जबलपूर (वृत्तसंस्था) : चढाईपटू हरजित, यशिका पुजारी, मनीषा आणि समृद्धी यांनी अप्रतिम खेळीतून महाराष्ट्र महिला कबड्डी संघाला खेलो इंडिया यूथ गेम्सच्या फायनलचे तिकीट मिळवून दिले. युवा कर्णधार निकिताच्या कुशल नेतृत्वात महाराष्ट्र महिला संघाने अंतिम फेरीचा पल्ला गाठला. गत रौप्य पदक विजेत्या महाराष्ट्र महिला संघाने बुधवारी उपांत्य लढतीत हिमाचल प्रदेशवर १२ गुणांनी विजयाची नोंद केली. महाराष्ट्र संघाने ४४-३१ अशा फरकाने उपांत्य फेरीत एकतर्फी विजय संपादन केला.
या लक्षवेधी कामगिरीच्या बळावर महाराष्ट्र संघाला दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश निश्चित करता आला. महाराष्ट्राला अंतिम सामन्यात हरियाणा विरुद्ध विजय संपादन करावा लागणार आहे. गुरुवारी हरियाणा आणि महाराष्ट्र यांच्यात अंतिम फेरीचा सामना रंगणार आहे. सलग दुसऱ्यांदा हे दोन्ही संघ फायनलमध्ये समोरासमोर येत आहेत. गत सत्रामध्ये हरियाणाच्या संघाने फायनलमध्ये महाराष्ट्राचा पराभव केला होता.