जबलपूर (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय सायकलिस्ट पूजा दानोळेने ट्रॅकवरचा आपला दबदबा कायम ठेवत पाचव्या सत्रातील खेलो इंडिया युथ गेम्समध्ये गोल्डन हॅटट्रिक साजरी केली. महाराष्ट्राच्या या युवा सायकलिस्टने बुधवारी जबलपूरच्या ट्रॅकवर आयोजित सायकल रोड रेसमध्ये चॅम्पियन होण्याचा बहुमान पटकावला. तिने महिला गटातील २० कि.मी.ची ही रेस ३६ मिनिटे १.७४५ सेकंदांत पूर्ण केली. यासह ती स्पर्धेत तिसऱ्या सुवर्णपदकाची मानकरी ठरली. या दरम्यान अहमदनगरच्या राष्ट्रीय सायकलिस्ट अपूर्वा गोरेने सायकल रोड रेस मध्ये रौप्यपदक पटकावले. तिने ३६ मिनिटे ७.८३८ सेकंदांत निश्चित अंतर गाठले.
आंतरराष्ट्रीय सायकलिस्ट पूजाने रोड रेसमधील आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी वेगवान सुरुवात केली. या दरम्यान तिने सरासरी ३३.३१ अशा वेगवान स्पीडच्या बळावर सोनेरी यशाचा पल्ला गाठला. त्यामुळे तिला आपली सहकारी अपूर्वाला मागे टाकता आले. रौप्य पदकाची मानकरी ठरलेल्या अपूर्वाने ३२.२१ या सरासरी स्पीडने दुसऱ्या स्थानी धडक मारली.