- अतुल जाधव, पत्रकार, ठाणे
मुख्य सूत्र हाती घ्यावे करणे…
ते लोकांकरवी करवावे….
दुर्जनास ओळखावे
परी ते प्रकट न करावे…
सज्जनास परी ओळखावे
महत्त्व देऊनी…
तेच खरे असती दिग्गज राजकारणी!
संत रामदासांची दासबोधातील ही ओवी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत तंतोतंत खरी ठरली आहे. राजकारणात जर आणि तर याला नसते तरीदेखील काही समीकरणे नियती जुळवत असते. याबाबत नियतीने आपले दान एकनाथ शिंदे यांच्या पारड्यात टाकले. ठाण्यातील किसननगर परिसरातील शिवसैनिक-शाखाप्रमुख-नगरसेवक-सभागृह नेता ते थेट आमदार आणि त्यानंतर मंत्रीपदे भूषवत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अचंबित करणारा प्रवास आहे. अनेकांना हा चमत्कार वाटतो; परंतु हा चमत्कार नाही. शिवसेनेचा शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री हा दीर्घ प्रवास नक्कीच सोप्पा नव्हता. अनेक टप्पे असलेला हा प्रवास अनेक संघर्षांचा आहे.
ठाणे शहरातील कामगार वस्ती असलेल्या चाळीत वन रूम किचनमध्ये संसार असलेल्या कामगाराचा मुलगा एकनाथ आज राज्याचे नाथ आहेत. आनंद दिघे यांच्या तालमीत तयार झालेले एकनाथ शिंदे राजकारणात आपले नाणे खणखणीतपणे वाजवत आहेत. कुठेही संयम न सोडता महाराष्ट्रात ऐतिहासिक सत्तांतर घडवताना एकनाथ शिंदे यांची राजकीय खेळी अनेकांना चितपट करून गेली. त्यानंतर एकनाथ शिंदे या नावाचा डंका देशात नाही, तर परदेशात पोहोचला. बाळासाहेबांना मानणारे आणि शिवसैनिकांबरोबर प्रत्येक संकटात ठामपणे उभे राहणारे एकनाथ शिंदे यांनी दाखवलेली राजकीय करामत अनेकांना अचंबित करणारी ठरली. राज्याच्या राजकारणात अनेक वेळा त्यांच्या राजकीय करामतीचा चमत्कार पाहायला मिळतो. आज त्यांच्याकडे राज्यातील सत्तेचे सर्वात मोठे समजले जाणारे मुख्यमंत्रीपद आहे तरीदेखील हा नेता सर्वसामान्य शिवसैनिकांसारखा काम करत असतो. वागण्या-बोलण्यात कमालीचा साधेपणा, कार्यकर्त्यांत, माणसांमध्ये मिसळण्याची सवय ही मुख्यमंत्री झाल्यानंतरदेखील कायम आहे. पाय जमिनीवर आणि भान ठिकाणावर ठेवण्याची सद्सदविवेकबुद्धी यामुळेच त्यांच्या लोकप्रियतेचा आलेख वाढत चालला आहे.
मुलांचा शाळाप्रवेशाचा प्रश्न, महाविद्यालयात प्रवेश असो, क्लासची फी असो, नोकरीसाठी शिफारस पत्र असो परदेशात-देशात प्रवासात मदत, रक्ताची गरज, रुग्णालयात उपचारांची गरज, वीजबिलाचा घोळ अशी सामान्य गरजू-गरिबांची कामे एकनाथ शिंदे यांच्याकडून आजदेखील फक्त एका फोन कॉलवर होत असतात, हे वास्तव आहे. सत्तेत असो अथवा नसो लोकांची कामे करणे, प्रश्न सोडविणे यांना एकनाथ शिंदे यांनी नेहमीच प्राधान्य दिले आहे. आनंद दिघे यांच्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांनादेखील गर्दीचे व्यसन आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यात आपल्या निवासस्थानी मुक्कामी असतात तेव्हा पहाटेपर्यंत त्यांच्या दारात कार्यकर्त्यांची रिघ लागलेली दिसते. कमालीचा विनम्रपणा, पारदर्शकता आत्मीयता, प्रामाणिकता आणि जिव्हाळा यामुळे एकनाथ शिंदे इतर नेत्यांच्या तुलनेत वेगळे ठरतात. एखाद्या कार्यकर्त्याला शब्द दिला, तर त्यात कोणत्याही स्थितीत बदल होत नाही, शब्दाला जागणारा नेता म्हणून
त्यांची आहे म्हणूनच त्यांचा यशाचा आलेख वाढत चालला आहे.
ठाण्याचे धर्मवीर म्हणून ओळखले जाणारे आनंद दिघे काळाच्या पडद्याआड गेले त्याच काळात एकनाथ शिंदे यांच्या समर्थ नेतृत्वाची बीजे रोवली गेली. आनंद दिघे यांच्यानंतर जिल्ह्याचे नेतृत्व कोण करणार? असा प्रश्न पडलेला असताना एकनाथ शिंदे यांच्याकडे जिल्ह्याचे नेतृत्व आले. कुठेही फारसा गाजावाजा न करता केवळ राजकारणात परिपक्व आणि समाजकारण करताना एक इंचदेखील मागे सरकणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी नेतृत्व मिळवले आणि ते टिकवलेदेखील. ठाणे जिल्ह्यात धर्मवीर आनंद दिघे यांची प्रतिमा आणि प्रतिभा मोठी होती, आनंद मार्गावरचा प्रवास खचितच सुखाचा नव्हता. आनंद दिघे यांच्यानंतर जिल्ह्यातील शिवसैनिक सैरभैर होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. शिवसेनेच्या वर्तुळात एक मोठी पोकळी निर्माण झाली होती. जिल्ह्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी पुन्हा एकदा आपले फासे टाकण्यास सुरुवात केली असताना एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्याची शिवसेना पुन्हा नव्या ताकदीने उभी केली. पांगलेल्या शिवसैनिकांना पुन्हा मायेची साद देत एकत्र आणले. दांडगा जनसंपर्क ही एकनाथ शिंदे यांची जमेची बाजू ठरली. संपर्कात असलेल्या कार्यकर्त्याच्या दुःखात आणि सुखातदेखील सहभागी होण्याची एकनाथ शिंदे यांची सवय कार्यकर्त्यांचे भक्कम जाळे विणत गेली.
सार्वजनिक ठिकाणी बोलताना ते अतिशय संयमी भाषा वापरतात. कोणत्याही कार्यकर्त्याचा जाहीर अपमान होणार नाही, याचीही काळजी घेताना दिसतात. कार्यकर्त्यांकडून आलेल्या विवाह सोहळ्याच्या निमंत्रणाला आवर्जून उपस्थिती हा शिंदेंचा शिरस्ताच. त्याचबरोबर कार्यकर्त्याच्या कुणा जवळच्याचे निधन झाल्याचे समजताच एकनाथ शिंदे त्वरेने हजर. ही ऊर्जा त्यांना कुठून येते, हा सर्वच कार्यकर्त्यांना पडलेला प्रश्न त्यांच्यापाठोपाठ त्यांच्या विरोधकांनादेखील पडतो आहे. मुख्यमंत्रीपदी विराजमान असतानादेखील सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या घरी रात्री-अपरात्री पहाटेपर्यंत गणेशदर्शनासाठी भेटी देणे यावर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली; परंतु कमालीचा नम्र स्वभाव आणि लांब पल्ल्याची दृष्टी हा विधायक गुण एकनाथ शिंदे यांना कार्यकर्त्यांचे गुरुत्वाकर्षणाचे केंद्र बनवतो. एकनाथ शिंदे ठाणे महापालिकेत सभागृह नेते असताना त्यांच्या कार्यालयातील गर्दीचा विक्रम आजपर्यंत एकाही सभागृह नेत्याला मोडता आलेला नाही.
