- किशोर आप्पा पाटील, आमदार, पाचोरा – भडगाव
कर्मण्ये वाधिकारस्ते माँ फलेषु कदाचन..!” ही आदर्श व प्रेरणादायी उक्तीच आपले जीवन गाणे बनवून त्या आधारे राजकारणासह सर्वांगीण क्षेत्रात आपले नेतृत्व, कर्तृत्व, दातृत्व व वक्तृत्वाची गगनभरारी घेऊन राज्याला सर्वार्थाने प्रगत, संपन्न व सक्षम बनविण्यासाठी धडपडणाऱ्या, देशाच्या राजकारणातील ऐतिहासिक उलथापालथीचे खऱ्या अर्थाने ‘नायक’ ठरलेल्या व राज्याचे विकासशील, विश्वासदायी नेतृत्व म्हणून समाजमान्य झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस, त्यानिमित्ताने त्यांना शुभेच्छा… ”जीवन सरिता वाहत राहो, ओलांडूनी शतकाच्या सीमा, प्रगती, विकास, यश, कीर्ती वाढत राहो याच आमच्या शुभेच्छा!” शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे खंबीर व विश्वासू शिवसैनिक, धर्मवीर आनंद दिघे यांचे कार्य, मार्गदर्शन व आशीर्वादाने प्रेरित होऊन शिवसेनेच्या तत्त्व व विचारांप्रति आयुष्य वेचणाऱ्या एकनाथ शिंदे यांची आतापर्यंतची वाटचाल खरोखरच प्रेरणादायी व कौतुकास्पद आहे.
८० टक्के समाजकारणासाठी २० टक्के राजकारण या तत्त्वाने प्रेरित होऊन ठाणे परिसरातून त्यांनी ‘सच्चा शिवसैनिक’ म्हणून आपल्या कार्याचा श्रीगणेशा केला. रिक्षा व्यवसायातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असताना समाजातील दुःख, अन्याय, सोसणाऱ्यांसाठी सर्वस्व बहाल करण्याची त्यांची वृत्ती त्यांच्या ‘शिवसैनिक’ या शब्दाला सर्वार्थाने सार्थक ठरत गेली, त्यामुळे शिवसेनाप्रमुखांसह धर्मवीर आनंद दिघे व तत्कालीन शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा विश्वास संपादन करून त्यांनी ‘समाजसेवक’ म्हणून आपली ओळख निर्माण केली व आजतागायत ते या तत्त्वांपासून थोडेही दूर झालेले नाहीत.
आपण समाजाचे देणे लागतो, समाजाप्रति आदर व संवेदना असावी, या उदात्त विचारातून त्यांनी दीनदलित, गोरगरीब, दुर्लक्षित व अन्यायग्रस्तांसाठी उल्लेखनीय कार्य केले. अशक्य ते शक्य करून दाखवावे या निर्धाराने व विश्वासाने त्यांनी केलेली वाटचाल साऱ्यांनाच अचंबित करणारी ठरली आहे; परंतु समाजाच्या उन्नतीसाठी झटणाऱ्या व वेळप्रसंगी आक्रमक व ताठर भूमिका घेणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या अंगी असलेले शांत, संयमी स्वभावगुण त्यांचे व्यक्तिमत्त्व, लौकिक व विश्वासार्हतेत भर घालणारे ठरले आहेत.
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात ज्या ज्या काही राजकीय घडामोडी झाल्या त्या सर्व घडामोडीत मुख्यमंत्री शिंदे यांचा सहभाग, धाडस व निर्णय यशस्वी व महत्त्वपूर्ण ठरले व त्यांच्या दमदार नेतृत्व व कर्तृत्वावर नेत्यांचा विश्वास बसला. त्यामुळेच त्यांच्या दिशेने अनेक राजकीय पदे चालत आली. या पदांवर काम करताना त्यांनी राबविलेली ध्येय-धोरणे व घेतलेले निर्णय समाजातील सर्व घटकांचा सन्मान करणारे व न्याय देणारे ठरले, म्हणूनच त्यांचे नेतृत्व समाजमान्य व लोकप्रिय होत गेले. मुख्यमंत्री शिंदे यांची सामाजिक प्रगती व विकास कामांसंदर्भातील निर्णयक्षमता व तत्परता, समाजातील प्रत्येक घटकाला सक्षम करण्यासाठीची धडपड, दृष्ट लागेल असा लोकसंग्रह, गगनाला गवसणी घालणारी इच्छाशक्ती व विरोधकांनाही आपलेसे करण्याची खूबी त्यांच्या नेतृत्वाला तेजस्वी करणारी ठरली व ठरत आहे.
