त्यांच्या जे पोटात होते ते ओठात आले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
नवी दिल्ली : आव्हानांशिवाय आयुष्य नाही, मात्र आव्हानांपेक्षा जास्त सामर्थ्यवान, १४० कोटी जनतेचे सामर्थ्य आहे. आव्हानांपेक्षा त्यांचे धैर्य, साहस मोठे आहे. कठीण काळ, युद्धासारखी परिस्थिती, अनेक देशात असलेली अस्थिरता, भीषण महागाई, अन्नाचा तुटवडा आणि आपल्या शेजारील देशात नागरिकांना खायला अन्न मिळत नाही. अशावेळीही आपला भारत देश जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था बनली असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषण धन्यवाद प्रस्तावावर संबोधन केले. मात्र मोदी भाषणाला उभे राहण्यापूर्वीच विरोधकांनी गोंधळाला सुरुवात केली. तर सत्ताधाऱ्यांनी मोदींच्या भाषणाच्या सुरुवातीला ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या. यावेळी गौतम अदानी यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो दाखवणाऱ्या काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर मोदींनी थेट हल्लाबोल केला. “प्रत्येकाने आपआपले आकडे मांडले, अर्थ मांडले आणि आपली रुची, प्रवृत्ती आणि प्रकृतीनुसार सर्वांनी आपले म्हणणे मांडले. त्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकल्यानंतर हे लक्षात येते की कोणाची किती क्षमता आहे, किती समज आहे, कुणाचा काय इरादा आहे हे सर्व समजते,” असे मोदी म्हणाले.
प्रत्येक सदस्याने या चर्चेत सहभाग घेतला. प्रत्येकाने आपआपले आकडे मांडले, अर्थ मांडले आणि आपली रुची, प्रवृत्ती आणि प्रकृतीनुसार सर्वांनी आपले म्हणणे मांडले. त्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकल्यानंतर हे लक्षात येते की कोणाची किती क्षमता आहे, किती समज आहे, कुणाचा काय इरादा आहे हे सर्व समजते. या सर्व बाबी समोर आल्यानंतर देश त्याचे मूल्यांकन करत असतो. या चर्चेत सहभागी झालेल्या सर्व खासदारांचे आभार मानतो. मात्र मी काल पाहात होतो, काही लोकांच्या भाषणानंतर पूर्ण इको सिस्टिम, समर्थक आनंद व्यक्त करत होते. एक मोठा नेता राष्ट्रपतींचा अपमानही करतो, आदिवासी समाजाप्रती द्वेष दाखवतो, मात्र अशा गोष्टी टीव्हीसमोर बोलल्या गेल्या, ते म्हणजे त्यांच्या जे पोटात होते ते ओठात आले,’ असे म्हणत मोदींनी राहुल गांधींना टोला लगावला.
मला वाटले होते, राष्ट्रपतींच्या भाषणावर कोणी सदस्य काही नोंदी लिहून घेतले असतील, त्यावर आक्षेप उपस्थित करतील. पण कोणीही विरोधी खासदारांनी त्याला विरोध दर्शवला नाही. ते सर्व स्वीकारले याचा मला आनंद आहे. सभागृहात चेष्टा मस्करी, हास्यविनोद होत राहतात. मात्र राष्ट्रहितासाठी गौरव क्षण आपल्याला मिळत आहेत हे विसरुन चालणार नाही. १०० वर्षानंतर महाभयंकर आजाराची साथ, युद्धजन्य स्थिती अशा स्तिथीतही देशाला ज्यापद्धतीने सांभाळले गेले, त्यामुळे संपूर्ण देशाला आत्मविश्वास मिळाला आहे, गौरव मिळाला आहे. आज भारताकडे जगभरातील समृद्ध देश आशेने पाहत आहेत. त्यामुळेच जी २० सारखे देश आपल्याकडे येत आहे. ही १४० कोटी जनतेसाठी गौरवाची बाब आहे. मात्र मला वाटते, पहिले वाटत नव्हते, पण आता वाटते की यामुळेही काहींना वाईट वाटतेय. १४० कोटी जनतेपैकी ते कोण लोक आहेत ज्यांना याचे वाईट वाटतेय, असा टोलाही पंतप्रधान मोदी यांनी हाणला.