Thursday, January 16, 2025
Homeताज्या घडामोडीदहावी, बारावीच्या परीक्षेत कॉपी करणाऱ्यांची आता गय नाही

दहावी, बारावीच्या परीक्षेत कॉपी करणाऱ्यांची आता गय नाही

तर पाच वर्षांसाठी परीक्षेला बसण्यास बंदी

महाराष्ट्र बोर्डाने परीक्षेसाठी जारी केले नवे नियम

पुणे : महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी बोर्डाने नवे कठोर नियम जारी केले असून नियम तोडणा-या विद्यार्थ्याची आता कोणतीही गय न करता परीक्षेत कॉपी करणाऱ्या दोषी विद्यार्थ्याला पाच वर्षांसाठी परीक्षेला बसण्यास बंदी घालण्यात येणार आहे.

राज्य सरकारने दहावी आणि बारावी परीक्षांबाबत एक महत्त्वाची अधिसूचना जारी केली आहे. यात दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अनेक नियम यंदा बदलण्यात आले आहेत. यासोबतच फसवणूक मुक्त परीक्षा आयोजित करण्यासाठी काही कठोर नियमही जाहीर करण्यात आले आहेत. उमेदवाराने परीक्षेचा पेपर चोरल्यास, मोबाइल किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक माध्यमातून परीक्षेचा पेपर घेतला, विकत घेतला किंवा पाठवला तर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पुढील पाच परीक्षांसाठी विद्यार्थ्याचे निलंबन करण्यात येणार आहे. यासोबतच उमेदवारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

अधिकृत उत्तरपत्रिका, पुरवणी, आलेख, नकाशे, बोर्डाच्या लॉग टेबल्सचा अनधिकृत ताबा आणि वापर केल्यास विद्यार्थी पुढील परीक्षेसाठी अपात्र ठरतील. उमेदवारावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल. उपकरणे वापरणे, मंडळाने मान्यता न दिलेले किंवा प्रतिबंधित केलेले साहित्य, परीक्षा हॉलमध्ये ठेवणे, चिथावणीखोर न वाचता येणारी भाषा वापरणे, अपशब्द लिहिणे किंवा धमकी देणे, उत्तरपत्रिकेत बैठक क्रमांक, फोन नंबर, रोमिंग क्रमांक देऊन संपर्क साधण्याची विनंती करणे, विषयाशी संबंधित नसलेला इतर मजकूर लिहिणे, परीक्षा सुरू असताना हेतूविना उत्तराबाबत इतर परीक्षार्थीशी संपर्क साधणे, एकमेकांकडे पाहून लिहिणे, इतर परीक्षार्थीना तोंडी उत्तरे सांगणे या सर्व गोष्टींवर बंदी असेल. अशा परिस्थितीत दहावी आणि बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. परीक्षा केंद्रात/परीक्षा दालनात कोणत्याही प्रकारे हत्यार/शस्त्र घेऊन येणे किंवा स्वत:जवळ बाळगणे, धमकावणे आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना पुढील पाच वर्षे परीक्षा देता येणार नाही, असे बोर्डाने म्हटले आहे.

यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा बंद करण्यात आल्या आहेत. शाळांनी होम सेंटर यंत्रणा बंद केली आहे. २५ टक्के कमी अभ्यासक्रम रद्द करून १०० टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा घेण्यात येणार आहे. उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी अर्धा तासाचा अतिरिक्त वेळही रद्द करण्यात आला आहे. यंदाच्या परीक्षेत बसलेले सर्व विद्यार्थी पूर्णवेळ त्याच शाळेत उपस्थित राहणार आहेत. ‘माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भात घालून दिलेल्या नियमांचे विद्यार्थ्यांनी पालन केले पाहिजे. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाणार आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई होऊ शकते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -