जम्मू : पृथ्वीवरील स्वर्ग अर्थात जम्मू काश्मीरमध्ये जियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाला मोठा खजिना सापडला आहे. येथे असा खजिना मिळाला आहे जो भारताचे नशीब बदलू शकतो. जगभरातल्या अर्थव्यवस्थेत भारताची ताकद वाढवू शकतो. केंद्र सरकारने सांगितले की, जम्मू काश्मीरमध्ये ५.९ लाख टन लिथियमचा साठा सापडला आहे, जो भारतातल्या वाहतूक व्यवसायला वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल. कारण लिथियम हा नॉन-फेरस धातू असून तो इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीमध्ये वापरला जातो. याने देशातल्या ईव्ही उद्योगाला मोठं बळ मिळणार आहे.
जियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, जम्मू काश्मीरमधील सलाल-हिमाना प्रदेशात लिथियमचा साठा सापडला आहे. देशात याचे एकूण ५१ ब्लॉक सापडले आहे. यापैकी ५ ब्लॉकमध्ये लिथियम, गोल्ड, पोटॅश, मॉलिब्डेनमचे साठे आहेत. २०१८ ते आतापर्यंत हे ब्लॉक्स शोधण्यात आले आहेत. याशिवाय १७ ब्लॉक्समध्ये कोळशाचा साठा आहे. लिथियमचे अनेक फायदे आहेत. परंतु याचा सर्वाधिक वापर रिचार्जेबल बॅटरी बनवण्यासाठी होतो.
गुरुवारी झालेल्या ६२ व्या सेंट्रल जिओलॉजिकल प्रोग्रामिंग बोर्डाच्या बैठकीत १५ इतर संसाधन भूवैज्ञानिक अहवाल आणि ३५ भूवैज्ञानिक ज्ञापनांसह हा अहवाल संबंधित राज्य सरकारांना सुपूर्द करण्यात आला आहे.
लिथियम, निकेल आणि कोबाल्ट यांसारखी खनिजे मोबाईल फोन, सोलार पॅनेलसह इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये वापरली जातात. ही खनिजे आपण ऑस्ट्रेलिया आणि अर्जेंटिनामधून आयात करतो. परंतु आता लिथियमचे साठे भारतात सापडल्याने भारत इलेक्ट्रॉनिक आणि ऑटो इंडस्ट्रीत आत्मनिर्भर होऊ शकतो.
देशात लिथियमचे साठे सापडल्याने देशातल्या इलेक्ट्रिक व्हेईकल इंडस्ट्रीला मोठी संजीवनी मिळाली आहे. मोबाईल व लॅपटॉप बॅटरी आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या उद्योगात सध्या अमेरिका आणि चीन हे देश आघाडीवर आहेत. भारतात वाहनांची मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात भारत आता अमेरिका आणि चीनच्या पंक्तीत जाऊन बसणार आहे.
दरम्यान, जम्मू काश्मीरबद्दल प्रसिद्ध कवी आणि गायक अमीर खुसरो यांनी लिहिले होते की, या पृथ्वीवर कुठे स्वर्ग असेल तर तो याच भूमीवर आहे. अलिकडच्या काळात दहशतवाद्यांनी मात्र या भूमीचे मोठे नुकसान केले आहे. परंतु भारतीय जवानांनी दहशतवाद्यांचे मनसुबे अनेकवेळा हाणून पाडले आहेत.