शेती, उद्योग, औद्योगिक प्रकल्प, कष्टकरी, कामगार, मध्यमवर्गीय, कर्मचारी, गोरगरीब, दीनदलित, दुर्लक्षित, पीडित, अन्यायग्रस्त, विद्यार्थी व युवक यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी त्यांनी घेतलेले निर्णय व निर्णयांच्या अमलबजावणीसाठी दाखविलेली तत्परता कमालीची कौतुकास्पद ठरली आहे. आपल्या सहकाऱ्यांसह विरोधकांनाही आपलेसे करून, त्यांच्याप्रति प्रेम व आपुलकी दाखवून, त्यांचा विश्वास संपादन करून न्याय देण्याची व विकास आणि सर्वांगीण प्रगतीकडे वाटचाल करण्याची त्यांची शैली दिग्गजांनाही लाजवेल अशी आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी आतापर्यंत जी पदे भूषवली त्या पदांवरील त्यांच्या परिपूर्ण व न्यायिक कार्यामुळे त्या पदांचा मानसन्मान वाढला आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी संपूर्ण देश हादरवून टाकणारी जी राजकीय घडामोड झाली त्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ‘नायक’ ठरले. आतापर्यंतच्या राजकीय इतिहासात घडली नाही अशी अत्यंत धाडसी, साहसी व कोणत्याही परिणामांची चिंता न करणारी घटना मुख्यमंत्री शिंदे यांनी यशस्वी केली. या घटनेने सारा देश अचंबित झाला असला, तरी सत्तांतरानंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या विकासासाठी घेण्यात आलेले धाडसी निर्णय समाजातील प्रत्येक घटकाला न्याय, समाधान व आनंद देणारे ठरले आहेत. केवळ निर्णय घेऊन राज्यातील जनतेचा विश्वास मिळवावा ही वृत्ती न जोपासता घेतलेल्या निर्णयांची अत्यंत तत्परतेने अमलबजावणी करून समाज घटकांना न्याय देऊन त्यांना विकासाच्या प्रवाहात सामावून घेण्याचे एकनाथ शिंदे यांचे कौशल्य शब्दातीत ठरले आहे. राज्याला सर्वार्थाने संपन्न व सक्षम करण्यासाठी आरोग्य, उद्योग, शिक्षण ही क्षेत्र विकसित करून बेरोजगारीचा प्रश्न यशस्वीपणे मार्गी लावण्यासाठी दावोस येथील संमेलनात त्यांनी घेतलेली भूमिका व केलेले करार राज्यातील प्रत्येक व्यक्तीसाठी अभिमानास्पद ठरणारे आहेत.
शेती, शेतकरी यावरच राज्याचा विकास अवलंबून आहे या उदात्त हेतूने गेल्या काळात अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीग्रस्त बळीराजाला सावरून त्यांना खऱ्या अर्थाने बळ देण्यासाठी भरपाईबाबत घेतलेले विक्रमी निर्णय, बेरोजगार तरुणांच्या रोजगारासाठी विविध क्षेत्रात भरतीचा घेतलेला निर्णय, अपघात व आगीप्रसंगी लगबगीने धावून जात जखमी व पीडित कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा हात देण्यासाठीची लगबग, गोरगरिबांची दिवाळी गोड व्हावी म्हणून ‘आनंद शिधा’ सारखा विक्रमी उपक्रम, शहरी व ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी भरीव निधीची तरतूद, विविध लाभार्थी योजनेतील खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचविण्यासाठीचे नियोजन या कार्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला समाज मान्यता मिळाली असून, त्यांचे नेतृत्व खऱ्या अर्थाने लोकप्रिय ठरले आहे.
कोणतीही टीका अथवा विरोधाकडे लक्ष देऊन राज्य विकासासाठीचा आपला वेळ वाया घालविण्यात अर्थ नाही, या विचारातून त्यांनी रात्रीचा दिवस करून सुरू ठेवलेले कार्य त्यांच्या प्रति सहानुभूती व आपुलकी वृद्धिंगत करणारे ठरले आहे. त्यांचे विकासशील, विश्वासार्ह व दमदार नेतृत्व व राज्याच्या विकासासाठीचे व्हिजन यशस्वी होवो हीच त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा! तसेच निरोगी उदंड आयुष्यासाठी परमेश्वराचरणी प्रार्थना…!