Tuesday, June 17, 2025

टी-८० युद्धनौका कल्याणकरांसाठी ठरणार पर्वणी

टी-८० युद्धनौका कल्याणकरांसाठी ठरणार पर्वणी

कल्याण : भारतीय नौदलात आपल्या पराक्रमी शौर्याद्वारे मानाचे स्थान मिळवलेली टी-८० ही युद्ध नौका कल्याणच्या खाडी किनारी दाखल झाली आहे. ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी होणाऱ्या प्रस्तावित स्मारकासाठी ही युद्ध नौका केडीएमसीकडून कल्याणात आणली गेली आहे. आज बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या पदाधिका-यांनी गणेश घाट येथे जाऊन या युद्धनौकेची पाहणी केली.



महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या अथक प्रयत्नाने ही नौका कल्याणमध्ये आली असून हा कल्याणकरांसाठी मानाचा तुरा आहे. वेगवेगळ्या प्रकारचे काम या शहरात होत असून त्याचबरोबर देशासाठी लढलेली नौका कल्याणमध्ये येणे ही मानाची बाब असून कल्याणकरांसाठी ही पर्वणी ठरणार आहे, असे शहर प्रमुख रवी पाटील म्हणाले.


भविष्यात दुर्गाडी किल्ल्यानजीक पर्यटनस्थळ म्हणून त्याची स्थापना केली जाणार आहे. त्यामुळे याची आज बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने पाहणी करण्यात आली आहे. यावेळी पाटील यांच्यासह माजी नगरसेवक मोहन उगले, सुनील वायले, संजय पाटील, गणेश जाधव, विद्याधर भोईर, जिल्हा संघटक छाया वाघमारे, शहर संघटक नेत्रा उगले आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Comments
Add Comment