Tuesday, July 1, 2025

महिलांना मशिदीत नमाज पठण करण्याची मुभा

महिलांना मशिदीत नमाज पठण करण्याची मुभा

पण पुरुष नमाजींसोबत बसता येणार नाही


नवी दिल्ली : महिलांची इच्छा असेल तर त्या मशिदीत जाऊन नमाज पठण करू शकतात. इस्लाममध्ये महिलांना मशिदीत पठण करण्यात कोणतीही मनाई नाही. पण त्यांनी पुरुष नमाजींमध्ये किंवा त्यांच्यासोबत बसू नये. एखाद्या मशिदीत समितीने त्यांच्यासाठी वेगळी जागा निश्चित केली असेल तर महिला तिथे जाऊ शकतात, असे मत ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने सुप्रीम कोर्टात व्यक्त केले.


पुण्याच्या एक मुस्लिम महिला व वकील फरहा अनवर हुसैन शेख यांनी २०२० मध्ये सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल केली होती. त्यात मशिदीत महिलांना करण्यात आलेली प्रवेश बंदी अवैध घोषित करण्याची मागणी करण्यात आली होती.


बोर्डाने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे की, महिलांनी मशिदीत नमाजासाठी जायचे की नाही हे त्यांनाच ठरवायचे आहे. मुस्लिम महिलांना ५ वेळ नमाज किंवा जमातमध्ये शुक्रवारची नमाज अदा करण्याचे कोणतेही बंधन नाही. महिला नमाज घरात किंवा मशिदीत पठण केला तर त्यांना एकसमानच पुण्य मिळेल. पण पुरुषांसाठी असे नाही. त्यांनी मशिदीतच नमाज अदा करण्याचा नियम आहे.


बोर्डाने या प्रकरणी असेही स्पष्ट केले की, बोर्ड तज्ज्ञांची संस्था आहे. ती इस्लामच्या सिद्धांवर सल्ला देते. पण ती कोणत्याही धार्मिक मान्यतेवर कमेंट करत नाही.


फरहाने आपल्या याचिकेत दावा केला होता की, इस्लामचा पवित्र ग्रंथ असणाऱ्या कुराणमध्ये महिलांना मशिदीत जाण्यासाठी मज्जाव असल्यासंबंधीचा कोणताही उल्लेख नाही. या निर्बंधामुळे मुस्लिम महिलांच्या घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन करण्यासह त्यांच्या सन्मानाने जीवन जगण्याच्या अधिकाराचेही उल्लंघन होते.


फरहाने आपला युक्तिवाद सिद्ध करण्यासाठी म्हटले होते की, मक्का व मदीनात महिला भविक आपल्या कुटुंबातील पुरुषांसोबत (महरम) हज व उमरा करतात.


दरम्यान, कोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने याचिकाकर्त्याचा युक्तिवाद जोरकसपणे फेटाळून लावला आहे. बोर्ड म्हणाले की, मक्का किंवा मदिनात पुरुष व महिलांसाठी वेगवेगळी व्यवस्था आहे. महिला-पुरुषांना वेगळे करणे इस्लामिक धर्मग्रथांत नमूद एक धार्मिक गरज होती. ती रद्द करता येत नाही.


प्रतिज्ञापपत्रात नमूद करण्यात आले आहे की, मदीना-मक्केच्या संदर्भात याचिकाकर्त्याची भूमिका पूर्णतः चूक व दिशाभूल करणारी आहे. मस्जिद ए हरमला इस्लाममध्ये पूर्णतः स्वतंत्र ठेवण्यात आले आहे.


मक्केच्या संदर्भात तिथे पुरुष व महिला दोघांनाही तवाफ करताना एकमेकांपासून अंतर राखण्याचा सल्ला दिला जातो. तिथे इबादत सुरू होताच पुरुष व महिला वेगवेगळ्या गटांत बाजूला होतात.


भारतात मशिद समित्या महिलांसाठी स्वतंत्र जागा तयार करण्यासाठी स्वतंत्र आहेत. मुस्लिम समुदायानेही नवी मशिद बांधताना महिलांसाठी जागा ठेवण्याची योग्य ती काळजी घ्यावी, असे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने म्हटले आहे.

Comments
Add Comment