ठाण्यातील शिवसेनेचा किल्ला अभेद्य ठेवतानाच बाजूच्या कल्याण-डोंबिवली, बदलापूर, भिवंडी तसेच पालघर, नवी मुंबईतही शिवसेनेचा प्रभाव कसा वाढता राहील, याकडेही बारकाईने लक्ष असते. शिवसेनेचा झेंडा ठाण्यापाठोपाठ पालघर, नाशिक या ठिकाणी फडकत राहील, याची काळजीही ते घेत असतात.
गडचिरोलीचे पालकमंत्री असताना तिथल्या बैठकांना त्यांची हजेरी हा नेहमीच प्रशासकिय अधिकाऱ्यांचा कौतुकाचा विषय राहिला आहे. त्याचबरोबर मागील वर्षी रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये एक इमारत कोसळून कित्येकजण ठार झाले होते. अनेक मुले अनाथही झाली होती. एकनाथ शिंदेनी घटनास्थळी केवळ भेट दिली नाही, तर ज्या दोन मुलांचे आई-वडील गेले, त्यांचे पालकत्व स्वीकारून त्यांच्या शिक्षणाची सोयही केली. त्याची कुठे फार वाच्यताही होऊ दिली नाही. कदाचित हीच त्यांची कामगिरी त्यांचा राजकीय जीवनाचा आलेख उंचावत असावी. आपल्या सरकारी दौऱ्यातदेखील अनेकदा त्यांनी आपल्या वाहनांचा ताफा थांबून रस्त्यावर उतरून संकटात सापडलेल्या मदत केल्याची अनेक उदाहरणे आहेत.
सध्या देशात समृद्धी महामार्गाचे कौतुक होत आहे. या महामार्गाचे काम एकनाथ शिंदे यांच्या नियोजनात पूर्ण झाले आहे. ठाण्यात क्लस्टर योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. ठाणे शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न निकालात काढण्यासाठी क्लस्टर समर्थ पर्याय आहे. इमारत अधिकृत की अनाधिकृत असा घोळ न घालता त्यामध्ये वास्तव्य करून असणाऱ्या माझ्या सामान्य ठाणेकरांना लोकांना पक्की घरे कशी देता येतील? इतका एकच निकष लावून एकनाथ शिंदे या योजनेचा पाठपुरावा करत आहेत. ठाणे जिल्ह्याचा चेहेरा-मोहरा बदलण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कामाला लागले असून जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक नव्या प्रकल्पांची घोषणा करण्यात आली आहे. ठाणे शहरातील रस्त्यांची, उड्डाणपुलांची रखडलेली कामे वेगाने मार्गी लावण्यात येत आहेत. ठाणे शहरातील मेट्रो प्रकल्पाचे काम किंवा पूर्व आणि पश्चिम शहराला जोडणारे रेल्वे पुलाचे काम असो, एकनाथ शिंदेंनी प्रशासनाच्या अक्षरशः मागे लागून कामे पूर्ण करून घेण्याचा धडाका लावला आहे. पक्षातील कार्यकर्त्यांबरोबरच प्रशासनातील अधिकाऱ्यांवरही एकनाथ शिंदेंनी चांगलाच दबदबा निर्माण आहे.
विषय कोणताही असू दे, एकनाथ शिंदे यांचा त्या विषयातील अभ्यास पक्का असल्याने शासकीय अधिकारीदेखील त्यांच्यासमोर वचकून असतात. त्यांच्या सतत फॉलोअप घेण्याच्या कार्यशैलीमुळे अनेक महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लागत आहेत. सर्वसामान्यांचा कळवळा, आणि रांगेत उभ्या असलेल्या शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत नजर मिळवण्याची ताकद असलेल्या या नेत्यामुळे राज्याला एक उत्तम मुख्यमंत्री मिळाला आहे. त्यांच्या सुसंस्कृत संयमी नेतृत्वामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा आलेख उंचावत राहणार आहे. त्यांना दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा…