आम्ही एकत्रितरीत्या सामाजिक-राजकीय जीवनाची वाटचाल सुरू केली असे माझे मित्र व सगळ्यांचे लाडके, लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना उदंड आयुष्य लाभावे व त्यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा चौफेर विकास असाच पुढेही सुरू राहावा अशा सुरुवातीलाच शुभेच्छा देतो. शिंदे यांच्याबद्दल लिहिण्यासारखे व बोलण्यासारखे खूप काही आहे. कारण मी त्यांचा संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवास जवळून पाहिला आहे किंबहुना त्याचा मी एक साक्षीदार आहे.
कौटुंबिक नातेसंबंध-जिव्हाळा जपणारे, कधीही हाकेला धावून येऊन तात्काळ मदत करणारे, कडवट हाडाचे शिवसैनिक व ठाणेकर म्हणून मला एकनाथ शिंदे यांचा अभिमान आहेच, पण त्याहीपेक्षा त्यांनी आज जे काही नाव कमावले, आपल्या कामाचा प्रचंड मोठा डोलारा उभा केला, राज्याच्या राजकारणात स्वतःचे एक महत्त्वपूर्ण स्थान आणखी मजबूत केले, आपल्या मागे लाखो लोकांचे प्रेम व शक्ती जमविली ती फक्त आणि फक्त त्यांच्या नेतृत्व व कर्तृत्व, मेहनतीच्या जोरावर त्यांनी मिळवली आहे, हे निर्विवाद सत्य आहे. एकनाथ शिंदे यांच्यातील प्रामाणिकपणा, २०-२० तास काम करण्याची जिद्द व अफाट कार्यक्षमता, कमी बोलायचे पण जास्त काम करायचे ही पद्धत, दिलेला शब्द पूर्ण करण्याचा एकवचनी गुण, सकाळचे ७ असो की रात्रीचे २-३ वाजलेले असो, भेटायला आलेल्या प्रत्येकाला भेटायचेचे, त्यातही समाजातील शेवटच्या स्तरातील माणसालाही भेटून त्याची समस्या जाणून घ्यायची आणि ती तात्काळ सोडवायची असे त्यांच्यातील अनेक गुणविशेष आहेत. ज्यामुळे ते खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे लोकमान्य लोकनेते बनले आहेत.
दिवसाच्या २४ तासांपैकी अगदी २० तास शिंदे हे जनतेच्या गराड्यात असतात. ही त्यांची जनतेत मिसळण्याची सवय अगदी १९९७ साली आम्ही दोघे पहिल्यांदा नगरसेवक होऊन ठाणे महापालिकेत गेलो तेव्हापासून आजपर्यंत कायम आहे. आज मुख्यमंत्री झाल्यानंतरही गेल्या ७ महिन्यांत सुरक्षेची परवा न करता ते अगदी सहजपणे लोकांमध्ये मिसळतात. त्यांच्याकडे लोकांना इतका सहज प्रवेश मिळतो आणि इतक्या चटकन जनतेच्या समस्या सुटल्या जातात की जनतेत राहणारा, मिसळणारा, त्यांना थेट भेटून त्यांची कामे करणारा असा हा देशातील पहिला मुख्यमंत्री असेल.
त्यांचा राजकीय जीवनप्रवास सगळ्यांना माहीत आहेच. मी सुरुवातीला वेगळ्या पक्षात असलो तरी एकनाथ शिंदे यांच्याशी व्यक्तिगत मैत्री होतीच. त्यांच्या कामाची चर्चा त्यावेळी सुद्धा ठाण्याच्या राजकीय वर्तुळात कौतुकाने व्हायची. शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात अग्रभागी व आक्रमक असलेल्या एकनाथ शिंदे यांना १९९७ मध्ये आनंद दिघे यांनी ठाणे महापालिका निवडणुकीचे नगरसेवक पदासाठी तिकीट दिले आणि या निवडणुकीत शिंदे हे चांगल्या मतांनी विजयी झाले. त्यांचा राजकीय जीवन प्रवास तेव्हापासून उंचावतच राहिला आहे.
आमची मैत्री तेव्हापासून आतापर्यंत राजकारणाच्या पलीकडे कौटुंबिक राहिली आणि टिकलीही आहे. नगरसेवक असताना शिंदे यांच्या घरात जेव्हा दुःखद प्रसंग घडला तेव्हा आम्ही सगळे त्यांच्या दुःखात सहभागी होतोच, पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे आनंद दिघे यांनी त्यांना त्या दुःखातून बाहेर काढून महापालिकेत सभागृह नेते पद दिले. आपले व्यक्तिगत दुःख बाजूला ठेऊन शिंदे यांनी समाजातील इतर दुखितांचे, वंचितांचे, कष्टकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी दिवस-रात्र स्वतःला वाहून घेतले. लोकांची कामे करता-करता खऱ्या अर्थाने ते ‘गरिबांचे नाथ’ बनले. या सर्व वाटचालीत प्रत्येक क्षणी त्यांनी दिघे यांची शिकवण आणि प्रेरणा कायम लक्षात ठेवली. त्यानंतर शिंदे यांनी मागे वळून पाहिले नाही. जनतेच्या हिताचा उपक्रम असो की पक्षाची, जनहिताची आंदोलने असो प्रत्येक ठिकाणी एकनाथ शिंदे पुढे राहिले आणि त्यांनी आपले नेतृत्व यशस्वीपणे सिद्ध केले. धर्मवीरांनी जी जी जबाबदारी दिली ती शिंदे यांनी पूर्ण केली. आजही धर्मवीर दिघे यांनी सुरू केलेले उपक्रम, धार्मिक व जनसेवेचे सर्व कार्यक्रम ठाणे जिल्हा शिवसेना शाखेकडून अविरत सुरूच आहेत.
राजकारणात जबाबदाऱ्या व पदे मिळत असतात. आपण त्या कशा निभावतो, त्याला किती प्रामाणिकपणे न्याय देतो यावर लोकांचे लक्ष असते. पक्षाच्या कठीण काळात पुढे ठाणे जिल्हाप्रमुख म्हणून ठाणे शहरापासून ते संपूर्ण ठाणे, कल्याण, पालघरपर्यंत आपले कुशल संघटन कौशल्य शिंदे यांनी दाखवून पक्ष वाढविला. त्यांच्या कार्यशैलीने शिवसैनिकांमध्ये ऊर्जा तर संचारत गेली, पण ते अधिकाधिक लोकप्रियही होत गेले. प्रत्येक कार्यकर्ता, शिवसैनिक यांना शिंदे हे आपल्या घरातील, आपला माणूस वाटतो हे त्यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य आहे. हजारो शिवसैनिकांच्या आजवरच्या विविध प्रसंगांत, अडीअडचणीत शिंदे हे घरचा माणूस म्हणून उभे राहिले आहेत, प्रत्येकाला हवी ती मदत केली आहे. ज्यावेळी सिंघानिया हॉस्पिटलची तोडफोड झाली तेव्हा जवळपास २०० शिवसैनिकांवर गुन्हे दाखल झाले होते. त्यांना सोडविण्यापासून त्यांच्या कुटुंबीयांना त्यावेळी आधार देण्याचे काम शिंदे यांनी केले. कोणत्याही शिवसैनिकाला त्यांनी वाऱ्यावर सोडले नाही. अशी हजारो उदाहरणे देता येतील. धर्मवीर आनंद दिघे यांचे शिवसैनिकांशी हृदयाचे – घरचे, जणू रक्ताचेच नाते होते. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन शिंदे हे शिवसैनिकांची काळजी घेतात, म्हणून बाळासाहेबांचे लाखो शिवसैनिक आणि आम्ही ५० आमदार, १३ खासदार, अनेक प्रमुख नेते त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन पुढे आलो आणि आज बाळासाहेबांची शिवसेनाची वाटचाल सुरू आहे.
आदरणीय शिंदे हे अतिशय सामान्य घरातून पूढे आले आणि वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी त्यांनी समाजकारण व राजकारणात प्रवेश केला़ शिवसेनेच्या माध्यमातून ते लोकांची मनापासून सेवा करू लागले. त्यांच्यातील हे जनसेवेचे गुण पाहून धर्मवीर आनंद दिघे यांनी साधारण १९८४ मध्ये किसननगर येथील शिवसेनेचे शाखाप्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांची नियुक्ती केली होती. तेव्हापासून आजपर्यंत त्यांच्या स्वभावात जराही बदल झालेला नाही. शाखा कार्यालय असो की घर, समस्या घेऊन लोक त्यांच्याकडे हक्काने आजही जातात. त्यांच्याच भाषेत बोलायचे झाले तर ‘त्यांचे चालते – फिरते मंत्रालय’ २४ तास जनतेसाठी काम करीत असते ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे.
नगरसेवक आणि पुढे आमदार म्हणून आम्ही दोघांनीही जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठविला, विविध आंदोलने केली आणि शहराच्या हिताची कामे सरकारकडून करून घेतली. धर्मवीर आनंद दिघे यांचे विशेष प्रेम शिंदे यांच्यावर होते. त्यांनी दिलेला प्रत्येक आदेश आणि सूचनेचे शिंदे यांनी पालन केले. जिथे जिथे अन्याय दिसेल त्या अन्यायाच्या विरोधात आणि मराठी माणसाच्या हितासाठी आक्रमक भूमिका शिंदे यांनी घेतली, त्यामुळे त्यांच्या कामाचा व नावाचा दबदबा ठाण्यात वाढत गेला. आज ठाणे आणि एकनाथ शिंदे असे समीकरण बनले आहे, हे त्यामुळेच. ठाण्याचे ते गेले अनेक वर्षे पालक आहेतच, पण आता मुख्यमंत्री म्हणून संपूर्ण राज्याचे पालकत्व ते अगदी काळजीने निभावत आहेत. त्याचवेळी ते आपल्या मूळ ठाण्याकडे जराही दुर्लक्ष होऊ देत नाहीत.
धर्मवीर आनंद दिघे यांचा प्रभाव जनतेवर एवढा होता की, ‘शिवसेनेचा बालेकिल्ला… आनंद दिघेंचा ठाणे जिल्हा’ हे समीकरण झाले होते. धर्मवीर दिघे हे गेल्यानंतर दुःखाचा डोंगर कोसळलेल्या सर्व शिवसैनिकांना एकसंध ठेऊन ठाणे जिल्ह्यात शिवसेना वाढविण्यात एकनाथ शिंदे यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे, मोलाचे आहे आणि ते सर्वांना माहीत आहेच. तळागाळात जाऊन पक्षाला पुन्हा उभारी देत जिल्ह्यातील विविध महापालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषदा, ग्रामपंचायती, प्रत्येक निवडणुकीत शिंदे यांनी आपला भगवा झेंडा फडकावत कायम ठेवला. गावोगाव जाऊन जुने कार्यकर्ते टिकवलेच, पण नवीन कार्यकर्त्यांचे जाळेही तयार केले. मी २००८ मध्ये शिवसेना पक्षात आलो आणि २००९ मध्ये पहिल्यांदा आमदार झालो त्यावेळी स्वतःची निवडणूक असूनही शिंदे यांनी स्वतःच्या मतदारसंघात जितके लक्ष दिले तितकेच माझ्या विधानसभा मतदारसंघातही जातीने लक्ष दिले़ मला पहिल्या विधानसभा निवडणुकीत मोलाची साथ दिली हे कायम माझ्या स्मरणात आहे. आज मी तिसऱ्यांदा आमदार म्हणून काम करीत असताना
मला वेळोवेळी शिंदे यांची साथ-सोबत व मार्गदर्शन लाभते.
शिंदे हे २००४ मध्ये पहिल्यांदा आमदार झाले़ सुरुवातीला नगरसेवक, आमदार, जिल्हाप्रमुख, विरोधी पक्षनेते पुढे नगरविकास मंत्री अशी सगळी पदे त्यांनी अतिशय जबाबदारीने सांभाळून त्या पदांचा मान वाढविला. त्या पदांना पूर्ण न्याय दिला आहे. गेल्यावर्षी आम्ही ४० आमदारांनी उठाव केला आणि शिंदे यांनी आमचे नेतृत्व केले. अशक्य ते शक्य झाले आणि ठाण्याला पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाचा मान मिळाला ही माझ्यासह प्रत्येक ठाणेकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. आज ठाणे, मीरा-भाईंदर, मुंबई महानगरच नाही तर संपूर्ण राज्यात चौफेर विकास सुरू आहे. मुख्यमंत्री म्हणून सूक्ष्मपद्धतीने शिंदे हे लक्ष ठेऊन विकासाचे प्रकल्प मार्गी लावत आहेत. एकनाथ शिंदे व आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र हा देशात आज पहिल्या क्रमांकावर आहेच आणि भविष्यात प्रगतीचा हा आलेख असाच उंचावत जाईल यात कोणालाही शंका नाही.
२०१४ पासून जरी आम्ही सत्तेत एकत्र असलो, तरी २००९ मध्ये मी पहिल्यांदा आमदार झालो तेव्हा विधिमंडळात माझ्यासह शिंदे यांनी ठाणे-मीरा भाईंदरची मेट्रो, क्लस्टर डेव्हलपमेंट, पाणी प्रश्न असे अनेक जनतेचे प्रश्न उचलून धरले आणि त्यासाठी आम्ही तेव्हा सरकारशी संघर्ष केला, जनतेसाठी प्रसंगी आक्रमक होऊन प्रकल्प मार्गी लावून घेतले. नगरविकासमंत्री असताना त्या सरकारमध्ये आम्हा सर्व आमदारांना एकाच नेत्याचा आधार होता तो म्हणजे एकनाथ शिंदे. तेव्हा तर त्यांनी नगरविकास खात्यातून अनेक प्रकल्पासाठी विकास निधी मंजूर केलाच, पण आज शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर तर ठाणे, मीरा भाईंदरसाठी हजारो कोटींचा निधी विकास प्रकल्पासाठी मंजूर केला आहे. मुंबईचा कायापालट होतोय. ठाणे, मीरा-भाईंदर शहरही विकासाच्या मार्गावर अतिशय पुढे जात आहेत, हे मी माझ्या मतदारसंघापुरते बोलत असलो तरी मुंबईचा होत असलेला कायापालट, सौंदर्यीकरण आणि त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याच्या सर्व भागात विकासाची गती वाढविण्यावर शिंदे यांनी फडणवीस यांच्या साथीने भर दिला आहे. आजवर कधीही झाले नसतील एवढे झटपट विकासाचे निर्णय गेल्या ७ महिन्यांत शिंदे – फडणवीस यांनी घेतले आहेत. शिंदे हे ‘सी. एम.’ नाही तर ‘कॉमन मॅन’ म्हणूनच आजही वावरतात, हे प्रत्येकाला भावते. त्यांच्यातील कार्यकर्ता त्यांना २४ तास स्वस्थ बसू देत नाही, म्हणून ‘वेगवान निर्णय…वेगवान कृती’ आणि विकासाची गती असलेले हे सरकार अल्पावधीत लोकांचे सरकार बनले आहे. कारण शिंदे व फडणवीस हे बुलेट ट्रेनच्या गतीने विकासाचे निर्णय घेताहेत आणि सहकारी आमदार म्हणून त्याचा मी साक्षीदार आहे. आज शिंदे – फडणवीस सरकार ज्या पद्धतीने महाराष्ट्राचा राज्य कारभार करीत आहे ते पाहिले तर हे सरकार कार्यकाळ पूर्ण करून २०२४ मध्ये पुन्हा सत्तेत तर येईलच, पण या कार्यकाळाची ‘विकासाचे – प्रगतीचे शिंदे पर्व’ म्हणून इतिहास त्याची सुवर्ण अक्षराने नोंद घेईल, हेही नक्की. शिंदे – फडणवीस यांना देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह केंद्रातील नेत्यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन मिळत आहे, हेही नमूद करावेसे वाटते.
कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना जिद्द, मेहनत, स्व:कर्तृत्व याच्या जोरावर ज्यांनी आपले स्थान निर्माण व मजबूत केले अशांच्या यादीत एकनाथ शिंदे हे नक्कीच वरच्या स्थानी आहेत. त्यांचा प्रवास हा थक्क करायला लावणारा आहेच, शिवाय एकनाथ शिंदे यांच्या आयुष्याचा आणि राजकीय वाटचालीचा प्रवास प्रत्येकासाठी, विशेषतः तरुणांसाठी प्रेरणादायी आणि अनुकरणीय आहे. शिंदे यांच्यामध्ये माणसे जोडण्याचा व टिकविण्याचा उत्तम गुण आहे. ‘सडक से सत्ता तक का सफर’ असे हिंदीत म्हणतात, त्यानुसार त्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर रस्त्यावरची आंदोलने करीत, रस्त्यावरच्या सामान्यातील सामान्य-लाखो लोकांना आपल्याशी मायेने जोडत, संघर्ष करीत, संयमाने वाटचाल करीत आज सत्तेच्या खुर्चीपर्यंत ते पोहोचले आहेत. सत्ताधारी असो की विरोधक, प्रत्येक जण शिंदे यांच्या मेहनती स्वभावाचे कौतुक करतोच. आज त्यांनी जे काही मिळविले ते आपल्या चांगल्या कर्माच्या जोरावरच. त्यामुळे खऱ्या अर्थाने शिंदे हे ‘कर्मवीर’ आहेत, असे मला म्हणावेसे वाटते. त्यांची यशस्वी घोडदौड अशीच सुरू राहणार आहे, पण वाढदिवसाच्या दिवशी थोडे मनातील लिहावेसे वाटले इतकेच.
कर्मवीर किंवा कर्मयोगी कोणाला म्हणता येईल? तर जी व्यक्ती आपल्या संपूर्ण जीवनात जनसेवेला वाहून घेते आणि कर्म हाच त्याचा धर्म आहे हे जाणते. काम करीत असताना त्याचा फायदा, तोटा किंवा परिणामाची अपेक्षा न ठेवता कर्माच्या मार्गावर चालत राहतो अशा व्यक्तीला खरा कर्मयोगी म्हणतात. आमचे मित्र एकनाथ शिंदे हे आयुष्याच्या सुरुवातीपासून प्रामाणिकपणे काम करीत गेले, कर्तव्य पथावर चालत राहिले आणि त्यांच्या या मेहनतीचे फळ परमेश्वराने त्यांना दिले आहे. आपला महान महाराष्ट्रही अशाच अनेक गुणवान रत्नांची खाण आहे. त्यामुळे अशा कर्मालाच धर्म मानणाऱ्या कर्मयोगी शिंदे यांना आई जगदंबा शतायुष्य देवो आणि त्यांची राजकीय कारकीर्द अशीच बहरत राहो, हे वाढदिवशी अभीष्टचिंतन!
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…