उज्जैन (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय खेळाडू शार्दुल जोशीने बुधवारी पाचव्या सत्रातील खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्र मल्लखांब संघाला रौप्य पदकाचा बहुमान मिळवून दिला. त्याने वैयक्तिक ओव्हर ऑल गटात दुसऱ्या स्थानी धडक मारली. महाराष्ट्राच्या युवा खेळाडूने फायनलमध्ये २६.१० गुणांची कमाई करत दुसरे स्थान गाठले. या दरम्यान महाराष्ट्राचा ऋषभ घुबडे चौथ्या स्थानावर राहिला. त्याने २५.२५ गुणांची कमाई केली. मात्र थोडक्यात त्याचे कांस्यपदक हुकले. या गटात यजमान मध्य प्रदेश संघाचा प्रणव सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. त्याने २६.५० गुणांसह अव्वल स्थान गाठले.
महाराष्ट्राने मल्लखांबमध्ये सलग दुसऱ्या रौप्यपदकाची कमाई केली. महाराष्ट्राने मंगळवारी सांघिक गटात दुसरे स्थान पटकावले होते. या सांघिक गटातील पदक विजेत्या महाराष्ट्र संघातील शार्दुलला वैयक्तिक गटात पदकाचा बहुमान मिळाला.