Tuesday, December 3, 2024
Homeताज्या घडामोडीभाजप आणि राष्ट्रवादी स्वागतासाठी सज्ज पण थोरात म्हणतात...

भाजप आणि राष्ट्रवादी स्वागतासाठी सज्ज पण थोरात म्हणतात…

भाजपकडून खुली ऑफर, राष्ट्रवादीनेही दिले आमंत्रण

अहमदनगर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ गटनेते पदाचा राजीनामा दिल्याच्या बातम्या पसरल्या आणि थोरातांना भाजपकडून खुली ऑफर देण्यात आली. तर राष्ट्रवादीनेही त्यांना आमंत्रण दिले. मात्र, आता स्वत: थोरात यांनी आपण राजीनामा नव्हे तर तक्रार दिल्याचे म्हटले आहे. यामुळे थोरात यांच्या मनात नेमके काय चालले आहे, असा प्रश्न सर्वांना पडला असून थोरातांचे कार्यकर्तेही बुचकळ्यात पडले आहेत.

नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या गोंधळानंतर आधी तांबे आणि आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी तर थोरांताना जाहीर खुली ऑफर दिली. सध्या काँग्रेसमध्ये असल्यापेक्षा मोठे स्थान भाजपमध्ये देऊ, असे बावनकुळे यांनी जाहीरपणे सांगितले. तर दुसरीकडे थोरात यांचे शेजारी आणि कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून थोरातांवर बोचरी टीका सुरू आहे. राष्ट्रवादीकडूनही थोरात यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करून जणू त्यांनाही निमंत्रण दिले जात आहे. अशा परिस्थिती स्वत: थोरात यांच्या मनात नेमके काय आहे, हे स्पष्ट होत नाही.

नाशिक पदवीधरच्या निवडणूक काळात थोरातांचे मौन गाजले. आता त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केलेल्या तक्रारीची चर्चा सुरू आहे. ही तक्रार नेमकी काय आहे, हे अद्याप ना थोरात यांनी स्पष्ट केले ना दिल्लीतील नेत्यांनी. त्यातील त्रोटक माहिती बाहेर येत आहे. यामध्ये थोरात यांनी उमेदवारी वाटपाच्या काळात झालेला घोळ सांगून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका केल्याचे सांगण्यात आले. अशा परिस्थितीत पटोले यांच्यासोबत काम करणे अवघड असल्याचेही थोरात यांनी तक्रारीत म्हटल्याचे सांगण्यात आले. मात्र, या तक्रारीबद्दल प्रदेशस्तरावर माहिती नसल्याचे राज्याचे नेते सांगतात. त्यानंतर या तक्रारीसोबतच थोरात यांनी विधिमंडळ गटनेतेपदाचा राजीनामाही पाठवल्याची चर्चा आहे.

या वादात पटोले यांचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात आल्याचा दावा एका बाजूला सुरू असताना दुसरीकडे थोरात यांचे विधिमंडळ नेतेपद संकटात असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर थोरात यांनी तक्रारीसोबतच या पदाचा राजीनामा दिल्याचे सांगण्यात येऊ लागले. मात्र, खुद्द थोरात यांनी आपण राजीनामा दिला नसून तक्रार केली आहे, असे सांगितले आहे.

दुसरीकडे निवडणुकीच्या आधी भाजपकडून तांबे यांना पक्षात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. आता तेच प्रयत्न थोरात यांच्यासाठी सुरू झाले आहेत. असे असले तरी स्थानिक पातळीवर परिस्थिती वेगळी आहे. थोरात भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेणारच नाहीत. त्यांनी तो घेतला तरी त्यांना विखे पाटील यांचा अडसर ठरू शकतो, असे त्यांचे कार्यकर्ते ठामपणे सांगतात. भाजपचे वरिष्ठ नेते थोरातांना उघडपणे निमंत्रण देत असले तरी त्यांचे शेजारी विखे पाटील मात्र थोरात यांच्यावर कडवी टीका करीत आहेत.

तर तिकडे राष्ट्रवादीकडूनही थोरात यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष निमंत्रण देण्यात येत आहे. काँग्रेस सोडायचीच ठरली तर राष्ट्रवादीत जाण्यासाठी थोरात यांना फारशी अडचण नाही. त्यांचे आणि पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे चांगले संबंध आहेत. उलट महाविकास आघाडी सरकारच्या निर्मितीच्या काळात थोरात यांच्यावर पवार यांच्याशी असलेल्या संबंधावरून टीका करण्यात आली होती. पुढे त्याचे परिणामही त्यांना भोगावे लागले होते. आता राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे आमदार तांबे यांच्याशी संपर्क ठेवून आहेत.

हे सर्व सुरू असताना बाळासाहेब थोरात हे मात्र त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने संयमी खेळी खेळत असल्याचे दिसून येते. त्यामुळे त्यांच्या मनात नेमके काय आहे, याचा थांगपत्ता लागत नाही. काँग्रेसमध्ये त्यांचे वजन होते आणि आजही आहे. २०१९ मध्ये त्यांनी पक्षाला सावरण्यासाठी मोलाची कामगिरी केलेली आहे. त्यातून थेट गांधी परिवारापर्यंत त्यांचे संबंध आहेत. त्यामुळे ते सहजासहजी काँग्रेस सोडतील असे वाटत नाही. आता यावर काय तोडगा काढला जाईल की काँग्रेसच्या नेहमीच्या पद्धतीनुसार हे प्रकरणही दीर्घकाळ रेंगाळत ठेवत आपोआप शांत होण्याची प्रतीक्षा केली जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -