- दशरथ पाटील, ज्येष्ठ नेते (बाळासाहेबांची शिवसेना)
ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या शिवसेनाप्रमुखांच्या मूलमंत्राचा खरा पाईक म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. राजकारण करत असताना त्यांच्यातला समाजसेवक कायम जागा असतो म्हणून त्यांचे वेगळेपण इतरांपेक्षा जास्त जाणवते. अनेक वेळा त्यांना भेटण्याचा योग येतो तेव्हा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांची कळकळ आणि दिलेला शब्द पाळण्यासाठी तळमळ जास्त जाणवते.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन, धर्मवीर आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली सामान्य शिवसैनिक म्हणून राजकीय आयुष्याला सुरुवात करून आज मुख्यमंत्रीपदापर्यंत झेप घेतलेले ठाणे जिल्ह्यातील आघाडीचे नेते. मितभाषी, दिलेल्या शब्दाला जागणारे, मैत्री जपणारे, बेरजेच्या राजकारणावर विश्वास असलेले अशी ओळख असलेले ‘लोकनाथ’ एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली ८० च्या दशकात शिवसैनिक म्हणून सामाजिक कार्यात स्वत:ला झोकून दिले आणि कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना एक सामान्य शिवसैनिक ते आज राज्य मंत्रिमंडळातील एक प्रभावशाली कॅबिनेट मंत्री ते मुख्यमंत्री अशी थक्क करणारी वाटचाल केली. राजकारणात केवळ घराणेशाहीच चालते, या समीकरणाला छेद देत एकनाथ शिंदे यांनी झोकून देऊन काम करण्याची वृत्ती, वाट्टेल तितकी मेहनत घ्यायची तयारी, समोरच्याचा विश्वास जिंकण्याची हातोटी आणि असामान्य नेतृत्वगुण यांच्या जोरावर पक्षनेतृत्वाने वेळोवेळी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला. त्यामुळेच आनंद दिघे यांच्या अकाली निधनानंतर ठाणे जिल्ह्यात निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी एकनाथ शिंदे यांनी रात्रीचा दिवस करून भरून काढली. महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये राज्यभरात भारतीय जनता पक्षाने झंझावाती यश मिळवले असताना एकनाथ शिंदे यांनी ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला कायम राखला. ठाणे महापालिकेतील शिवसेनेच्या गेल्या २५ वर्षांच्या इतिहासात शिवसेनेला प्रथमच एकहाती सत्ता प्राप्त झाली. त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच फडकला.
२०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्षनेतेपदासारखे महत्त्वाचे पद भुषवून त्यांच्या आजवरच्या वाटचालीचा गौरव केला. विरोधी पक्षनेते म्हणून मिळालेल्या जेमतेम महिनाभराच्या काळात त्यांनी दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या दुरवस्था लक्षात घेत शेतकऱ्यांच्या शेता-बांधावर पायपीट करत त्यांनी विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र असा जवळपास संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. शेतकऱ्यांसाठी केवळ तोंडाची वाफ दवडण्यात त्यांनी धन्यता मानली नाही. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी त्यांचे आपुलकीचे नाते निर्माण झाले. म्हणूनच २०१६च्या मे महिन्यात दुष्काळाला कंटाळून आपले घरदार सोडून रोजगारासाठी मुंबईकडे धाव घेतलेल्या नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालुक्यातल्या किमान ५०० दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी त्यांनी ठाण्यात महिनाभर बाळासाहेब ठाकरे दुष्काळग्रस्त छावणी सुरू करून त्यांचा सांभाळ केला, त्यांना रोजगार मिळवून दिला.
कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला असून अक्षरश: मृत्यूशय्येवरील एमएमआरडीएला पुन्हा आपल्या पायावर यशस्वीरीत्या उभे केले आहे. राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाने आकार घेत नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन करत शिंदेच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. विशेष म्हणजे समृद्धी महामार्गात शेतकऱ्यांना या प्रकल्पात भागीदार करून घेत त्यांना या योजनेचे फायदे समजावून सांगून, त्यांना विश्वासात घेऊन, या प्रकल्पात सहभागी करून घेण्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली.
२०२० हे वर्ष कोरोना काळात अत्यंत तणावाचे गेले. महाराष्ट्रातील ठाणे, मुंबई आणि पुणे या जिल्ह्यांना कोरोनाने जबर खिळवून ठेवले असताना एकनाथ शिंदे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून तळागाळातल्या प्रत्येक माणसापर्यंत उपचारासाठी कार्यरत राहिले. अत्यंत जलद गतीने कोविड सेंटरची निर्मिती केली. पोलीस, आरोग्य व प्रशासनातील कर्मचाऱ्यांनाही योग्य त्या सोयी-सुविधा देण्यासाठी एकनाथ शिंदे अग्रेसर राहिले. कोरोनाच्या अखेरच्या टप्प्यात स्वतःला कोरोना झाल्यानंतरही रुग्णालयातही ते स्वस्थ बसले नाही. प्रशासकीय कामांचा तेथूनही त्यांनी निपटारा केला.
त्याचप्रमाणे त्यांच्या नेतृत्वाखाली एमएसआरडीसीच्या माध्यमातून वांद्रे-वर्सोवा सी लिंक, ठाणे-बोरिवली टनेल, शीळ-कल्याण एलिव्हेटेड रोड, ऐरोली-काटई बोगदा, ठाणे-बोरिवली बोगदा, श्री स्वामी समर्थ क्षेत्र अक्कलकोटचा कायापालट, पुणे रिंग रोड, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे क्षमता विस्तार असे अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात येत आहेत. वांद्रे-वर्सोवा सी लिंकचे काम लवकरच सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे, एकनाथ शिंदे यांनी एमएसआरडीसीच्या उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न सुरू केले असून त्याअंतर्गत नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे राज्यातील काही महत्त्वाचे प्रकल्प एमएसआरडीसी राबवत आहेत.
सार्वजनिक बांधकाम खाते सांभाळत असताना त्यांच्यावर आरोग्य खात्याचा अधिक पदभार देण्यात आला. आरोग्यमंत्रीपद हाती येताच पालकमंत्र्यांनी ठाणे जिल्हा सिव्हिल रुग्णालय, उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालय आणि कामगार रुग्णांलयांच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले, तर आरोग्य विभागात मेगा भरतीचीही घोषणा केली. आघाडी सरकारमध्ये आर. आर. पाटील उपमुख्यमंत्री असताना अतिदुर्गम आणि नक्षली कारवायांनी त्रस्त असलेल्या गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद त्यांनी स्वीकारले होते. आज तिच जबाबदारी एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या शिरावर घेतली आणि गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी कार्यतत्पर झाले आहेत.
केरळमध्ये महाभयंकर पूर ओढवला. हजारो नागरिकांचा जीव गेला, तर अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. अशा वेळी ना. शिंदे आणि खा. श्रीकांत शिंदे यांच्या डॉक्टर पथकाने केरळला जाऊन पूरग्रस्तांची सुश्रूषा केली व त्यांना आर्थिक मदतीचे वाटप केले. ठाणे जिल्ह्यात धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर असून गेल्या एक तपाहूनही अधिक काळ एकनाथ शिंदे या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी लढा दिला. दर वर्षी पावसाळ्यात ठाण्यातील धोकादायक इमारती कोसळून निष्पाप नागरिकांचे बळी जातात. आमदार झाल्यानंतर गेल्या १२ वर्षांच्या काळात त्यांनी विधानसभेत विविध संसदीय आयुधांचा वापर करून सातत्याने हा प्रश्न मांडला. अनेकदा निलंबन पत्करलं, मुख्यमंत्र्यांना घेराव घातला, ठाणे ते मंत्रालय असा मोर्चा नेला. अखेरीस २०१४ साली तत्कालीन सरकारने ठाण्यातील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी क्लस्टर डेव्हलपमेंट योजना लागू केली. एका मोठ्या लढ्याला यश तर मिळालं. पण या योजनेत ज्या त्रुटी होत्या त्या दूर करण्यासाठी पुन्हा नवी लढाई सुरू झाली. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर या लढ्याला नवं बळ मिळालं आणि आज या योजनेतील सर्व अडचणी दूर होऊन ठाणे शहरासाठी क्लस्टर योजना लागू झाली आहे. त्यापुढच्या टप्प्यात संपूर्ण ठाणे जिल्ह्यासाठी क्लस्टर योजना यशस्वी व्हावी, यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील असून त्यालाही यश मिळत आहे. ठाणे जिल्ह्यासह गडचिरोली पालकमंत्रीपद स्वीकारत या जिल्ह्यांचा विकास करण्यासाठी समर्थ नेतृत्व त्यांनी केले.
प्रशासकीय व राजकीय कारकीर्द जगत असतानाच त्यांनी गेल्या वर्षी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण करत पदवीधर होवून आजच्या तरुणांपुढे उच्च शिक्षणाचा आदर्श निर्माण केला. त्यांचे चिरंजीव खा. श्रीकांत शिंदे हे स्वतः ऑर्थो डॉक्टर असल्याने शिंदे कुटुंबाने जनतेच्या आरोग्यसेवेकडे विशेष लक्ष दिले आहे. ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी जनतेच्या सोयीसाठी आरोग्यकेंद्र सुरू करून आरोग्य शिबिरे राबविली जात आहेत. दर वर्षी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री धर्मवीर आनंद दिघेंनी सुरू केलेल्या रक्तदान शिबिरात स्वतः खा. श्रीकांत शिंदेंनी रक्तदान करून ही मोहीम अविरत सुरू ठेवली आहे.
शिवसेना नेता, नगर विकासमंत्री, सार्वजनिक बांधकाममंत्री आणि ठाणे-गडचिरोली जिल्ह्याची जबाबदारी पेलल्यानंतर आता बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपसोबत सत्ता स्थापन करत ‘जनतेचे सरकार’ स्थापन केले. त्याच विश्वासाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साथीने मुख्यमंत्रीपद सांभाळत खऱ्या अर्थाने ‘लोकनाथ’ होण्याचा मान त्यांना मिळाला. महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला पाईक, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्रात विकासाचा महामेरू उभारत जनतेला चांगले आरोग्य, चांगल्या सेवा देण्यासाठी आई भवानी एकनाथ शिंदे यांना कायम यश देवो, याच वाढदिवसानिमित्त सदिच्छा!