Wednesday, April 23, 2025
Homeमहत्वाची बातमीमोदींचा माणूस...

मोदींचा माणूस…

  • डॉ. सुकृत खांडेकर

उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न शरद पवारांनी पूर्ण केले. पण त्यांना मुख्यमंत्रीपद आणि महाआघाडीचे सरकार टिकवता आले नाही. शरद पवार आणि सोनिया गांधींनी दिले, पण आपल्या कर्माने गमावले, अशी अवस्था ठाकरे यांची आठ महिन्यांपूर्वी झाली. शिवसेनेत काही गंभीर घडत आहे, आमदारांत मोठी नाराजी आहे, असे शरद पवार, अजित पवार यांनीही उद्धव यांच्या लक्षात आणून दिले होते. एवढेच काय स्वत: एकनाथ शिंदे व त्यांच्या अनेक सहकारी मंत्र्यांनी उद्धव यांना “चला भाजपबरोबर”, असे म्हटले होते, पण ठाकरे गाफील राहिले किंवा फाजिल आत्मविश्वासात दंग होते. समर्थन देणाऱ्या अपक्षांसह पन्नास आमदार राज्याच्या नेतृत्वाविरोधात बंडाचा झेंडा फडकवतात, हे सर्व अद्भुत होते. शिवसेनेत खदखदणाऱ्या असंतोषाचे नेतृत्व एकनाथ शिंदे यांनी केले. त्यांनी मोठी हिम्मत दाखवली.

शिवसेनेत असताना पक्षाचा प्रत्येक कार्यक्रम व पक्षाचा अजेंडा राबविण्यात शिंदे नेहमीच आघाडीवर असायचे. त्यांनी संघटन कौशल्याचा वापर करून पक्षाला कधीच कमी पडू दिले नाही. शिंदे यांनी पक्षासाठी सर्व काही दिले व सर्व काही सहन केले. पण काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर शिवसेनेने स्थापन केलेले सरकार हे त्यांना मुळीच पसंत नव्हते. एवढेच नव्हे तर शिवसेनेतही अन्य सहकारी आमदार व मंत्र्यांनाही ते मान्य नव्हते. ठाकरे सरकार ३० जून २०२२ रोजी कोसळले. उद्धव यांना वर्षावरून रातोरात वांद्र्याला मातोश्रीवर परतावे लागले. शिवसेनेच्या इतिहासातील ही मोठी नामुष्कीची घटना होती. पण एकनाथ शिंदे यांनी जे धाडस दाखवले, त्याचे श्रेय भारतीय जनता पक्षाने त्यांनाच दिले. भाजपच्या आमदारांची संख्या किती तरी जास्त असताना मोदी-शहांनी शिंदे यांना बलाढ्य व संपन्न महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीपद देऊन त्यांच्या धाडसाचे कौतुक केले. त्यांनी आठ महिन्यांपूर्वी दाखवलेली हिम्मत त्यांना यशाच्या शिखरावर घेऊन गेली.

एकनाथ शिंदे हे शिवसेनाप्रमुखांवर कट्टर निष्ठा असणारे शिवसैनिक. धर्मवीर आनंद दिघे यांचे ते पट्टशिष्य. कडवड शिवसैनिक म्हणून शिंदे यांचा अखंड प्रवास चालूच आहे. बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे ते सर्वेसर्वा असले तरी सर्वांना विश्वासात घेऊन या पक्षाचा ते गाडा चालवत आहेत. डोंबिवली-ठाण्यातील एक रिक्षावाला आज महाराष्ट्राच्या सर्वोच्च पदावर बसला आहे. मस्तकावर मुख्यमंत्रीपदाचा मुकुट आहे. पण त्यांच्यातला शिवसैनिक व सामान्य माणूस कायम जागा आहे. शिंदे मुख्यमंत्री म्हणून देशात कितव्या क्रमांकावर याची चर्चा अनेकदा ऐकायला मिळते, पण ते किती काम करतात, त्याचा का कोणी हिशेब मांडत नाही? अठरा तास काम करणारे हे मुख्यमंत्री आहेत. रात्री दोन-तीन वाजपर्यंत फायली तपासण्याची कामे किंवा कार्यक्रम, दौरे चालूच असतात. सकाळी ठाण्यात, दुपारी कोकणात, सायंकाळी मराठवाडा किंवा पश्चिम महाराष्ट्रात व रात्री मुंबईत परत. पायाला भिंगरी लावल्यासारखा हा माणूस फिरतोय. सर्वांना भेटतोय, प्रश्न समजावून घेतोय, प्रत्येकाच्या मागणीचा सहानुभूतीने विचार होतोय. त्यांच्या कामात मानवतावादी दृष्टिकोन आहे आणि त्यांचे मन संवेदनशील आहे. उद्धव ठाकरे, आदित्य, संजय राऊत यांच्या आरोपांचा कितीही भडीमार झाला तरी ते कधी खचले नाहीत किंवा त्यांना उत्तर देताना त्यांनी कधी पातळी सोडली नाही. पूर्वाश्रमीचे शिवसेनेतील नारायण राणे, छगन भुजबळ किंवा गणेश नाईक यांसारखे दिग्गज नेते स्वत:च्या ताकदीवर सार्वजनिक जीवनात पाय रोवून उभे आहेत, त्यात आता शिंदे यांची भर पडली आहे. शिंदे यांच्या उठावाने शिवसेनेचे जे अपरिमित नुकसान झाले आहे, ते भरून येणे कठीण आहे.

ठाण्याच्या कोपरी-पाचपाखडी मतदारसंघातून निवडून येणारे शिंदे हे राज्याचे विसावे मुख्यमंत्री आहेत. सन २०१५ ते २०१९ ते फडणवीस सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम (रस्ते) आणि २०१९ ते जून २०२२ पर्यंत ते ठाकरे सरकारमध्ये नगरविकास मंत्री होते. काही काळ ते विधानसभेत विरोधी पक्षनेतेही होते.

महाराष्ट्राची सत्ता गमावणे काय असते? हे माजी मुख्यमंत्र्यांना चांगले समजते. उद्धव ठाकरे २५ वर्षे मुख्यमंत्री राहणार अशी वल्गना त्यांचे निकटवर्तीय वारंवार करीत होते, त्यांचे हसे झाले. शरद पवार व वसंतदादा पाटील हे राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री झाले. पण त्यांनाही सलग पाच वर्षे कधीच या पदावर मिळाली नाहीत. देवेंद्र फडणवीस त्याबाबतीत भाग्यवान आहेत, त्यांनी मख्यमंत्रीपदावर पाच वर्षे पू्र्ण केली, कारण त्यांच्या पाठीशी मोदी-शहांचे आशीर्वाद होते. हेच आशीर्वाद आज एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी आहेत.

सत्ता गेल्यामुळे उद्धव ठाकरे व आदित्य अस्वस्थ असणे स्वाभाविक आहे. शिंदे यांच्यावर रोज आरोप केले जात आहेत. खोके, गद्दार, रेडे असली विशेषणे ऐकून जनता कंटाळली आहे. पण शिंदे यांनी आपला तोल कधी ढळू दिला नाही. सत्तेचे पद हे जनतेसाठी आहे, आपण लोकसेवक आहोत, याच भावनेतून ते काम करीत आहेत. जिथे जातील, तेथील समाजाशी एकरूप होऊन ते संवाद साधताना दिसतात. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत. पण आपण त्यांच्यापेक्षा वरचढ आहोत, असे कधी त्यांनी दाखवले नाही. उलट प्रत्येक ठिकाणी त्यांना आदराचे स्थान कटाक्षाने देत असतात. अगोदर आमदार, खासदारांना, लोकप्रतिनिधींना वर्षावर भेट मिळत नव्हती. आता मध्यरात्रीनंतरही वर्षा आणि नंदनवनाचे दरवाजे खुले असतात. आलेला कोणीही पाहुणचाराशिवाय जाणार नाही, याची काळजी तेथे घेतली जाते. नारायण राणे, गजानन कीर्तिकर अशा ज्येष्ठ नेत्यांशी ते नियमित संपर्कात असतात. भराडीमातेच्या दर्शनाला गेले असताना त्यांनी नारायण राणे यांच्या मालवणमधील घरी जाऊन त्यांची भेट घेतली. मुख्यमंत्री म्हणून नोकरशहांचा विश्वास त्यांनी संपादन केलाय. संघ भाजपच्या कार्यकर्त्यांशी ते आपुलकीने वागतात. केंद्र सरकारशी विशेषत: नॉर्थ ब्लॉक व साऊथ ब्लॉकशी त्यांचा नियमित संवाद आहे. महाराष्ट्र विश्वासाने संभाळणारा, केंद्राला साथ देणारा आणि ज्यांनी २०१९चा जनादेश धुडकावून ज्यांनी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले, त्यांना धडा शिकवणारा, असा मोदी-शहा यांना अभिप्रेत असणारा एकनाथ शिंदे, महाराष्ट्राचा सेवक आहे. दावोसला आंतरराष्ट्रीय आर्थिक परिषदेला शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून गेले होते, तिथे दीड लाख कोटींचे त्यांनी राज्यासाठी गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले. तिथे प्रत्येकजण मोदींविषयी आदराने बोलत होते. एका राष्ट्रप्रमुखाने विचारले, मोदींना तुम्ही किती मानता, त्यावर शिंदे यांनी “आम्ही तर मोदींचीच माणसे आहोत”, असे अभिमानाने सांगितले.

गेले काही दिवस आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री शिंदे यांनाच थेट आव्हान देत आहेत. “मी राजीनामा देतो, माझ्याविरोधात वरळीमधून निवडणूक लढवून दाखवा, वाट्टेल तेवढी ताकद लावा, खोकी वाटा, शिवसैनिक विकले जाणार नाहीत….”

शीतल म्हात्रे यांच्या शब्दांत सांगायचे, तर गेल्या निवडणुकीत आदित्यला निवडून येण्यासाठी किती सेटलमेंट्स करावी लागली, याचा त्यांना विसर पडला असावा. नंतर सुनील शिंदे व सचिन अहिर यांना विधान परिषद द्यावी लागली. एका वरळी मतदारसंघाला तीन आमदार मिळाले. हे सर्व कोणासाठी? आता तर आदित्य हे एकनाथ शिंदे यांना त्यांच्याविरोधात ठाण्यातून लढण्याचे आव्हान देत आहेत, हे म्हणजे अति झाले व हसू आले, असे म्हणावे लागले.

शिवसेना विस्तारात शिंदे यांचा किती वाटा आहे, हे कदाचित आदित्य यांना ठाऊक नसावे. कोरोना काळात एकनाथ शिंदे रोज अडीच लाख अन्नाची पाकिटे वाटत होते. सांगली-कोल्हापूरला अतिवृष्टीने झोडपले, तेव्हा पूरग्रस्तांसाठी ७० हजार चादरी घेऊन ते धावले होते. महाडला दरडी कोसळून डोंगर खाली आले, तेव्हा मुसळधार पावसात, गुडघाभर चिखलात उभे राहून ते त्यांच्या टीमसह अहोरात्र आपद्ग्रस्तांना मदत करीत होते. मुंब्रा-भिवंडीमध्ये इमारती कोसळल्या, तेव्हा बेघर झालेल्या लोकांची निवास व जेवणखाणाची त्यांनी व्यवस्था करून दिली. पैसे सर्वच राजकीय नेत्यांकडे असतात. पण गरजू लोकांसाठी खर्च करण्याचा दिलदारपणा शिंदे यांच्याकडे आहे. नागपूरमधील समृद्धी मार्गाचा कार्यक्रम किंवा मुंबईतील मेट्रोचे उद्घाटन, दोन्ही ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकनाथ शिंदे यांना जवळ घेऊन शाबासकी दिली, हीच शिंदे यांना त्यांच्या कामाची मिळालेली सर्वात मोठी पावती आहे. शिवसेना खूपच कमकुवत झाली आहे. ज्या दिवशी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत उठाव केला, ती उंटाच्या पाठीवरची शेवटची काडी ठरली.

[email protected]
[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -