निखील मेश्राम हत्याप्रकरणी ७ जणांना जन्मठेप; ५ निर्दोष

नागपूर : नागपूर मधील गाजलेल्या निखील मेश्राम हत्याकांड प्रकरणी पाच आरोपींची निर्दोष मुक्तता झाली असून ७ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. २०१८ मध्ये प्रेमप्रकरणातून निखिलची हत्या झाली होती. शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली होती.


प्रेम प्रकरणात उद्भवलेल्या वादातून प्रियकराच्या भावाची हत्या केल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायालयाने हा महत्वाचा निर्णय दिला आहे. यामध्ये सात जणांना दोषी ठरवीत जन्मठेप, प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड आणि दंड न भरल्यास एक महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली. तर पाच आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली. या सातही आरोपींवर मुलीच्या प्रियकराचा भाऊ निखिल दिगंबर मेश्राम याची हत्या केल्या प्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.


कावरापेठेतील रामसुमेरबाबानगर येथील रहिवासी शंकर नथ्युलाल सोलंकी (वय ४२), देवीलाल ऊर्फ देवा नथ्युलाल सोलंकी (वय २८), सुरज चेतन राठोड (वय २०), रमेश नथ्युलाल सोलंकी (वय ३६), यश ऊर्फ गुड्डू हरीश लाखानी (वय १९), मिख्खन नथ्युलाल सालाद (वय १९), मीना नथ्युलाल सालाद (वय ३५) या सात जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.


याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. गावंडे यांनी निर्णय दिला. ही घटना २० मे २०१८ रोजी शांतीनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली होती. किरण ऊर्फ विक्की मेश्राम यांचे आरोपीच्या कुटुंबातील मुलीसोबत प्रेमसंबंध होते. याचा आरोपींच्या कुटुंबीयांमध्ये राग होता. याच वादातून घटनेच्या एक दिवस आधी (१९ मे २०१८) किरण मेश्रामसह त्यांच्या आईला आरोपींनी मारहाण करून जखमी केले. किरणने दिलेल्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही तक्रार मागे घेण्यासाठी आरोपींनी किरण आणि निखिल मेश्राम यांच्यावर दबाव टाकला होता. मात्र, त्यांनी तक्रार मागे घेण्यासाठी नकार दिला. याचाच राग मनात धरून २० मे २०१८ रोजी किरण व निखिल घरासमोर बसले असता आरोपी तिथे आले. त्यांनी किरण व निखिलच्या डोळ्यात मिरची पावडर टाकले. तसेच लाठ्या, विटा, दगड, लोखंडी रॉड, कुऱ्हाडीने हल्ला करून दोघांनाही जखमी केले. यात निखिलच्या डोक्याला जबर मार बसला. त्याला रुग्णालयात भरती केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.


पाच आरोपी गंभीर व किरकोळ जखमी झाले. तक्रारदाराने २४ आरोपींविरुद्ध शांतीनगर पोलिसांत तक्रार दाखल केली. अतिरिक्त सत्र न्यायालयाने या प्रकरणात १७ साक्षीदारांची साक्ष नोंदविली. त्यानुसार, ७ आरोपींना दोषी ठरवत शिक्षा सुनावली. पाच आरोपींची मुक्तता केली. राज्य शासनातर्फे सहाय्यक सरकारी वकील प्रशांत साखरे यांनी बाजू मांडली.


चार महिला आरोपी फरार


घटनेतील २४ आरोपींमध्ये आठ विधीसंघर्ष बालकांचा समावेश होता. यातील १२ आरोपींना अटक करण्यात आली व त्यांच्यावर खटला चालविण्यात आला. यात गीता राठोड, माया सोलंकी, राजुरी परमार, धनश्री सोलंकी या चार महिला आरोपींचा समावेश होता. विशेष म्हणजे, या चारही महिला साडेचार वर्षांपासून फरार आहेत.


एकावेळी सात जणांना जन्मठेपेची पहिलीच घटना


या प्रकरणात एका महिलेसह १२ आरोपींवर खटला चालविण्यात आला. यातील सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. एकावेळी सात आरोपींना जन्मठेप सुनावण्यात आल्याची ही अलीकडच्या काळातील पहिलीच घटना आहे.

Comments
Add Comment

साखरेचा गाळप हंगाम सुरू, पहिल्याच दिवशी २८ कारखान्यांना परवाने

पुणे (प्रतिनिधी): राज्यातील साखर गाळप हंगाम शनिवारपासून सुरु झाला. पहिल्याच दिवशी २८ साखर कारखान्यांना गाळप

काय सांगता ? २८० किलोच्या हिंदकेसरी कॅप्टन बैलाची इतक्या लाखांना विक्री

छत्रपती संभाजीनगर : फक्त २८० किलो वजन, चमकदार शरीर, मजबूत बांधा, वेगवान चाल यामुळे संपूर्ण मराठवाड्यात लोकप्रिय

कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना मिळाला शासकीय पूजेचा मान!

पंढरपूर: कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यानिमित्त परंपरेनुसार आज पहाटे विठ्ठलाची शासकीय पूजा पार पडली. यावर्षी

दहावी-बारावी परिक्षा वेळापत्रक जाहीर; फेब्रुवारीत होणार परिक्षा

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे

कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरला आलेल्या प्रसिद्ध कीर्तनकाराचं निधन

पंढरपूर: कीर्तन परंपरेत संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे कोकणातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. दत्ताराम सीताराम नागप

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर तणाव वाढला; "काळा दिन" कार्यक्रमासाठी जाणाऱ्या शिवसैनिकांना कर्नाटक पोलिसांनी सीमेवर रोखले!

कोल्हापूर : "काळा दिन"आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात शनिवारी तणावाची परिस्थिती