कल्याण : राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, ठाणे आपदा मित्र – सखी स्वयंसेवक यांच्या माध्यमातून प्रशिक्षण सुरू आहे. संपूर्ण ठाणे जिल्हात ५०० स्वयंसेवकांना हे प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यापैकी ठाणे येथून ११२ तसेच अंबरनाथ तालुक्यातून १०५ स्वयंसेवकांनी हे प्रशिक्षण पूर्ण केलं आहे. उप विभागीय अधिकारी, प्रांत कार्यालय कल्याण व तहसीलदार कल्याण तालुका यांच्या समन्वयाने कल्याण तालुक्यात ३० जानेवारी पासून १० फेब्रुवारी पर्यंत सुरू असून अचिवर्स महाविद्यालय येथे बॅच क्र ५ आणि ६ मध्ये एकूण १२२ स्वयंसेवक प्रशिक्षण घेत आहेत. आज कल्याण पश्चिमेतील काळा तलाव येथे या प्रशिक्षणार्थींना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्याक्षिके दाखविण्यात आले.
या शिबिरात पोलीस पाटील, नागरी संरक्षण दल, एनसीसी आणि एनएसएस, होमगार्ड, अग्निशमन दल, निवृत्त सैनिक अशा सर्वांच सहभाग आहे. शिबिरात पूर परिस्थिती बुडणाऱ्या व्यक्तीचा बचाव करणे व बोट चालवणे, गर्दी व्यवस्थापन व दंगल परिस्थिती साठी स्व सुरक्षेसाठी शिल्डचा वापर आणि लाठी चालवणे, प्रथमोपचार – बँडेज करणे, अग्नी सुरक्षा उपकरणे हाताळणी व मानवी स्ट्रेचर, दोरीच्या साहाय्याने डोंगर कडा चढणे-उतरणे, गाठींचे प्रकार, भूकंप, दरड कोसळणे, इमारत कोसळणे दुर्घटना व इतर आणीबाणी परिस्थिती हाताळणे अशा विविध विषयांवर प्रशिक्षण आणि सराव करण्यात आला. हे प्रशिक्षण यशदा चे मास्टर ट्रेनर, पोलीस अधिकारी, अग्निशमन अधिकारी, नागरी संरक्षण दल, प्रख्यात गिर्यारोहक यांच्याकरवी देण्यात आले.
या प्रशिक्षणासाठी उप जिल्हाअधिकारी अभिजीत भांडे पाटील, तहसीलदार जयराज देशमुख, नायब तहसीलदार रीताली परदेशी व सुषमा बांगर तसेच ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ अनिता जावंजळ यांच्या मार्गदर्शनाखाली आपदा मित्र सखी समन्वयक सुहास पवार, मैत्रेयी सापने, अभिजीत बाऊस्कर, कौशल पोतनीस, जयेश अहिरे, रोहित ठाकूर, यांनी मेहनत घेतली.