Friday, February 14, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेमुख्यमंत्र्यांची बर्थडे ट्रीट: कोपरी पुलाचे केले लोकार्पण

मुख्यमंत्र्यांची बर्थडे ट्रीट: कोपरी पुलाचे केले लोकार्पण

ठाणे (प्रतिनिधी) : मुंबई-ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर प्रवाशांची वाहतूक कोंडीपासून सुटका करण्याच्या दृष्टीने मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या वतीने उभारण्यात आलेल्या ठाणे शहरातील कोपरी येथील रेल्वे ओलांडणी पुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या पुलाच्या रुंदीकरणामुळे मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील सीमेवरील वाहतूक कोंडी दूर होऊन ती सुरळीत होणार आहे.

यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार निरंजन डावखरे, प्रताप सरनाईक, संजय केळकर, माजी आमदार रवींद्र फाटक, विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवासन, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, पोलीस आयुक्त जय जित सिंह आदी यावेळी उपस्थित होते.

या पुलाचे रुंदीकरण मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत करण्यात आले आहे. कोपरी रेल्वे ओलांडणी पुलाच्या कामाचा संपूर्ण खर्च एमएमआरडीएमार्फत करण्यात आला आहे. पुलाच्या रेल्वे मार्गिकांवरील भागाचे काम मध्य रेल्वे मार्फत करण्यात आले असून या भागाच्या बांधकामासाठी प्राधिकरणकडून रेल्वेला निधी देण्यात आला आहे. या पुलाची लांबी ७८४ मीटर तर रुंदी ३७.०४ मीटर इतकी आहे.

पूर्व द्रुतगती महामार्गावर हा ५ अधिक ५ मार्गिकांचा समावेश आहे, तर ठाणे शहरातील कोपरी रेल्वे ओलांडणी पुल हा २ अधिक २ मार्गिकांचा होता. या अरुंद रेल्वे ओलांडणी पुलामुळे सकाळी व संध्याकाळच्या वेळेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत होती. या वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्याच्या उद्देशाने प्राधिकरणामार्फत कोपरी रेल्वे ओलांडणी पुलाचे रुंदीकरण व बांधकाम करण्यात आले आहे.

या प्रकल्पात नौपाडा जंक्शन ते ज्ञानसाधना कॉलेज पर्यंत महामार्गाखालून वाहनांच्या रहदारीसाठी २+२ मार्गिकांचा ४० मीटर लांब आणि २१.२ मीटर रुंद भुयारी मार्ग देखील बांधण्यात आला आहे. प्रस्तावित नवीन कोपरी स्टेशनला जाणाऱ्या वाहनांसाठी भुयारीमार्ग, पादचाऱ्यांना पूर्व द्रुतगती महामार्ग ओलांडण्यासाठी पादचारी पूल देखील बांधण्यात आला आहे. तसेच चिखलवाडी परिसरातील पावसाळी पाण्याचा निचरा होण्याकरीता, चिखलवाडी नाल्यापासून साठेवाडी नाल्यापर्यंत पर्जन्य जल वाहिनीची (स्ट्रॉम वॉटर ड्रेनची) सुविधा उपलब्ध करून देणारा बंधिस्त नाल्याचे सुधारीकरण देखील करण्यात आले आहे.

श्रीनिवासन म्हणाले, कोपरी पूल हा मुंबई आणि ठाणे या दोन्ही जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावरील दोन्ही बाजूने येणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात कोंडी होत होती. मात्र नवीन रुंद पुलामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. त्यासोबतच तीन हात नाका परिसरातील वाहतुकीत मोठ्या प्रमाणात घट होणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -