपभोगावर आधारित समाजाच्या आर्थिक वाढीची समस्या ही आहे की, ती मागणी वाढवत राहते तर गुंतवणुकीच्या नेतृत्वाखालील आर्थिक वाढ क्षमता निर्माण करते. उपभोग-आधारित अर्थव्यवस्थेत आयातीची मागणी सतत वाढत राहते. अशा परिस्थितीत बाह्य बाजारपेठेत किमती वाढतात, तेव्हा देय रकमांवर त्याचा थेट परिणाम होतो. बांगलादेशमध्ये असेच घडले आहे. आपल्या उत्पादनक्षमतेत गुंतवणूक केली असती तर या देशाला बाह्य घटकांपासून स्वतःला काही प्रमाणात वाचवता आले असते. कोरोना आणि नंतर रशिया-युक्रेन युद्ध यांसारख्या बाह्य घटकांचा बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम झाला आहे आणि यामुळेच एके काळी वेगाने वाढणारी बांगलादेशची अर्थव्यवस्था आता अडचणीत सापडली आहे.

१९७१ ते २०१७ दरम्यान घेतले नाही, तेवढे कर्ज बांगलादेश सरकारने गेल्या पाच वर्षांमध्ये घेतले आहे. याचा सरळ अर्थ असा होतो की, अर्थव्यवस्थेच्या व्यवस्थापनातच समस्या आहे. संस्थात्मक स्तरावर समस्या आहेत. त्यावर त्वरित उपाय करणे आवश्यक आहे. महागाईमुळे बांगलादेशच्या परकीय चलनाच्या साठ्यातही झपाट्याने घट झाली आहे. डिसेंबर २०२२ मध्ये बांगलादेशचा परकीय चलन साठा ३० अब्ज डॉलर होता. जानेवारी २०२२ मध्ये ते ४४.९ अब्ज डॉलर होते. बांगलादेशच्या परकीय चलनाच्या गंगाजळीत सातत्याने घट होत आहे. जगात क्वचितच कुठे देशाच्या मध्यवर्ती बँकेच्या बाहेर परकीय चलनाच्या गंगाजळीची स्थिती जाहीर करणारा फलक लावला जात असेल; पण बांगलादेशमध्ये सेंट्रल बँकेच्या बाहेरील एका फलकावर देशाच्या परकीय चलनाच्या गंगाजळीची घोषणा करण्यात आली आहे. आता देशात परकीय चलनाच्या साठ्याचे संकट दाटले आहे. याचा सरळ अर्थ असा की, बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेत बाह्य धक्के शोषण्याची क्षमता नव्हती किंवा ही क्षमता विकसित झाली नाही. बांगलादेश वस्त्र निर्यात करतो. ताग ही त्याची प्रमुख निर्यात आहे. या पार्श्वभूमीवर बांगलादेशमध्ये उद्भवलेल्या आर्थिक संकटाच्या मुळाशी पेमेंट बॅलन्सचे संकट आहे. बांगलादेशच नाही तर जगातील इतर अनेक देशही या संकटाचा सामना करत आहेत. वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे अनेक देशांचे पेमेंट बॅलन्स बिघडले. श्रीलंका हे त्याचे ताजे उदाहरण आहे. त्यामुळे तिथे गंभीर आर्थिक संकट निर्माण झाले आहे.

एकूण वाटचालीचा विचार करता बांगलादेशवर अशी परिस्थिती येणार नाही, असे वाटत होते; मात्र आता पेमेंट बॅलन्सचाही प्रश्न निर्माण झाला आहे. कच्च्या तेलासह इतर वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे अनेक देशांचे आयात बिल वाढले आहे. याचा परिणाम बांगलादेशवरही झाला. एखाद्या देशाचे पेमेंट बॅलन्स बिघडते, तेव्हा त्याचा थेट परिणाम देशाच्या परकीय चलनाच्या साठ्यावर होतो. परकीय चलनाचा साठा कमी झाल्यास कर्जाची स्थितीही बिकट होते. कर्जाचे हप्ते फेडण्यात देशाला अडचणी येतात. भारत आणि बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेत बराच फरक आहे आणि दोघांमधील तुलना योग्य नाही. १९६० मध्ये बांगलादेशचा जीडीपी चार अब्ज डॉलर होता. २०२१ मध्ये तो ४१६ अब्ज डॉलर्सवर पोहोचला होता. म्हणजेच ५० वर्षांमध्ये बांगलादेशच्या परकीय चलन साठ्यात शंभर पटींनी वाढ झाली आहे. बांगलादेशमधला वस्त्रोद्योग हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा कापड उद्योग आहे. हे अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रेरक शक्तींपैकी एक आहे. त्या बळावर बांगलादेशची अर्थव्यवस्था चांगली चालली होती; पण आधी कोरोना आणि नंतर रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम झाला. मोठ्या अर्थव्यवस्थांवर अशा घटकांचा कमी परिणाम होतो. बांगलादेश आपल्या कपड्यांची निर्यात करून देयकाचा समतोल राखत असे. बहुतेक युरोपियन देश आणि विकसित देशांमध्ये तो कापड पाठवत असे; पण कोरोना आणि युद्धाचा या बाजारांवरही परिणाम झाला आणि बांगलादेशच्या कपड्यांच्या निर्यातीत घसरण झाली. आज जगात एक प्रकारचे शीतयुद्ध सुरू आहे. एका बाजूला पाश्चात्त्य देश आहेत तर दुसऱ्या बाजूला रशिया, चीन आणि इराणसारखे देश आहेत. या शीतयुद्धाचा परिणाम बाजारपेठांवरही झाला आहे. त्याचा थेट परिणाम बांगलादेशसारख्या छोट्या अर्थव्यवस्थांवर होत आहे.

-प्रा. डॉ. विजयकुमार पोटे

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -