- संजय पितळे, ठाणे जिल्हा पत्रकार संघ
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उठाव करून महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारली आहे. गेल्या अनेक वर्षांची त्यांची राजकीय कारकीर्द आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवणारी असून फक्त ठाणे जिल्हा नाही, तर संपूर्ण राज्यात त्यांची जनसेवा अंचाबित करणारी आहे. कोणत्याही प्रकारे राज्यावर नैसर्गिक संकट आले की, एकनाथ शिंदे त्या ठिकाणी पोहोचलेच समजा. पूरपरिस्थिती असू दे अथवा मोठा अपघात झाला, तर त्या घटनेची तत्काळ दखल घेऊन मदतीला धावणारा हा नेता राजकारणापेक्षा समाजकारणात जास्त रमणारा आहे. मदतीला धावून गेल्यानंतरदेखील दुर्घटनेत पालक गमावलेल्या बालकांची अथवा त्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी घेणे यासारख्या अनेक घटना त्यांचे सामाजिक दायित्व सिद्ध करतात. यामुळेच त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन कमालीचा सकारात्मक आणि आदराचा आहे म्हणून त्यांना अनाथांचा नाथ ही जनतेने दिलेली पदवी सार्थ आहे.
एकनाथ शिंदे यांना मी गेली सुमारे ४० वर्षांपासून जवळून पाहत आहे. १९८०च्या दशकात एसएससी उत्तीर्ण झाल्यानंतर मी ठाणे पूर्व भागातील मंगला हायस्कूल येथे अकरावी-बारावीसाठी कला शाखेत प्रवेश घेतला, योगायोगाने एकनाथजी त्याच महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शिकत होते. मराठी, इंग्रजी विषयाच्या तासाला वर्गात आम्ही एकत्र बसत असे. मात्र तेव्हाही एकनाथजी एकदम शांत आणि निरागस असे. आपल्या महाविद्यालयाचा विद्यार्थी भविष्यात राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होईल, अशी कल्पनादेखील त्या वेळी कोणी केली नव्हती.
कॉलेज सुटले की एकनाथ शिंदे थेट आनंदआश्रम गाठायचे. आनंद दिघे साहेब भेटावे म्हणून त्या ठिकाणी दोन-चार तास थांबायचे. आनंद दिघे साहेबांनी सांगितलेली छोटी-मोठी कामे ते निष्ठेने करायचे. आनंद दिघे साहेबांनी एकनाथ शिंदे यांच्यावर शाखाप्रमुखाची जबाबदारी टाकली. आज एकनाथ शिंदे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान आहेत. एक शिवसैनिक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावा हे शिवसेनाप्रमुख बालासाहेब ठाकरे यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण झाले आहे. आनंद दिघे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यातील दिनदुबळ्यांचे खऱ्या अर्थाने आधार ठरतील आणि आपल्या कामाचा ठसा संपूर्ण राज्यात उमटवतील, यात तीळमात्र शंका नाही. पुढील निरोगी आयुष्यासाठी त्यांना माझ्या शुभेच्छा…