Thursday, July 18, 2024
Homeमहत्वाची बातमीराज्याचा अर्थसंकल्प ९ मार्चला मांडणार

राज्याचा अर्थसंकल्प ९ मार्चला मांडणार

देवेंद्र फडणवीसांचा अर्थमंत्री म्हणून पहिलाच अर्थसंकल्प

२७ फेब्रुवारी ते २५ मार्च दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशन

मुंबई : येत्या २७ फेब्रुवारीपासून राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Budget session) सुरुवात होणार आहे. २५ मार्चपर्यंत हे अधिवेशन असणार आहे. ९ मार्चला अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे अर्थसंकल्प मांडणार आहेत. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पात नेमक्या काय घोषणा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात ९ मार्चला दुपारी २ वाजता अर्थसंकल्प सादर करण्यात येईल. तत्पूर्वी म्हणजे ८ मार्च रोजी महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल मांडला जाणार आहे.

विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे घेण्यात आली.

बैठकीत २७ फेब्रुवारी ते २५ मार्च दरम्यान होणाऱ्या विधानपरिषद व विधानसभा बैठकांच्या तात्पुरत्या दिनदर्शिकेवर चर्चा करण्यात आली. अधिवेशनाची सुरुवात सोमवार, दिनांक २७ फेब्रुवारी रोजी राज्यपालांच्या अभिभाषणाने होणार आहे.

महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये यापुढे प्रत्येक अधिवेशनात पहिल्या दिवशी ‘वंदे मातरम’ नंतर ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्राचे राज्य गीत वाजवण्यात येणार आहे.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवीवर्षानिमित्त अभिवादनाबाबतचा ठराव दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे. तसेच जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्च रोजी दोन्ही सभागृहात याबाबत विशेष चर्चा होईल. अर्थसंकल्पावर तीन दिवस तर अर्थसंकल्पीय मागण्यावर सहा दिवस चर्चा करण्यात येणार आहे. विधेयकांपैकी प्रस्तावित विधेयके (मंत्रीमंडळाची मान्यता प्राप्त) ५ आणि प्रस्तावित विधेयके (मंत्रीमंडळाची मान्यता अपेक्षित) ८ अशी अंदाजे १३ विधयके या अधिवेशनात मंजुरीसाठी मांडली जाणार आहेत. दोन्ही सभागृहातील कामकाजासंदर्भात सविस्तर चर्चा यावेळी करण्यात आली.

सत्ताधारी बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपसाठी हा अर्थसंकल्प महत्वाचा असणार आहे. कारण सत्तेत आल्यानंतर सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प आहे. यावर्षी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. तसेच मुंबई, ठाणे, नागपूर महापालिकेसह अन्य महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या देखील निवडणुका होत आहे. त्यामुळे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पात काही महत्त्वाच्या घोषणा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सध्या राज्य मंत्रिमंडळाच्या रचनेत राज्यमंत्री नाहीत. त्यामुळे अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होऊन वित्त खात्यासाठी राज्यमंत्री नेमण्यात आला नाही तर विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर कोण सादर करणार असा एक प्रश्न उपस्थित केला जात आहे.

देवेंद्र फडणवीसांचा अर्थमंत्री म्हणून पहिलाच अर्थसंकल्प

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत मुख्यमंत्री, गृहमंत्री, विरोधी पक्षनेता, उपमुख्यमंत्री अशी अनेक पदे भूषविली आहेत. मात्र, अर्थमंत्री म्हणून त्यांचा हा पहिलाच अर्थसंकल्प असणार आहे. त्यामुळे फडणवीसांच्या दृष्टीने हा अर्थसंकल्प महत्वाचा मानला जात आहे. आमदार असताना त्यांनी ‘अर्थसंकल्प कसा वाचावा’ हे पुस्तक लिहिले आहे. तसेच अर्थसंकल्प या विषयावर अनेक व्याख्याने देखील फडणवीसांनी दिली आहेत. या अर्थसंकल्पात लोकांच्या सूचनांचे प्रतिबिंब असावे, म्हणून त्यांनी जनतेतून सूचना मागवल्या आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -