मध्यमवर्गीय गृहिणीने मने जिंकली

Share

इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या नेहमीच पाचवारी साडीत असतात, कपाळावर कुंकू असते आणि घरातील ताई, माई, वहिनीच्या भूमिकेतून बोलत असतात. केंद्रीय अर्थमंत्रीपद अतिशय शक्तिशाली पद आहे. अर्थमंत्री म्हणून मोरारजी देसाई, यशवंतराव चव्हाण, डॉ. मनमोहन सिंग, यशवंत सिन्हा, पी. चिदंबरम, अरुण जेटली अशा अनेक दिग्गजांनी देशाचे अर्थसंकल्प सादर केले. पण तमिळ कन्या असलेल्या निर्मला सीतारामन यांनी मंत्रीपदावर काम करताना मध्यमवर्गीय गृहिणी म्हणून देशवासीयांची मने जिंकून घेतली आहेत. १ फेब्रुवारीला २०२३-२४ चा अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांनी देशाच्या अर्थमंत्री म्हणून सादर केला. निर्मला यांनी सलग मांडलेला हा पाचवा अर्थसंकल्प. एक तास २७ मिनिटे केलेल्या भाषणातून त्यांनी देशातील सर्व समाजातील सर्व घटकांना काही ना काही त्यांच्या हिताचे दिलेच. जगात अनेक देशांपुढे मंदीचे सावट असताना, पाश्चात्त्य देशात बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये धडाधडा हजारोंची नोकरकपात चालू असताना भारताचा विकासदर चांगला राहील, याची हमी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. यापुढे सात लाख रुपये वार्षिक उत्पन्नापर्यंत आयकर द्यावा लागणार नाही, ही घोषणा म्हणजे देशातील सामान्य माणसाला विशेषत: कनिष्ठ नोकरदारांना सर्वात मिळालेला मोठा लाभ आहे. गरिबांना घरे देण्यासाठी ६६ टक्क्यांनी त्यांनी निधी वाढवून दिला. पुढील वर्षापर्यंत ८० कोटी गरिबांना मोफत रेशन देण्यासाठी मुदत वाढवून दिली. ४७ लाख युवकांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रमही जाहीर केला आहे. अर्थमंत्र्यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाचे ‘अमृत कलश’ असेच वर्णन केले गेले.

यंदाचा अर्थसंकल्प मांडताना निर्मला सीतारामन यांनी इंडिया हा शब्द ६१ वेळा, टॅक्स ५९ वेळा, इंडियन नेशन किंवा नॅशनल ८५ वेळा, फार्मर-किसान १४ वेळा, यूथ ११ वेळा, अमृतकाल हा शब्द ७ वेळा उच्चारला.

तामिळनाडूच्या मदुराईत एका सामान्य कुटुंबात १८ ऑगस्ट १९५९ रोजी निर्मला यांचा जन्म झाला. त्यांनी तिरुचिरापल्लीच्या सीतालक्ष्मी रामस्वामी कॉलेजमधून अर्थशास्त्राची पदवी संपादन केली व नंतर पदव्युत्तर शिक्षण त्यांनी दिल्लीतील जेएनयूमध्ये घेतले. डॉ. परकला प्रभाकर यांच्याशी त्यांचा १९८६ मध्ये विवाह झाला. डॉ. परकला यांचे शिक्षण लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे झाले. निर्मला यांचे वडील नारायण सीताराम हे रेल्वेत नोकरीला होते. आई सावित्री या गृहिणी होत्या. २००३ ते २००५ या काळात त्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य होत्या. २००६ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. २०१० मध्ये त्यांची पक्ष प्रवक्ते म्हणून नियुक्ती झाली. मोदी सरकारमध्ये त्या सुरुवातीला उद्योग वाणिज्य मंत्री होत्या. नंतर देशाच्या संरक्षण व अर्थखात्याच्या पूर्ण वेळ पहिल्या महिला मंत्री म्हणून त्यांना मान मिळाला. लग्नानंतर त्या पतीबरोबर लंडनला वास्तव्यासाठी गेल्या, तेव्हा त्यांनी होम डेकोर स्टोअरमध्ये सेल्स गर्ल म्हणून काम केले. एके काळी स्टोअरमध्ये सेल्स गर्ल म्हणून काम करणाऱ्या निर्मला या देशाच्या अर्थमंत्री आहेत.

मोरारजी देसाई यांनी १० वेळा देशाचा अर्थसंकल्प मांडला, पी. चिदंबरम व प्रणव मुखर्जी यांनी ९ वेळा, यशवंतराव चव्हाण व सी. डी. देशमुख यांनी ७ वेळा, डॉ. मनमोहन सिंग व टी. टी. कृष्णम्माचारी यांनी म्हणून ६ वेळा देशाचा अर्थसंकल्प मांडला. केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर २०१७ पासून दर वर्षी १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर होऊ लागला. पूर्वी अर्थसंकल्पाची प्रत व भाषण ब्रीफकेसमधून संसदेत आणण्याची प्रथा होती. देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिला अर्थसंकल्पही लेदरच्या बॅगमधून संसदेत आणला होता. निर्मला यांनी रेशमी कापडात (वही-खाता) गुंडाळून अर्थसंकल्प संसदेत आणला. निर्मला यांनी पहिला पेपरलेस अर्थसंकल्प सादर केला. टॅबलेटवरून त्यांनी आपले भाषण वाचले. अर्थसंकल्पावर सर्वात मोठे भाषण करण्याचा विक्रम निर्मला सीतारामन यांनी नोंदवला आहे. सन २०२० मध्ये त्यांनी अर्थसंकल्प सादर करताना २ तास ४१ मिनिटे भाषण केले.

२०१९ मध्ये २ तास १५ मिनिटे त्या बोलल्या. २००३ मध्ये जसवंत सिंह यांनी अर्थसंकल्प सादर करताना २ तास १३ मिनिटे भाषण केले होते, तर २०१४ मध्ये अरुण जेटली यांनी २ तास १० मिनिटे भाषण केले.

२०२२ मध्ये निर्मला सीतारामन यांनी समोर टॅबलेट ठेऊन अर्थसंकल्प मांडला. तेव्हा केलेल्या १ तास २० मिनिटांच्या भाषणात त्यांनी जीएसटीचे आकडे सांगताना कागद हाती घेतला होता. त्यावेळी दीड तास भाषण झाल्यावर त्यांची तब्येत बिघडली. त्यांनी बाजूला बसलेल्या हरसिमरत कौर यांच्याजवळ गेल्या. औषधही घेतले. बाजूच्या आसनावर बसलेल्या राजनाथ सिंह यांनी त्यांना आता भाषण वाचू नका, असेही सुचवले. पण त्यांनी पुन्हा भाषण वाचायला घेतले. १९७७ मध्ये तत्कालीन अर्थमंत्री हिरूभाई एम. पटेल यांनी केवळ ८०० शब्दांचा अर्थसंकल्प सादर केला होता. या वर्षी अर्थसंकल्प सादर करताना निर्मला यांनी ओडिसाची ओळख असलेली लाल रंगाची संबलपुरी सिल्क साडी परिधान केली होती. २०१९ मध्ये त्यांनी त्यांचा पहिला अर्थसंकल्प सादर केला, तेव्हा आंध्र प्रदेशची खासियत असलेली गडद गुलाबी रंगाची मंगलगिरी साडी नेसली होती. २०२० मध्ये तामिळनाडूची पारंपरिक पिवळ्या रंगाची कांजीवरम सिल्क साडी नेसली होती.

२०२१ मध्ये बंगालची पोचमपल्ली साडी नेसली होती. २०२२ चा अर्थसंकल्प सादर करताना कॉफी कलरची साडी होती व त्यावर सोनेरी रेषा होत्या. सोनपुरी साडी ही ओडिसाची पारंपरिक साडी आहे.

सन २०१९च्या हिवाळी अधिवेशनात खासदार सुप्रिया सुळे शेतकऱ्यांचे प्रश्न संसदेत मांडत होत्या. त्याच वेळी काही खासदारांनी कांद्याच्या चढ्या भावाबद्दल विचारणा केली, तेव्हा निर्मला सीतारामन चटकन म्हणाल्या, “मी कांदा-लसूण खात नाही. मी अशा घरातून येते की, तेथे घरात कांदा ठेवला जात नाही….” १९६४ व १९६८ मध्ये अर्थमंत्र्यांना त्यांच्या वाढदिवसाला अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाली. हा योगायोग होता. मोरारजी देसाई हे अर्थमंत्री होते. २९ फेब्रुवारी हा त्यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म या दिवशी गुजरातमधील बलसाडला झाला. त्यांनी अर्थमंत्री म्हणून ८ वेळा पूर्ण आणि २ वेळा हंगामी अर्थसंकल्प सादर केला होता.

१९७० मध्ये मोरारजींनी अचानक राजीनामा दिला तेव्हा इंदिरा गांधींनी अर्थ मंत्रालय स्वत:कडे घेतले. इंदिरा गांधींनी २८ फेब्रुवारीला संसदेत अर्थसंकल्प सादर केला. त्या भाषणाला उभ्या राहिल्या तेव्हा सदस्य बाके वाजवून जोरदार स्वागत केले. त्या म्हणाल्या, “मुझे माफ करिएगा।” ते ऐकून सदनात सन्नाटा पसरला. त्यावर इंदिराजींनी स्मितहास्य केले. त्या पुन्हा म्हणाल्या, “माफ करिएगा… मै, इस बार सिगारेट पिनेवालों के जेब पर बोझ बढाने वाली हूँ।” डॉ. मनमोहन सिंग १९९१ ते १९९६ असे सहा वर्षे अर्थमंत्री होते. १९९१-९२ मध्ये त्यांनी भाषणात कविता सादर केली. अल्लामा इक्बालच्या शायरीचा उल्लेख केला. नरसिंह राव पंतप्रधान असताना मनमोहन सिंग अर्थमंत्री होते. जागतिकीकरणाची सुरुवात त्यांच्या अर्थसंकल्पापासून झाली. १९९१ मध्ये त्यांनी दिलेले भाषण १८ हजार ६५० शब्दांचे होते. त्यांच्या अर्थसंकल्पावर भाजप, समाजवादी, डावे पक्ष त्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. माजी पंतप्रधान चंद्रशेखर म्हणाले, “ईस्ट इंडिया कंपनी अशीच भारतात आली व देश गुलाम झाला.” त्यावर नरसिंह राव म्हणाले, “चंद्रशेखरजी, मी आपल्याच माणसाला (डॉ. मनमोहन सिंग) अर्थमंत्रीपद दिले आहे. मग आज आपण विरोध का करीत आहात?” त्यावर चंद्रशेखर म्हणाले, “नरसिंहरावजी, तुम्ही म्हणता ते योग्यच आहे. पण आम्ही भाजी कापण्यासाठी चाकू दिला, त्याने हृदयावर शस्त्रक्रिया केली जाते आहे….”

sukritforyou@gmail.com
sukrit@prahaar.co.in

Recent Posts

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, एक ठार तर अनेकजण गंभीर जखमी

पहलगाम: जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम येथील पर्यटकांवर आज दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ला झाला…

1 hour ago

मत्स्यव्यवसायाला आजपासून कृषीचा दर्जा; राज्यातील ४ लाख ८३ हजार मच्छीमारांना होणार फायदा

ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय - मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : मत्स्यव्यवसायाला आजपासून राज्यात कृषीचा…

1 hour ago

फडणवीस सांगतील तसं चालणार! थोपटेंनंतर तांबेही भाजपाच्या दिशेने?

पुणे : पुण्यातून काँग्रेससाठी आणखी एक धक्का देणारी राजकीय कुजबुज सुरु झाली आहे. संग्राम थोपटेंनी…

1 hour ago

Sangram Thopte : पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का! काँग्रेसच्या माजी आमदारांनी हाती घेतले ‘कमळ’

पुणे : पुणे भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेस पक्षाला अखेर रामराम…

2 hours ago

Tiger Shroff: टायगर श्रॉफला जीवे मारण्याची धमकी! खोटी माहिती देणाऱ्या व्यक्तीला पंजाबमधून अटक

मुंबई: टायगर श्रॉफला (Tiger Shroff) जीवे मारण्याच्या धमकी संदर्भात केलेल्या खोट्या तक्रारीबद्दल, मुंबई पोलिसांनी पंजाबमधील…

2 hours ago

Nitesh Rane : राज्य सरकारचा मत्स्य व्यवसायाबाबत गेमचेंजर निर्णय!

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक…

2 hours ago